top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

विस्तारक्षम आणि अविस्तारक्षम रचनांचा सिद्धांत


अ ] पेशकार -'पेशकार' म्हणजे, ठेक्याशी नाते दर्शवणारी, धिम्या लयीत (विलंबित) प्रस्तुत होणारी, डगमगत्या लयीत चालणारी, नाद-लय यांच्या विविध रूपांच्या निर्मितीला मुभा देणारी, खाली-भरीयुक्त आणि विस्तारक्षम रचना जी प्रामुख्याने उपजेतून विस्तारत जाणारी, तसेच स्वरमय अंत्यपद असणारी रचना.

तसेच प्रत्येक दोन मात्रांच्या अंतरामध्ये लयांगाचे आंदोलन देणारा, स्वतंत्र तबला वादनात सुरवातीला वाजविला जाणारा वादनप्रकार म्हणजे 'पेशकार'. 'पेशकार' हा फारसी भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ 'पेश' करणे म्हणजेच सादर करणे असा होतो. पेशकारामध्ये तालाचे स्वरूप स्पष्ट दिसते. पेशकारामध्ये लयकारीयुक्त वादन केले जाते. पुढे वाजवल्या जाणाऱ्या संपूर्ण तबला वादनाची 'पेशकार' ही लहान व अतिशय प्रमाणबद्ध अशी आवृत्ती असते. संपूर्ण वादनात वापरले जाणारे बोल व लयकारी यांचा आविष्कार पेशकारात दाखविला जातो.

स्वतंत्र तबला वादनात वापरले जाणारे सगळेच बोल, बोलसमूह, बहुविध लयबंध, जाती, इ.चा समावेश पेशकारामध्ये केला जातो. त्यामुळेच संपूर्ण तबला वादनाची 'पेशकार' ही एक अमूर्त मांडणी असते. पेशकारास स्वतंत्र तबला वादनामध्ये अतिशय महत्वाचे स्थान आहे.


कायद्याच्या तुलनेत पेशकारामध्ये नादांची, लयींची, विविध नादाकृतींची रचना करण्याची मोकळीक तबला वादकास असते. त्यामुळे विस्तार करताना पेशकार कधीतरी भरकटतो तर कधी जखडला जातो आणि म्हणूनच पेशकाराचा विस्तार हे अतिशय आव्हानात्मक काम असते. पेशकार वादन ही संपूर्ण तबला वादनाची लहान प्रतिकृती मानली जाते, याचे कारण म्हणजे संपूर्ण तबला वादन हे विलंबित लयीपासून ते द्रुत लयीपर्यंत वाजणाऱ्या विविध प्रकारच्या जातींच्या बोलांची एक मालिका असते. पेशकार वादनामध्ये, विलंबित ते द्रुत प्रवास हा, विविध बोल आणि जाती प्रकारांच्या माध्यमातून संक्षिप्तपणे सादर केला जातो. खाली-भरीचे नियम इथे कायद्याप्रमाणे कठोर नसतात. त्याचप्रमाणे प्रत्येक बोलाच्या शेवटी येणारे क्रियापद आणि आमद यांतही बदल करता येतो व सुरवातीस जी लय वाजविली जाते त्या लयीच्या चढत्या क्रमाने दर्जे होत जातात. सुरुवातीलाच बोल वरच्या लयीत वाजविण्यास मुश्किल असतात आणि आपण वाजवित असलेले बोल, त्यांची लय, वजन आणि स्पष्टता इ. लोकांना कळण्यासाठी पेशकार वाजविला जातो. लयीचा दर्जा किती पटीने वाढणार आहे, अतिद्रुत लयीत वाजणाऱ्या बोलांची निकास व लय इ. गोष्टींचा अंदाज येण्यासाठी पेशकार वाजविला जातो.


