top of page
Karkare%20Sir_edited.jpg

श्री. प्रवीण करकरे, डोंबिवली.

(तबला वादक, मार्गदर्शक)

श्री. प्रवीण करकरे यांचा जन्म दिनांक १६ मार्च १९७१ रोजी, एका संगीत प्रेमी कुटुंबामध्ये झाला. साहजिकच त्यांना संगीताचे बाळकडू लहानपणापासूनच  मिळाले. त्यातूनच त्यांना तबला-वादनाची आवड निर्माण झाली आणि लहान वयातच त्यांचे तबला वादनाचे शिक्षण सुरु झाले. त्यांनी लखनौ-फरुखाबाद घराण्याचे सुप्रसिद्ध तबला वादक पंडित सदाशिवराव पवार यांचेकडे सुरवातीची १५ वर्षे तबला-वादनाचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. पुढे त्यांना दिल्ली-अजराडा घराण्याचे अभ्यासक आणि सुप्रसिद्ध विद्वान संगीतशास्त्रज्ञ पंडित सुधीर माईणकर यांच्याकडून दिल्ली-अजराडा या दोन्ही घराण्यांची तालीम मिळाली. तबला नवाज उस्ताद झाकीर हुसैन, पंडित भाई गायतोंडे आणि तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांसारख्या दिग्गजांच्या शिबिरात ते सहभागी झाले होते.

एकीकडे तबला वादनाचे शिक्षण सुरु असतानाच त्यांनी वाणिज्य या विषयात पदवी प्राप्त केली, परंतु, त्यांनी तबला कलाकार होण्याचे ध्येय उराशी बाळगून व्यावसायिक तबला वादक होण्याचे निश्चित केले आणि ठरविल्याप्रमाणे त्यांनी 'शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर'चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून, ते २००१ साली तबला या विषयातील एम. ए. ची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पुढे २००६ साली त्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मिरजची "संगीत अलंकार" ही पदवी 'विशेष श्रेणीसह' प्राप्त केली. अशाप्रकारे त्यांनी शैक्षणिक आणि सैद्धान्तिक पातळीवर उच्चतम प्रगती केली. 

                 

पण त्या अगोदर १९९४ साली मुंबईच्या 'सूर-सिंगार संसद' या संस्थेने त्यांना "तालमणी" या पुरस्काराने सन्मानित केले होते. त्याचबरोबर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मिरजची "संगीत विशारद" ही परीक्षा विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल आणि राष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल १९९८ सालचा 'त्र्यंबक दाजी जोशी' हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. तसेच २०१८ साली डोंबिवली येथील प्रतिभा कला प्रतिष्ठानतर्फे 'चैतन्य' पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले.

               

श्री. प्रवीण करकरे यांनी मुंबई येथील श्रीरंग प्रतिष्ठान, स्वर-साधना समिती, स्वर-माउली, शारदा संगीत विद्यालय, एन.सी.पी.ए., कलाभारती, आमद प्रतिष्ठान, सूर-सिंगार संसद, तसेच ठाणे येथील ताल-प्रवाह उत्सव, डोंबिवली येथील सदाशिव संगीत विद्यालय, भारतीय संगीत विद्यालय, नांदेड येथील यशवंत संगीत विद्यालय, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मिरज व मुंबई, आमद बडोदा तसेच देशातील विविध ठिकाणी एकल तबलावादनाचे असंख्य कार्यक्रम केले. याशिवाय अहमदाबाद येथील 'सप्तक' संस्था आयोजित 'घराणा संमेलन' या कार्यक्रमात त्यांनी अजराडा घराण्याचे तबला वादन सादर केले.  

                

याबरोबरच त्यांनी देशातील प्रतिष्ठित अशा, 'सवाई-गंधर्व महोत्सव', पुणे, 'कालिदास संगीत समारोह', उज्जैन आणि परदेशात 'सूर-हिंडोल', दुबई, 'व्होकल ट्रेडीशन', सिंगापूर अशा देश-विदेशातील अनेक संस्थांच्या कार्यक्रमात, सुप्रसिद्ध कलाकार उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ, उस्ताद उस्मान खाँ, डॉक्टर अरुण कशाळकर, डॉक्टर विद्याधर व्यास, डॉक्टर अश्विनी भिडे-देशपांडे, श्रीमती पद्मा तळवलकर, श्रीमती शुभदा पराडकर, पंडित व्यंकटेश कुमार, डॉक्टर राम देशपांडे, डॉक्टर विकास कशाळकर, श्रीमती अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी, श्री. रवींद्र परचुरे आणि अशा अनेक नामवंत, प्रतिभावान कलाकारांसोबत तबला साथ-संगत केली आहे. अशाप्रकारे त्यांनी एकल वादन आणि साथ-संगतीच्या निमित्ताने देश विदेशात प्रवास केला आहे.  

