top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

हार्मोनिअम –


हार्मोनिअम – हार्मोनिअम हे एक सुप्रसिद्ध सुशिर वाद्य आहे. या वाद्याला मराठीत ‘संवादिनी’ असे म्हणतात. ‘हार्मोनी’ या शब्दापासून ‘हार्मोनिअम’ असे नाव या वाद्याला पडले आहे. या वाद्याचा मूळ उगम पाश्चात्त्य देशातील असूनही हे वाद्य भारतीय संगीतात लोकप्रिय झालेले आहे. 

 


हार्मोनिअमची रचना – 


१] कॅबिनेट – हे एक लाकडी पातळ फळ्यांपासून तयार केलेले खोके असून ते शिसम, देवदार इ. झाडांच्या लाकडांपासून तयार केलेले असते. यालाच ‘कॅबिनेट’ असे म्हणतात. याचा तळ लाकडी पातळ फळीने बंद केलेला असतो. या फळीवर जाड स्प्रिंग बसवलेली असते. यावर पोटभाता पक्का केलेला असतो. 


२] स्टॉपर्स – कॅबिनेटच्या आतील फळीवर चार किंवा पाच मोठी छिद्रे असतात. या छिद्रावर लाकडाच्या चौकोनी झडपा बसवलेल्या असतात. या झडपा लांब सळयांनी जोडलेल्या असतात. या सळ्या फळीतून बाहेर काढलेल्या असतात. त्यांना पुढे दर्शनी भागावर बटणे लावलेली असतात. यालाच ‘स्टॉपर्स’ असे म्हणतात. हे स्टॉपर्स पुढे ओढल्यास झडपा उघडून त्यातून हवा वर येते आणि स्टॉपर्स मागे नेल्यास झडपा बंद होतात. 


३] स्वरपट्ट्या – हार्मोनिअमच्या स्टॉपर्सच्या बाजूने डावीकडून उजवीकडे अशी स्वरपट्ट्यांची ओळ तयार केलेली असते. जितके स्वर हार्मोनिअममध्ये असतील तेवढीच संख्या या स्वरपट्ट्यांची असते. या स्वरपट्ट्यांवर एक लाकडी लांब पट्टी बसविलेली असते. या स्वरपट्ट्या पितळी धातूच्या तारांनी स्वरफळीच्या छिद्रांवर घट्ट बविलेल्या असतात. या तारांची क्रिया स्प्रिंग प्रमाणे होते. पट्टी दाबली असता छिद्रावरून ती वर उचलली जाते तर बोट उचलल्यानंतर ती पूर्वावस्थेत येते. 


४] रीड / सूर – हार्मोनिअममधील आवाज हा रीडवर हवेचा दाब पडल्याने उत्पन्न होतो. त्यामुळे रीड हा भाग अत्यंत महत्वाचा समजला जातो. हवेचा दाब रीडवर पडल्याने ही पट्टी आंदोलीत होते व आवाज उमटतो. या रीड्सच्या च्या गुणवत्तेवरच हारमोनियमची गुणवत्ता व किंमत ठरत असते. 


५] की-बोर्ड – स्वरपट्ट्यांच्या स्टॉपर्सच्या बाजूने असलेल्या स्वरपट्ट्यांनाच ‘की-बोर्ड’ असे म्हणतात. यावर काळ्या व पांढऱ्या पट्ट्या असतात. काळ्या पट्ट्या या रुंदीने छोट्या असून किंचित वर आलेल्या असतात. यावरून स्वरांची काळी १,२,३,४,५ अशी नांवं/परिभाषा रूढ झाली. 



       असे हे हार्मोनिअम वाद्य वाजविण्यास व शिकण्यास सोपे असल्याने अतिशय लोकप्रिय आहे. पंडित गोविंदराव टेंबे, पंडित अप्पा जळगावकर, पंडित तुलसीदास बोरकर इ. दिग्गज कलाकारांनी या वाद्याला भारतीय संगीतात महत्वाचे, उच्च स्थान प्राप्त करून दिले आहे. आज शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, सुगम संगीत, गझल, कव्वाली, लोकसंगीत तसेच फ्यूजन संगीतातही हार्मोनिअम चा वापर वाढलेला दिसून येतो. साथ-संगती बरोबरच एकल हार्मोनिअम वादन आज लोकप्रिय होत चालले आहे.      


Recent Posts

See All

शेहनाई/सनई -

हे एक सुषिर वाद्य असून मराठीत 'सनई' तर हिंदी भाषेत त्याला 'शेहनाई' असे म्हणतात. भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खाँ साहेबांनी या वाद्याला...

तानपूरा / तंबोरा –

तानपूरा / तंबोरा – तानपूरा या वाद्याला ‘तंबोरा’ असेही म्हणतात. हे वाद्य अतिशय प्राचीन आहे. महर्षी नारद तंबरू सदैव बाळगत असत. कालांतराने...

Comments


bottom of page