top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

व्याख्या-आमद, त्रिपल्ली, चलन, कमाली-चक्रदार, चक्रदार, गत-कायदा, परण, पेशकार, नौहक्का, रौ,बाँट,लय


१) आमद - आमद म्हणजे नृत्याची साथ करताना तबल्यावर अथवा पखवाजावर प्रारंभी जी सुंदर व आकर्षक बोलरचना वाजविली जाते, त्यास 'आमद' किंवा 'सलामी' असे म्हणतात.

ही रचना कत्थक नृत्यात दिसून येते. फारसी भाषेत 'आमद' या शब्दाचा अर्थ 'आगमन' असा होतो.

नृत्याबरोबर तबल्यावर साथ-संगत करताना तबला वादनाची सुरुवात ज्या जोरकस, खुल्या आणि आकर्षक बोल-समूहाची तिहाईयुक्त रचना वाजवून होते, त्या बोल-रचनेस 'आमद' असे म्हणतात.

स्वतंत्र तबला वादनाची सुरुवातही 'आमद' वाजवून करण्याची पद्धत आहे.


२) त्रिपल्ली - या रचनेत लयींचे तीन दर्जे असतात. म्हणजेच तीन वेगवेगळ्या लयी या रचनेत दिसून येतात. पहिला भाग सर्वसाधारणपणे मध्य लयीत असतो. दुसऱ्या भागात पहिल्या भागाच्या लयीची दीडपट असते तर तिसऱ्या शेवटच्या भागात पहिल्या भागाच्या लयीची दुप्पट असते. कधी कधी या रचनेतील तीनही पल्ल्यांमधील बोल वेगवेगळे असतात तर कधी कधी एकच बोल समूह तीन वेगवेगळ्या लयीत वाजवून त्रिपल्ली बनविली जाते.


३) चलन - चलन हा एक विस्तारक्षम वादन-प्रकार आहे. मुळात चलन हा एक प्रकारचा छंद असतो आणि तो लग्गी या वादन-प्रकाराच्या जवळ जाणारा असतो. पण हा प्रकार धीम्या लयीत सादर करून पुढे या चलनावर आधारित 'रव' बांधली जाते.


४) कमाली चक्रदार - ही एक अशी रचना आहे की ज्याच्या तिहाईच्या चक्राचा शेवट तीन 'धा' ने ( धा, धा, धा ) होतो. या चक्रदाराचे वैशिष्ट्य असे आहे की, यातील पहिल्या आवर्तनातील, पहिल्या चक्रातील, तीन धा पैकी पहिला 'धा' समेवर, दुसऱ्या आवर्तनातील, दुसऱ्या चक्रातील, तीन धा पैकी दुसरा 'धा' समेवर तर तिसऱ्या चक्रातील, तीन धा पैकी तिसरा 'धा' समेवर येतो, अशा आकर्षक व वैशिष्ट्यपूर्ण रचनेस 'कमाली चक्रदार' असे म्हणतात.

या चक्रदारात एकूण 'सत्तावीस धा' असतात. या चक्रदारात 'पहिला धा, चौदावा धा आणि सत्ताविसावा धा' समेवर येतो.


५) चक्रदार - एखादा बोल-समूह व त्याला जोडलेली एक तिहाई, अशी रचना समान अंतराने तीन वेळा वाजवल्यास व शेवटचा धा समेवर आल्यास, त्या रचनेस 'चक्रदार' असे म्हणतात.

चक्र म्हणजे वर्तुळ. वर्तुळात्मक रचना असलेली प्रदीर्घ तिहाई म्हणजे 'चक्रदार' होय.

चक्रदार नेहमी समेपासून सुरु होतो व समेवर समाप्त होतो. स्वतंत्र तबला वादनात सर्वसाधारणपणे, विशेष प्रचलित अशा चक्रदारांची लांबी खूप दीर्घ असते; तरीसुद्धा लहान चक्रदार एका आवर्तनांचासुद्धा असू शकतो.

चक्रदाराचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील प्रत्येक चक्रात (पल्ल्यात) तिहाई असते, आणि अशा तीन चक्रांचा मिळून एक चक्रदार होतो. चक्रदार हा प्रकार कत्थक नृत्याच्या साथ-संगतीमधून स्वतंत्र तबला वादनात रूढ झाला असावा.


६) गत कायदा - 'गत' या प्रकारात अंतर्भूत असलेल्या जड (जाड) बोलांची रचना ज्यावेळी कायद्यासारखी करून कायद्याच्या नियमाला अनुसरून जेव्हा त्याचा विस्तार केला जातो तेव्हा त्या रचनेला 'गत कायदा' असे म्हणतात.

हे रचनाप्रकार लखनौ व फरुखाबाद बाजामध्ये आढळतात. ही विस्तारक्षम रचना असली तरीही कायद्याइतका याचा विस्तार होत नाही. कारण यासाठी जे बोल वापरलेले असतात ते 'गती'चे जड (जाड) बोल सहजासहजी वरच्या लयीत न जाणारे असतात.