                     

श्री. प्रवीण करकरे हे आकाशवाणी, मुंबई आणि दूरदर्शन मुंबईचे, श्रेणीयुक्त कलाकार आहेत आणि त्यांनी पंडित कार्तिक कुमार, कै. पंडित दिनकर कैकिणी, पंडित ब्रिज नारायण आणि असे अनेक दिग्गज संगीत कलाकारांना साथ-संगत केली आहे.

                    

श्री. प्रवीण करकरे हे गेल्या २८ वर्षाहून अधिक काळ संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 'शारदा संगीत विद्यालय, मुंबई' येथे १९९२ सालापासून ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, वाशी येथे वरिष्ठ अध्यापक आहेत. त्याचबरोबर ते 'ललित कलाकेंद्र, पुणे विद्यापिठा'चे अभ्यागत प्राध्यापक आहेत व 'भारती विद्यापीठ, पुणे' येथे शिक्षण समितीचे सभासद आहेत. तसेच ते 'अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मिरज, मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ' आणि 'एम.एस. विद्यापीठ, बडोदा' येथे परीक्षा समितीचे सभासद आहेत. त्यांनी अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत तसेच पुणे विद्यापीठ, एन.सी.पी.ए., शारदा संगीत विद्यालय आणि अशा अनेक विविध प्रतिष्ठित संस्थांच्या चर्चा सत्रात ते सहभागी झाले आहेत. 'शारदा संगीत विद्यालय, मुंबई' येथे १९९२ सालापासून ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 

                            

श्री. प्रवीण करकरे यांनी असे अनेक विद्यार्थी घडवले आहेत की ज्यांनी पुढे अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत, पारितोषिके, पुरस्कार आणि सन्मान-चिन्हे प्राप्त केली आहेत. श्री. प्रवीण करकरे यांच्या या समर्पित आणि निःस्वार्थी सेवेप्रित्यर्थ, 'शारदा संगीत विद्यालय', मुंबई यांनी, फेब्रुवारी २०१५ मध्ये, तबला नवाज उस्ताद झाकीर हुसैन ह्यांच्या हस्ते "शारदा विभूषण" हे सन्मान-चिन्ह प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले.

IMG-20210103-WA0005_edited.jpg

कु. स्वप्नगंधा रमेश करमरकर, कल्याण

(तबला वादक, संकल्पना आणि संकलन)

कु. स्वप्नगंधा रमेश करमरकर हिचा जन्म दि. २९ ऑगस्ट १९९२ रोजी झाला. तिच्या आई वडलांना संगीताची आवड होतीच, त्यामुळे साहजिकच संगीताच्या पोषक वातावरणामुळे तिच्यातही संगीताची आवड निर्माण झाली. तिच्या आई वडलांनी गायन-वादन-नृत्य या तीनही विषयांच्या वर्गात (क्लासमध्ये) तिचे नाव घातले. तिचा तबला वादनातील कल पाहून, वयाच्या आठव्या वर्षापासून, कल्याणचे श्री. कैलास जोशी यांच्याकडे तिचे तबला वादनाचे शास्त्रोक्त शिक्षण सुरू झाले. श्री. कैलास जोशी यांच्याकडे आठ वर्षे शिक्षण घेतल्यानंतर, त्यांच्याच सांगण्यावरून, पंजाब घराण्याचे, पंडित योगेश समसी यांचे शिष्य श्री. स्वप्नील भिसे यांचेकडे गेल्या बारा वर्षांपासून तिचे तबला वादनाचे शास्त्रोक्त शिक्षण सुरू आहे.  

 

तबला-वादक होण्याचाच तिचा ध्यास असल्यामुळे, शालेय शिक्षण बारावी पर्यंत पूर्ण झाल्यावर, तिने मुंबई विद्यापिठाच्या चर्चगेट येथील संगीत विभागात, तबला विषयातील पदविका आणि पदवी परिक्षेसाठी प्रवेश घेतला. हे शिक्षण घेताना तिला पंडित विभव नागेशकर आणि श्री. प्रवीण करकरे यांचे मार्गदर्शन लाभले. 

