top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

तानपूरा / तंबोरा –


तानपूरा / तंबोरा – तानपूरा या वाद्याला ‘तंबोरा’ असेही म्हणतात. हे वाद्य अतिशय प्राचीन आहे. महर्षी नारद तंबरू सदैव बाळगत असत. कालांतराने विकसत झालेले व प्राचीन देवादिकांच्या स्पर्शाने पुनीत झालेले असे तानपूरा हे संगीतातील अतिशय प्रसिद्ध व महत्वाचे वाद्य आहे. हे बोटांनी छेडून वाजविले जाते. तंबोऱ्याच्या भोपळ्याला ‘तुंबा’ असे म्हणतात. ह्या वाद्याचे तुंबा व दांडी असे दोन मुख्य अवयव असतात. 



तंबोऱ्याच्या विविध भागांची माहिती –

 

१] भोपळा – तंबोऱ्यामध्ये लहान मोठ्या आकाराच्या कडू भोपाळ्याचा उपयोग केलेला असतो. त्यास ‘तुंबा’ असे म्हणतात. तो वाळवून याचा अर्धगोल भाग तंबोऱ्याकरीता वापरला जातात.


२] तबली – भोपळ्याच्या चपट्या भागावर जी लाकडी तबकडी बसविलेली असते त्यास ‘तबली’ असे म्हणतात. यावरच घोडी किंवा ब्रिज बसविलेले असते. 


३] ब्रिज – तबलीपासून अंदाजे दोन बोटे उंच चौकोनी आकाराचा ब्रिज बसविलेला असतो. या ब्रिजला ‘घोडा’ असे म्हणतात. या पट्टीवर सारख्या अंतरावर चार खाचा असून त्यातून तंबोऱ्याच्या चार तारा, भोपळ्याच्या खालच्या बाजूला नेलेल्या असतात. 


४] दांडी – तंबोऱ्याचा भोपळा व तबली यांना लांब आणि आतून पोकळ असलेली दांडी बसविलेली असते. ही दांडी लाकडी असून त्याची लांबी अंदाजे साडे तीन फूट असते. ही दांडी अर्धगोलाकार असून तिचा पुढील भाग चपटा असतो. 


५] तारदान – तंबोऱ्याच्या घोडीपासून खाली येणारी,  तारा घालण्यासाठी चार छिद्र असलेली एक हस्तिदंताची पट्टी बसविलेली असते, तिलाच ‘तारदान’ असे म्हणतात. 


६] सांधा – तंबोऱ्याचा भोपळा व दांडी जेथे जोडलेली असते त्या भागास ‘सांधा’ वा ‘गुल’ असे म्हणतात. 


७] मेरू – दांडीच्या दुसऱ्या टोकापासून अलीकडे चार-पांच इंचावर दोन हस्तिदंती पट्ट्या असतात. त्यापैकी पहिल्या पट्टीवर तारांकरीता किंचित खाचा असतात. त्यातून तारा ओवून खुंटीवर गुंडाळण्यात येतात. 


८] तारगहन – पट्टीच्या मागे, खुंटीकडील बाजूकडे एक ते दिड इंच अंतरावर एक पट्टी असते. या पट्टीला चार छिद्रे असतात, या पट्टीलाच ‘तारगहन’ असे म्हणतात. 


९] खुंटया – तंबोऱ्याच्या चार तारांना बांधण्यासाठी चार छिद्रे असतात. या छिद्रात खुंटया खोचलेल्या असतात. तंबोऱ्याच्या तारा स्वरात लावण्याच्या वेळी त्यांचा स्वर कमी-जास्त करण्यासाठी या खुंटयांचा उपयोग होतो.


१०] मणी – तंबोऱ्याची घोडी व तारदान यांमधील उताराच्या जागेवर तारांमधून ओवलेले चार मणी असतात. तारा स्वरात लावण्याच्या वेळी अचूक स्वर मिळविण्यासाठी या मण्यांचा उपयोग होतो. 


११] जवारी – घोडीवर तारांना चिकटून खालच्या बाजूला चारही तारांना बारीक सुताचे किंवा रेशमी धाग्याचे तुकडे असतात. हे धागे मागे-पुढे करून तारांमधून झंकार निर्माण होतो.  


             अशा या तंबोऱ्याचा उपयोग शास्त्रीय गायनाच्या साथीसाठी होतो. तंबोऱ्यामुळे गायनास पोषक असे वातावरण निर्माण होते. यात जरी चार तारा असल्या तरी गायकासाठी आवश्यक असलेले सर्वच स्वर यातून निर्माण होतात. स्वरातील अखंडपणा टिकवून ठेवण्यासाठी या वाद्याचा उपयोग होतो.                 


Recent Posts

See All

शेहनाई/सनई -

हे एक सुषिर वाद्य असून मराठीत 'सनई' तर हिंदी भाषेत त्याला 'शेहनाई' असे म्हणतात. भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खाँ साहेबांनी या वाद्याला...

हार्मोनिअम –

हार्मोनिअम – हार्मोनिअम हे एक सुप्रसिद्ध सुशिर वाद्य आहे. या वाद्याला मराठीत ‘संवादिनी’ असे म्हणतात. ‘हार्मोनी’ या शब्दापासून...

Commentaires


bottom of page