७) परण - वजनदार, सशक्त, खुल्या बोलांची, समृद्ध आकाराची, तिहाईने शेवट होणारी, एकापेक्षा जास्त पल्ल्यांची (आवर्तनांची) अर्थपूर्ण विस्तृत रचना म्हणजे 'परण' होय.

परण हा शब्द 'पर्ण' (पान) या शब्दापासून निर्माण झाला असावा. परण हे पखवाज वादनात जास्त दिसून येते. परण ही अशी रचना आहे की ती कोणत्याही मात्रेपासून सुरू होऊ शकते. जसं झाडाच्या पानाचं देठ आणि त्याच्यातून पानभर पसरलेल्या प्रमाणबद्ध शिरा दिसतात, त्याचप्रकारे 'परण' ही रचनासुद्धा वजनदार, प्रमाणबद्ध बोलांच्या आवर्तनांनी, प्रमाणबद्ध केली जाते.


परणाचे चार प्रकार आहेत ;

i) साथ परण ii) गत परण iii) बोल परण iv) ताल परण


८) पेशकार - 'पेशकार' हा फारसी भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ 'पेश' करणे म्हणजेच सादर करणे असा होतो.

'पेशकार' म्हणजे, ठेक्याशी नाते दर्शवणारी, धिम्या लयीत (विलंबित) प्रस्तुत होणारी, डगमगत्या लयीत चालणारी, नाद-लय यांच्या विविध रूपांच्या निर्मितीला मुभा देणारी, खाली-भरीयुक्त आणि विस्तारक्षम रचना जी प्रामुख्याने उपजेतून विस्तारत जाणारी, तसेच स्वरमय अंत्यपद असणारी रचना.

तसेच प्रत्येक दोन मात्रांच्या अंतरामध्ये लयांगाचे आंदोलन देणारा, स्वतंत्र तबला वादनात सुरवातीला वाजविला जाणारा, वादनप्रकार म्हणजे 'पेशकार'.


९) नौहक्का - जेव्हा एखादी संपूर्ण तिहाई तीनवेळा वाजवून समेवर येते, तेव्हा त्यास 'नौहक्का' असे म्हणतात.

अशी रचना ज्यात नऊ वेळा 'धा' समान अंतरावर असून, ती रचना वाजविल्यावर त्याचा 'शेवटचा' धा' समेवर येतो, अशा आकर्षक व वैशिष्ट्यपूर्ण रचनेस 'नौहक्का' असे म्हणतात.


१०) रौ - 'रौ' हा रेल्याचाच एक प्रकार आहे. 'रौ'ला 'रव' असेही म्हणतात.

तबला वाजविताना तबला व डग्गा यातून एकसुरी नादाची, आस व अतूट गुंज व त्यांचा सुंदर मिलाप म्हणजेच 'रौ'.

'रौ' ही साधारणतः एखाद्या चलनावर आधारलेली असते. सुरुवातीला ते चलन वाजवून नंतर त्या चलनाचा आभास निर्माण करणारा 'रव-रेला' पेश केला जातो.


११) बाँट - ज्याप्रमाणे एखादा कायदा वाजविल्यावर त्याचे पलटे वाजविले जातात, त्याप्रमाणे जेव्हा लग्गीमधल्या बोलांना उलट-सुलट, पुढे-मागे जागा बदलून वाजविले जाते, तेंव्हा त्यास 'बाँट' असे म्हणतात.

लग्गीच्या पलट्यांना 'बाँट' असे म्हणतात.

लग्ग्यांमध्ये कमी अक्षरं असतात, त्यामुळे शब्दांची जागा बदलून, ज्या लग्ग्या वाजविल्या जातात, त्यास 'बाँट' असे म्हणतात.

खाली-भरी यांचादेखील प्रभावी उपयोग या 'बाँट' मध्ये दिसून येतो.

जेव्हा तबल्यातील खाली-भरीयुक्त अशा बोलांच्या बंदिशी निरनिराळ्या लयीत वाजविल्या जातात, तेव्हा त्याला 'बाँट' असे म्हणतात.


१२) अतीत - अनपेक्षित स्वरूपात समेच्या पश्चात किंचित काळानंतर पूर्ण होऊन, सुखद धक्का देणाऱ्या रचनेस 'अतीत' असे म्हणतात.

अगोदर ठेका सुरु होतो व नंतर संगीत. तालावर्तनात समेनंतर येणाऱ्या आघातयुक्त जागेस 'अतीत' असे म्हणतात.

गायनात अथवा वादनात जेंव्हा सम निघून गेल्यानंतर सम दाखविली जाते, तेंव्हा त्यास 'अतीत' असे म्हणतात.


