तालांची वैशिष्टये -
१) तीनताल / त्रिताल - हा तबल्यातील व स्वतंत्र तबला वादनातील प्रमुख ताल आहे. विलंबित, मध्य व द्रुत अशा तीनही लयीत हा ताल वाजविला जातो. तीनताल हा 'ताल' असून तो बंद बाजाचा ताल आहे.
समान मात्रांचे खंड आणि खालीच्या मात्रेवर येणारे भरीचे अक्षर "धा", हे ह्या तालाचे वैशिष्ट्य आहे.
२) तिलवाडा - तिलवाडा हा 'ठेका' असून तो तबल्यावर वाजविला जातो. ह्या तालात स्वतंत्र वादन होत नाही. ख्याल गायनाच्या साथीसाठी हा ताल विलंबित व मध्य लयीत वाजविला जातो. हा बंद बाजाचा ताल आहे.
तिलवाडा तालातील बोलांच्या वेगळ्या मांडणीमुळे त्याच्या बोलांमध्ये 'दुप्पट' व 'चौपट' दिसून येते.
उदा. तत् धिं - दुप्पट आणि तिरकिट - चौपट
३) झपताल - हा तबल्यातील बंद बाजाचा ताल आहे. स्वतंत्र तबला वादन केले जाते. विलंबित, मध्य व द्रुत अशा तीनही लयीत या तालाचे वादन होते. एकल वादनाबरोबरच साथ-संगतीतही ह्या तालाला विशेष असे महत्व आहे.
असमान खंडांमध्ये तालाची रचना असल्यामुळे तालाला एक प्रकारचा डौलदारपणा व आकर्षकपणा येतो.
४) रुपक - हा तबल्यातील बंद बाजाचा ताल आहे. स्वतंत्र तबला वादन केले जाते. विलंबित, मध्य व द्रुत अशा तीनही लयीत या तालाचे वादन होते. एकल वादनाबरोबरच साथ-संगतीतही ह्या तालाला विशेष असे महत्व आहे.
या तालाचे अतिशय महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या तालाच्या 'पहिल्याच मात्रेवर' "काल/खाली" आहे. तसेच तालाचे असमान खंड असल्यामुळे तालाला डौलदारपणा आलेला आहे.
५) एकताल - हा तबल्यातील बंद बाजाचा ताल आहे. स्वतंत्र तबला वादन केले जाते. विलंबित, मध्य व द्रुत अशा तीनही लयीत या तालाचे वादन होते. एकल वादनाबरोबरच साथ-संगतीतही ह्या तालाला विशेष असे महत्व आहे.
एकतालात 'लयकारी' दिसून येते.
बोलांची रचना एकपट, दुप्पट, चौपट अशी केलेली आहे.
उदा. धिं - एकपट धागे - दुप्पट तिरकिट - चौपट
६) अध्धा-तीनताल - हा तबल्यातील बंद बाजाचा ताल आहे. स्वतंत्र तबला वादन केले जात नाही. साथ-संगतीत वाजवितात. मध्य लय व क्वचितच द्रुत लयीत वादन केले जाते.
या तालाचे वैशिष्ट्य म्हणजे हा त्रितालाचाच एक प्रकार आहे.
स्वतंत्र वादनात या ठेक्यावर आधारित वाजविण्यात येणारी रव/रौ अतिशय लोकप्रिय आहे.
७) आडा-चौताल - हा तबल्यातील बंद बाजाचा ताल आहे. स्वतंत्र तबला वादन केले जाते. विलंबित व मध्य लयीत या तालाचे वादन होते. एकल वादनाबरोबरच साथ-संगतीतही या तालाचा उपयोग केला जातो.
या तालाचे वैशिष्ट्य असे की तालाच्या बोलांमध्ये दुप्पट, चौपट दिसते. ह्याचा ठेका त्याच्या विभागांना छेद देऊन जातो.
यातील ठेक्याच्या शेवटच्या ८ मात्रा त्याच्या विभागांशी विसंगत आहेत.
उदा. कत् - दुप्पट तिरकिट - चौपट
८) झुमरा - हा तबल्यातील बंद बाजाचा ताल आहे. स्वतंत्र तबला वादन केले जात नाही. साथ-संगतीत वाजवितात. विलंबित लयीत या तालाचे वादन होते.
असमान खंडांमध्ये तालाची रचना असल्यामुळे तालाला एक प्रकारचा डौलदारपणा व आकर्षकपणा येतो.
