top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

पखवाजावर वाजविले जाणारे वर्ण आणि त्यांची निकास पद्धती -


पखवाज हे वाद्य केव्हा, कोणी, कसे निर्माण केले, याबाबत ठोसपणे माहिती कोणत्याही ग्रंथात आढळून येत नसली तरी या अवनद्ध वाद्याची उत्पत्ती भगवान शंकर यांच्या हातातील डमरू या वाद्यापासून झाली असावी असे मानले जाते. 

  ध्रुपद-धमार गायकी व नृत्याच्या साथीसाठी पखवाज हे वाद्य वापरण्यात येऊ लागले. धमार, चौताल, ब्रह्मताल, रुद्रताल, सवारी व लक्ष्मी या अवघड तालांचे वादन यावर केले जाऊ लागले. हे वाद्य मृदुंगापेक्षा आकाराने थोडे मोठे असते व यावर खुले वादन केले जाते. 



पखवाजावर वाजविले जाणारे वर्ण आणि त्यांची निकास पद्धती -


पखवाज हे वाद्य प्राचीन ताल-वाद्यांपैकी एक महत्वाचे ताल-वाद्य आहे. सामान्यतः काळी २ व पांढरी ४ या पट्टीत पखवाज स्वराला लावतात. तबल्याप्रमाणे पखवाज साहित्य हे सात वर्णांवर आधारित आहे. यात 'ता, दी, ना, ते, ट, घ आणि क' हे सात प्रमुख वर्ण आहेत. यांचेही तबल्याप्रमाणेच तीन गटात विभाजन केले गेले आहे. 

        उजव्या पुडीवर बोटांनी आघात करून तर डाव्या पुडीवर डाव्या हाताच्या संपूर्ण पंजाचा वापर करून खुले वादन पखवाजावर केले जाते.



१] उजव्या हाताने वाजविले जाणारे वर्ण - 

         फक्त उजव्या हाताने वाजविल्या जाणाऱ्या वर्णांची निकास पद्धती खालीलप्रमाणे ; 


१) ता - उजव्या हाताची पाचही बोटे जुळवून, पंजाचा उपयोग करून, थापेच्या सहाय्याने वाजविल्या जाणाऱ्या खुल्या नादास 'ता' असे म्हणतात.  

            थाप मारताना सुरवातीला शाईवर करंगळीचा आघात केला जातो व लगेचच अनामिका, मध्यमा व तर्जनी ही तीनही बोटे अनुक्रमे शाई, लव व चाटीवर पडतील असे वाजवितात. हा आघात झाल्यानंतर हात लगेचच पुडीवरून उचलला जातो. अशा प्रकारे 'ता' हे खुले अक्षर वाजविले जाते.


२) ना - तबल्यावर ज्याप्रमाणे 'ना' हे अक्षर वाजविले जाते त्याचप्रमाणे पखवाजावर वाजविले जाते. उजव्या हाताच्या तर्जनीने चाटीवर आघात करून तर्जनी लगेचच उचलली जाते. अशा प्रकारे 'ना' हे अक्षर वाजविले जाते. 


३) दिं - उजव्या हाताची पाचही बोटे एकत्र जुळवून नागाच्या फण्याप्रमाणे हाताची स्थिती केली जाते. पंजाने शाईच्या मध्यावर अलगद खुला आघात करून ‘दिं’ हे खुले अक्षर वाजविले जाते. 


४) ति - 'ति' हे शाईवर वाजविले जाणारे बंद अक्षर आहे. उजव्या हाताची मध्यमा, अनामिका व करंगळी ही तीन बोटे जुळवून शाईच्या मध्यभागी एक चतुर्थांश भागात दाब देऊन आघात केल्यानंतर 'ति' हे अक्षर वाजते.


५) र/ट - 'र'/’ट’ हे शाईवर वाजविले जाणारे बंद अक्षर आहे. उजव्या हाताच्या तर्जनीने शाईच्या मध्यभागी दाब देऊन आघात केल्यानंतर 'र'/’ट’ हे अक्षर वाजते.


२] डाव्या हाताने वाजविले जाणारे वर्ण – 

   फक्त डाव्या हाताने वाजविल्या जाणाऱ्या वर्णांची निकास पद्धती खालीलप्रमाणे –


१) ग - 'ग' हा खुला वर्ण असून, डाव्या हाताच्या पंजाने बायाँच्या लवेवर खुला आघात करून लगेचच पंजा उचलून 'ग' हा वर्ण वाजविला जातो.


२) क – ‘क’ हा बंद वर्ण आहे. डाव्या हाताची पाचही बोटे, बायाँवर जिथे पिठाची ओली कणिक लावलेली असते, त्या कणकेवर पुढील भागावर थाप मारून ‘क’ हा बंद वर्ण वाजविला जातो.


३) कत् - ‘कत्’ हा बंद वर्ण आहे. 'क' प्रमाणेच वाजविला जातो, परंतु डाव्या हाताची पाचही बोटे, बायाँवर जिथे पिठाची ओली कणिक लावलेली असते, त्या कणकेवर पुढील भागावर जोरदार थाप मारून (आघात करून) ‘कत्’ हा बंद वर्ण वाजविला जातो. अशा प्रकारच्या वादनामुळे 'क' आणि 'त' हे वर्ण एकत्रित वाजल्याचा भास होतो.


३] उजव्या व डाव्या हातांनी वाजविले जाणारे वर्ण - 

                   उजव्या व डाव्या या दोन्ही हातांनी संयुक्तपणे वाजविले जाणारे वर्ण आणि त्यांची निकास पद्धती खालीलप्रमाणे ;


१) धा - उजव्या हाताच्या थापेच्या सहाय्याने 'ता' हा खुला नाद तर त्याच वेळेस डाव्या हाताच्या पंजाने 'ग' हा खुला नाद एकाच वेळी वाजविल्यास 'धा' हा खुला नाद उत्पन्न होतो. म्हणजेच 'ता' व 'ग' या दोन खुल्या नादांच्या संयुक्तिक वादनाने 'धा' हा खुला  वर्ण वाजविला जातो.