सर्वसाधारणपणे पेशकार हा विलंबित अथवा मध्य लयीत वाजविला जातो. त्यामुळे प्रत्येक अक्षरांचे, बोलांचे व पंक्तींचे नाद अतिशय सुस्पष्ट आणि ठळकपणे पेशकारात वाजविता येतात. पेशकारात योजिल्या गेलेल्या अक्षरांचे व बोलांचे स्वरूप विविध प्रकारचे असतात. ठाय लयीपासून ते अंतिम द्रुत लयीपर्यंत वाजविल्या जाणाऱ्या बंदिस्त आणि कल्पना शक्तीला चालना देणाऱ्या असंख्य रचनाकृतींच्या भव्य वास्तुचा, 'पेशकार' हा पाया आहे. कुठलाही तबलिया त्याच्या तबला वादनात, लयीमध्ये किती प्रमाणात मुरलेला आहे, दोन्ही हातांमध्ये वजनदारपणा, गोडवा आणण्यासाठी त्याने कितपत परिश्रम घेतलेले आहेत, या सर्वांची पूर्ण कल्पना पेशकार वादनावरून दिसून येते. पेशकाराच्या प्रमुख रचनेची योजना, दायाँ-बायाँ वर जागोजागी उमटणाऱ्या, जवजवळ सर्व प्रकारच्या नादांनी युक्त अशी असते. पेशकारामध्ये सर्वसाधारणपणे धिं S क्ड धिंधा, तीं S क्ड तींना, धा S क्ड धाधींना, धाधा धींना, धाधा तींना, धा S तीत, घिडा S न, किटतक, त्रक, तिरकिट, तींग तिनाकीन, तीटकिट, क्डधा तीटकिट, धींना-तींना, अशा अनेक विविधरूपी बोलांचे मुक्तपणे वादन केले जाते.

पेशकाराच्या प्रारंभीच्या बोलांमध्ये, घराण्यानुसार फरक असला तरी, विस्तार करताना, तालाचे बंधन वगळता कुठलेच बंधन नसते. त्यामुळे वादनकाराच्या प्रतिभेला, त्याच्या कल्पनाशक्तीला पेशकार वाजविणे म्हणजे एक आव्हानच असते. पेशकारातून वादकाच्या हाताची तयारी, वजन, निकास, बोलांची स्पष्टता, लयकारींवरील प्रभुत्व, प्रतिभाशक्ती, कल्पनाशक्ती दिसून येते. पेशकाराच्या शेवटी एखादा कायदा अथवा रेला वाजवून पेशकाराचे वादन संपविले जाते.


भाषेचा पेशकार, गणिती पेशकार, लय-प्रधान पेशकार आणि लघु-गुरुयुक्त पेशकार, हे पेशकाराचे काही प्रकार आहेत.


अप्रतिम पेशकारातला गोडवा, त्यात आढळून येणारी वादनकाराची अमोघ कल्पनाशक्ती, प्रतिभाशक्ती, वादनशैली या सर्व गोष्टी कागदावरती कधीच लिहिता येऊ शकत नाहीत. त्या, गुरूंच्या योग्य मार्गदर्शनाखाली, अतिशय मेहनतीने, रियाज करून, ऐकून, समजून घेऊनच वाजविता येऊ शकतात आणि तेही, पेशकार एकदाच ऐकून येणार नाहीत, तर उत्तोमोत्तम तबला वादकांनी वाजविलेले पेशकार सतत बारकाईने ऐकल्यावरच, पेशकार येण्यास आणि कळण्यास मदत होईल. भारतीय संगीत क्षेत्रात फार पूर्वीपासून रूढ झालेला एक खानदानी उपदेश आहे. 'देखना, सुनना, परखना, और बजाना'. हा उपदेश पेशकारासाठी अतिशय उपयुक्त आणि योग्य आहे. 'जे वाजविले जात आहे त्याचे बारकाईने निरीक्षण करा, श्रेष्ठ दर्जाचे ऐका, प्रत्येक अक्षराची, बोलाची निकास कशी आहे, याचे मन एकाग्र करून पारख करा, शेवटी रियाज करा व या सर्व गोष्टी पडताळून, त्यात सुधारणा करून वाजवीत राहा'. असे वादन म्हणजेच उत्कृष्ट दर्जाचे वादन पेश करणे होय.

Recent Posts

See All

गत

ड] गत - समेपूर्वी संपल्यामुळे पुनरावृत्ती करताना येणारी व त्यामुळे निसर्गातील विविध चालींचा ( movements ) प्रत्यय देणारी बंदिश म्हणजे...

रेला

क] रेला - ज्या रचनेमधील बोल शीघ्र ( द्रुत ) गतीने वाजू शकतात, अंत्यपद सर्वसाधारणपणे व्यंजन असते, जी रचना विस्तारक्षम असून तालाला अनुसरून...

कायदा

ब ] कायदा - जी रचना तालाच्या खाली-भरीला अनुसरून असते, ज्याचे अंत्यपद स्वरमय असते, अशा विस्तारक्षम रचनेस 'कायदा' असे म्हणतात. विस्तार...

Comments


bottom of page