तालाचे वैशिष्ट्य म्हणजे सम व खाली नंतर दीड मात्रेनंतर येणारा आघात "धा". यामुळे एक वेगळीच मजा आणि सौंदर्य या तालात निर्माण झाले आहे.
९) चौताल - हा पखवाजाचा प्रमुख ताल असून स्वतंत्र वादनातीलही ह्या तालाला महत्वाचे स्थान आहे. साथ-संगतीतही हा ताल वाजवितात. हा खुल्या बाजाचा ताल असून मध्य लयीत वाजविला जातो.
ठेक्याचे वैशिष्ट्य म्हणजे बोलांमध्ये एकपट, दुप्पट दिसून येते.
उदा. धा, धा, दिं - एकपट किट, तीट, कत - दुप्पट
१०) तेवरा - हा पखवाजाचा ताल असून क्वचितच एकल वादन केले जाते. साथ-संगतीतही हा ताल वाजवितात. हा खुल्या बाजाचा ताल असून सर्व साधारणपणे मध्य लयीत वाजविला जातो.
तालाचे एकमेव महत्वाचे वैशिष्टय म्हणजे या तालात "काल"/"खाली" नाहीये.
११) धमार - हा पखवाजाचा ताल असून या तालात स्वतंत्र वादन केले जाते. हा खुल्या बाजाचा ताल असून सर्व साधारणपणे मध्य लयीत वाजविला जातो. "धमार" गायनाच्या साथीसाठी हा ताल वाजविला जातो.
तालाचे वैशिष्ट्य म्हणजे असमान (विसंगत) खंड. (५-२-३-४ खंड). ज्यामुळे तालात वेगळेपणा व डौलदारपणा दिसून येतो.
आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे समेच्या व कालाच्या अगोदर असलेली एक विश्रांती/विराम (अवग्रह) होय.
१२) सुलताल - हा पखवाजाचा ताल असून या तालात स्वतंत्र वादन केले जाते. हा खुल्या बाजाचा ताल असून विलंबित व मध्य लयीत वाजविला जातो. क्वचितच साथीसाठी हा ताल वाजविला जातो. धृपद-धमार या गायन प्रकाराच्या व नृत्याच्या साथीसाठी या तालाचा उपयोग केला जातो.
या तालाचे वैशिष्ट्य म्हणजे बोलांमध्ये एकपट, दुप्पट दिसून येते.
उदा. धा, दिं ता - एकपट किट, गदी, गन - दुप्पट
१३) पश्तो - हा तबल्यातील बंद बाजाचा ताल आहे. स्वतंत्र तबला वादन केले जात नाही. साथ-संगतीत वाजवितात. प्रामुख्याने मध्य लयीत तालाचे वादन होते. "टप्पा" या गायन प्रकाराच्या साथीसाठी आणि उपशास्त्रीय संगीताच्या साथ-संगतीस या तालाचे वादन केले जाते.
तालाचे महत्वाचे वैशिष्टय म्हणजे या तालात "काल"/"खाली" नाहीये. तसेच समेनंतर व चवथ्या मात्रेनंतर येणारा एक अवग्रह (विराम) होय.
१४) दीपचंदी - हा तबल्यातील बंद बाजाचा ताल आहे. स्वतंत्र तबला वादन केले जात नाही. साथ-संगतीत वाजवितात. विलंबित व मध्य लयीत वादन केले जाते.
असमान खंडांमुळे डौलदारपणा निर्माण झाला आहे.
महत्वाचे वैशिष्टय म्हणजे प्रत्येक खंडांच्या शेवटी असलेला एक विराम (अवग्रह). ज्यामुळे तालाला एक विशिष्ट लय व सौंदर्य प्राप्त झालेले आहे.
१५) दादरा,केहरवा आणि धुमाळी - हे तबल्याचे ताल असून बंद बाजाचे ताल आहेत. स्वतंत्र वादन ह्या तालांमध्ये केले जात नाही. मध्य व द्रुत लयीत या तालांचे वादन होते. या तालांना "सुगम संगीताचे" ताल असेही म्हंटले जाते.
या तालांना स्वतःचा असा एक वेगळा छंद आहे. सोप्प्या बोलांचा (अक्षरांचा) आणि भाषेचा वापर ह्या तालांमध्ये केला गेलेला आहे.
धुमाळी तालात एकपट, दुप्पट दिसून येते.
उदा. धिं, धिं, - एकपट धागे, त्रक - दुप्पट
सुगम संगीतात या तालांना अतिशय महत्वाचे स्थान आहे. सुगम संगीत ह्या तालांशिवाय अपूर्ण आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.
Comments