१३) लय - स्वर आणि लय यांचा उपयोग करून सादर केल्या जाणाऱ्या कलेस 'संगीत' असे म्हणतात. अर्थात संगीतात लयीला अनन्यसाधारण महत्व आहे. दैनंदिन जीवनात दृष्टीस पडणाऱ्या अनेक क्रियांमधून उदा. चालणे, उड्या मारणे, झाडांच्या पानांची सळसळ, चेंडूचे टप्पे, आकाशातील ढगांचा संचार इ., आपल्याला गतीची जाणीव होते. या क्रियांपैकी काहींमध्ये एक प्रकारचे सातत्य दिसून येते. उदा. घडाळ्याची टिकटिक, हृदयाचे ठोके, सूर्योदय-सूर्यास्त, शिस्तबद्ध कवायती इ. क्रियांमधून आपल्याला गतीच्या नियमित अशा पुनरावृत्तीची जाणीव होते.

गतीच्या या नियमित पुनरावृत्तीस संगीतात 'लय' असे म्हणतात.

लय निर्माण होण्यासाठी सुरवातीस दोन आघातांची गरज असते. या आघातांमधील अंतर जेव्हा एक-समान असते तेव्हा त्या गतीस 'लय' असे म्हणतात व आघातांना 'मात्रा' असे म्हणतात.


लयीचे प्रकार - लयीतील आघातांमध्ये किंवा मात्रांमध्ये जे अंतर असते त्यावरून लयीचा प्रकार ठरतो. लयीचे मुख्य प्रकार व त्याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे :


लयीचे मुख्य तीन प्रकार आहेत;


१) विलंबित लय

२) मध्य लय

३) द्रुत लय


१} विलंबित लय :- जेव्हा एखाद्या लयीमध्ये दोन मात्रांमधील अंतर खूप जास्त असते तेव्हा त्या लयीस 'विलंबित लय' असे म्हणतात.

विलंबित लयीची गती फारच कमी असते. स्वतंत्र तबला वादनातील पेशकार, शास्त्रीय संगीतातील बडा ख्याल आणि वाद्य संगीतातील मसितखानी गत हे प्रकार विलंबित लयीत सादर केले जातात.


२} मध्य लय :- जेव्हा एखाद्या लयीमध्ये दोन मात्रांमधील अंतर मध्यम किंवा साधारणपणे एका सेकंदाला एक मात्रा असे असते तेव्हा त्या लयीस 'मध्य लय' असे म्हणतात.

मध्य लयीची गती मध्यम असते. स्वतंत्र तबला वादनातील कायदा, शास्त्रीय संगीतातील छोटा ख्याल आणि वाद्य संगीतातील रजाखानी गत हे प्रकार मध्य लयीत सादर केले जातात.


३} द्रुत लय :- जेव्हा एखाद्या लयीमध्ये दोन मात्रांमधील अंतर खूप कमी असते तेव्हा त्या लयीस 'द्रुत लय' असे म्हणतात.

द्रुत लयीची गती खूपच जास्त असते. तबलावादनातील रेला, लग्गी, शास्त्रीय गायनातील तराणा आणि वाद्य संगीतातील 'झाला', हे सर्व प्रकार द्रुत लयीत सादर केले जातात.

संगीतातील लय दाखवण्यासाठी जी वाद्य वापरली जातात त्यांना 'लय वाद्ये' म्हणतात. तबला, पखवाज, ढोलक, ढोलकी, नगारा, टाळ, चिपळ्या इ. अनेक तालवाद्ये संगीताच्या विविध प्रकारांमध्ये वाजविली जातात.


१४) लयकारी - मूळ लय कायम ठेवून त्या लयीतून दुसऱ्या जातींची व वेगवेगळ्या लयींची निर्मिती झाल्यास त्याला 'लयकारी' असे म्हणतात.

ताल विस्तार करताना मूळ लय कायम ठेऊन, ठेक्यातील अक्षरसमूहात कमी-अधिक अक्षरांचा बदल करून वाजविले तर ते वादन प्रभावी ठरते. अक्षरं किंवा लघूंमध्ये बदल केले तर लयकारी होते.

आड, बिआड, कुआड, सरळ आणि वक्र लयकारी हे लयकारीचे प्रमुख प्रकार आहेत.



Recent Posts

See All

व्याख्या - मात्रा, ताल, सम, टाळी, खाली/काल, विभाग/खंड, दुगुन/दुप्पट, आवर्तन

१) मात्रा - ताल मोजण्याच्या परिमाणास 'मात्रा' असे म्हणातात. २) ताल - संगीतामध्ये काल मोजण्याच्या परिमाणास 'ताल' असे म्हणतात. गायन, वादन...

व्याख्या - कायदा, रेला, पलटा, तिहाई, मुखडा, लग्गी, उठाण, चक्रदार, मोहरा

१} कायदा :- तालाच्या खाली-भरीला अनुसरून असणाऱ्या व्यंजनप्रधान शब्द व त्यास स्वरमय अंत्यपद असणाऱ्या, सर्वसाधारणपणे मध्य किंवा द्रुत लयीत...

Comments


bottom of page