२) गदी - डाव्या हाताच्या पंजाने 'ग' हा खुला नाद वाजवितात. तर उजव्या हाताची पाचही बोटे एकत्र जुळवून नागाच्या फण्याप्रमाणे हाताची स्थिती केली जाते. पंजाने शाईच्या मध्यावर अलगद खुला आघात करून दि हे खुले अक्षर वाजवितात आणि यांच्या संयुक्त वादनातून 'गदी' हा खुला बोल वाजविला जातो.


३) गन - डाव्या हाताच्या पंजाने 'ग' हा खुला नाद वाजवितात. तर उजव्या हाताची पाचही बोटे एकत्र जुळवून नागाच्या फण्याप्रमाणे हाताची स्थिती केली जाते. उजव्या हाताची मध्यमा, अनामिका व करंगळी ही तीन बोटे जुळवून शाईच्या मध्यभागी एक चतुर्थांश भागात बंद आघात करून 'न' हा बंद नाद वाजवितात. आणि यांच्या संयुक्त वादनाने 'गन' हा बंद बोल वाजविला जातो.


४) धिट - उजव्या हाताची मध्यमा, अनामिका व करंगळी ही तीन बोटे जुळवून शाईच्या मध्यभागी एक चतुर्थांश भागात दाब देऊन आघात केल्यानंतर 'ति' हे अक्षर वाजते. तर डाव्या हाताच्या पंजाने लवेवर खुला आघात करून लगेचच पंजा उचलून 'ग' हा वर्ण वाजविला जातो आणि 'ति', 'ग' यांच्या संयुक्त वादनाने 'धि' हे वर्ण वाजविले जाते, उजव्या हाताच्या तर्जनीने शाईच्या मध्यभागी दाब देऊन आघात केल्यानंतर 'ट' हे अक्षर वाजते. 'धि' व 'ट' यांच्या संयुक्तिक वादनाने 'धिट' हा बंद बोल वाजविला जातो.


५) तिटकत - 'ति' हे शाईवर वाजविले जाणारे बंद अक्षर आहे. उजव्या हाताची मध्यमा, अनामिका व करंगळी ही तीन बोटे जुळवून शाईच्या मध्यभागी एक चतुर्थांश भागात दाब देऊन आघात केल्यानंतर 'ति' हे अक्षर वाजते. उजव्या हाताच्या तर्जनीने शाईच्या मध्यभागी दाब देऊन आघात केल्यानंतर 'ट' हे अक्षर वाजते. ‘क’ हा बंद वर्ण आहे. डाव्या हाताची पाचही बोटे, बायाँवर जिथे पिठाची ओली कणिक लावलेली असते, त्या कणकेवर पुढील भागावर थाप मारून ‘क’ हा बंद वर्ण वाजविला जातो. तर 'त' हा वर्ण 'ट' प्रमाणेच, उजव्या हाताच्या तर्जनीने शाईच्या मध्यभागी दाब देऊन आघात करून वाजविला जातो. अशाप्रकारे हे चारही वर्ण एकापाठोपाठ वाजविले असता, 'तिटकत' हा बोल वाजतो.


६) धुमकिट - 'धु' हा वर्ण वाजविण्यासाठी उजव्या हाताच्या तर्जनीने शाईच्या मध्यभागी खुला आघात केला जातो, त्याचवेळी डाव्या हाताच्या पंजाने लवेवर खुला आघात करून लगेचच पंजा उचलून 'ग' हा वर्ण वाजविला जातो व यांच्या संयुक्तिक वादनाने 'धु' हा वर्ण वाजविला जातो. उजव्या हाताची मध्यमा, अनामिका व करंगळी ही तीन बोटे जुळवून शाईच्या मध्यभागी एक चतुर्थांश भागात दाब देऊन आघात केल्यानंतर 'म' हे वर्ण वाजविले जाते. 'क' प्रमाणेच डाव्या हाताची पाचही बोटे, बायाँवर जिथे पिठाची ओली कणिक लावलेली असते, त्या कणकेवर पुढील भागावर थाप मारून ‘कि’ हा बंद वर्ण वाजविला जातो तर उजव्या हाताच्या तर्जनीने शाईच्या मध्यभागी बंद आघात करून 'ट' हा वर्ण वाजविला जातो. अशाप्रकारे हे चारही वर्ण पाठोपाठ वाजवून 'धुमकिट' हा बोल वाजविला जातो.



अशाप्रकारे पखवाजातून बंद व खुले 'वर्ण' वाजविले जातात. ट, र, ती हे बंद वर्ण तर ग, दिं, धा हे बंद वर्ण वाजविले जातात. खुल्या व बंद वर्णांना एकत्रित करून वेगवेगळे बोल पखवाजावर वाजविले जातात.

Recent Posts

See All

पखवाज/पखावज -

भगवान शंकराजवळील डमरू हे सर्वात प्राचीन वाद्य आहे. या आधारावर पखवाजाची उत्पत्ती झाली. पखवाज या वाद्याच्या प्राचीनतेचा पुरावा ऋग्वेदात...

पाश्चात्त्य संगीतातील वाद्यांची थोडक्यात माहिती

पाश्चात्त्य अवनद्ध वाद्यांचा विकास कसा झाला याचे अध्ययन केल्यानंतर असे लक्षात येते, की या वाद्यांच्या निर्मितीमध्ये सुरुवातीला दगड, हाडे,...

Comments


bottom of page