 

तबला शिक्षण -

  • तबला विषयातील पदविका परीक्षा विशेष श्रेणीत उत्तीर्ण, मुंबई विद्यापीठ, मुंबई 

  • तबला विषयातील पदवी परीक्षा द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण, मुंबई विद्यापीठ, मुंबई 

  • तबला विषयातील पदव्यूत्तर अभ्यासक्रमातील 'ब्रिज कोर्स' परीक्षा विशेष श्रेणीत उत्तीर्ण, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर  

  • तबला विषयातील पदव्यूत्तर (एम.ए.) परीक्षा विशेष श्रेणीत उत्तीर्ण, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर  

  • तबला विषयातील 'संगीत विशारद' (पदवी समकक्ष) परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण, गांधर्व महाविद्यालय, मिरज 

  • 'सुगम संगीता'च्या तीन परीक्षा उत्तीर्ण 

  • 'कत्थक नृत्या'च्या दोन परीक्षा उत्तीर्ण

विशेष प्राविण्य / पारितोषिक -

  • 'स्वर-साधना समिती मुंबई', आयोजित 'अखिल भारतीय नृत्य आणि संगीत स्पर्धे'त, पहिल्याच प्रयत्नात प्रथम पारितोषिक - रजत करंडक -  सन २००९

  • 'स्वर-साधना समिती मुंबई'तर्फे, भारतातील पहिल्या महिला तबला वादक डॉ. अबान-इ-मिस्त्री यांच्या प्रथम स्मृति-दिनानिमित्त जाहीर झालेली, पहिली शिष्यवृत्ती - सन २०१४

  • केंद्र सरकार, दिल्लीच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे देण्यात येणारी, तबला विषयातील 'युवा कलाकार शिष्यवृत्ती' - सन २०१४ 


 

मंचीय सादरीकरण -

 

कु. स्वप्नगंधा करमरकर हिने २००९ पासून महाराष्ट्रातील, 'स्वर-साधना समिती', मुंबई, मुक्त व्यासपीठ परिवार, कल्याण, कणकवली, वात्सल्य ट्रस्ट, कांजूरमार्ग, राष्ट्र सेविका समिती, कल्याण, गुरुपौर्णिमा - डोंबिवली, बदलापूर, ग्रॅन्टरोड, तबला-ट्रायो जुगलबंदी, बदलापूर, दीपगंध दिवाळी पहाट, बदलापूर अशा विविध ठिकाणी एकल तबलावादन सादर केले आहे. 

 

तसेच तबला व्यतिरिक्त ढोलक, ढोलकी, संबळ, डफ, साईड-ऱ्हीदम, ऑक्टो-पॅड, ढोल, ताशा अशा विविध तालवाद्यांनी सांगीतिक कार्यक्रमात साथ-संगत केली आहे. 

कल्याण डोंबिवली महानगर पालिका, आयोजित संगीत कार्यक्रमात, स्वरचित 'फ्यूजन' सादर केले आहे.

 

परीक्षक नियुक्ती -

 

  • 'गांधर्व महाविद्यालय', मिरज आयोजित परीक्षांसाठी परीक्षक म्हणून नियुक्ती.

  • 'भारत विकास परिषद', डोंबिवली शाखा आयोजित, 'राष्ट्रीय समूहगीत स्पर्धे'साठी परीक्षक म्हणून नियुक्ती.

 

लेखन -

 

'तबल्याचा इतिहास, निर्मिती आणि विकास' या विषयावर 'संवाद' त्रैमासिकात लेख.

            

स्वतंत्र संकल्पना / निर्मिती -

 

कल्याणमधील पहिला महिला वाद्यवृंद, 'स्वरस्नेह'ची स्थापना आणि पहिला कार्यक्रम -

८ मार्च २०१३. 

                                      

आत्तापर्यंत महाराष्ट्रात, कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई, माथेरान, यवतमाळ इत्यादी ठिकाणी अनेक कार्यक्रम सादर. 

                                       

याशिवाय 'स्वरस्नेह सांगीतिक सृती', कल्याण या नवीन नावाने 'दादरा', 'सफर', 'पंचकन्या' अशा विशिष्ट विषयांवरील विशेष कार्यक्रम सादर.

Panchakanya Link

https://youtube.com/playlist?list=PLKDccW9WtMV9iJ2H44JWMRg8uvfYsvT-f

                                      

'साधना - The Journey Towards Perfection' ही, तबला अभ्यासकांसाठी, वादकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी, विविध रागातील, तालातील आणि लयीतील 'लेहऱ्यां'ची, YouTube Series. 

Saadhana Series Link

https://youtube.com/playlist?list=PLKDccW9WtMV81T531HdSARWuqWKyiSqxU

Interview Swapnagandha

https://youtu.be/mC4lfaxAGkw

Gurupaurnima - Tabla Solo

https://youtu.be/-P3R--OLOME

Mukta Vyaspith Parivar - Tabla Solo

https://youtu.be/o8C330Fc_R4

Halke Halke Jojwa - Tabla by Swapnagandha

https://youtu.be/S8V58GELcj8

bottom of page