top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

उस्ताद अमीर हुसेन खॉं साहेब


अ} जन्म आणि बालपण :- इस. सन. १८९९ साली मेरठ जिल्ह्यातील बनखंडा या खेड्यात उस्ताद अमीर हुसेन खॉं साहेबांचा जन्म झाला. त्यांचे वडील उस्ताद अहमद बक्श खॉं हे एक नामवंत सारंगी वादक होते. दक्षिण हैद्राबादच्या निजामाकडून दरबारी वादक म्हणून नियुक्ती झाल्यामुळे उस्ताद अमीर हुसेन खॉं साहेबांचे बालपण हैदराबादेत गेले. मुळातच लयकारीची आवड असल्यामुळे त्यांनी तबला वादनाचे प्राथमिक शिक्षण आपल्या वडलांकडून घेतले.


ब} प्रगत शिक्षण, रियाझ :- सुप्रसिद्ध तबला नवाझ उस्ताद मुनीर खॉं साहेब हैद्राबादला आपल्या बहिणीकडे (अमीर हुसेन खॉं साहेबांच्या आईकडे) वरचेवर मुक्काम करीत असत. एकदा छोट्या अमीरचा तबला ऐकून ते खुश झाले व त्याला तालीम देण्यास सुरवात केली. मुनीर खॉं साहेब हैद्राबादला येऊन अमीर हुसेन खॉं साहेबांना तालीम देत असल्यामुळे गुरूंसमोर बसून रियाझ करण्यात किंवा शिकण्यात वेळोवेळी ३ ते ४ महिन्यांचा खंड पडित असे. त्यामुळे वैतागून जाऊन अमीर हुसेन खॉं साहेब घरच्यांना न सांगताच मुंबईस आपल्या मामांकडे (उ. मुनीर खॉं साहेबांकडे) पळून आले व त्यानंतर १९१४ पासून त्यांची तालीम अखंड चालू राहिली. कठोर रियाझ, मनन, चिंतन करून उस्ताद अमीर हुसेन खॉं साहेबांनी तबल्याचे ज्ञान मिळवले, एवढेच नव्हे तर अतिशय उदार स्वभावाने त्यांनी अनेक शिष्य घडवले, अनेक शिष्यांना तबल्याचे ज्ञान दिले.


क} वादन वैशिष्ट्ये :- हैद्राबाद मध्ये राहत असताना ते प्रामुख्याने पूरब-शैलीचे तबला वादन करीत असत. खॉं साहेब हे पेहलवानी तब्येतीचे (ताकदवर) असल्याने त्यांनी लखनौ-फरुखाबाद शैलीचा खुला बाज अतिशय रियाझ करून मेहनतीने आत्मसात केला आणि एक प्रभावी तबला वादक म्हणून नावारूपास आले. उस्ताद अमीर हुसेन खॉं साहेबांनी अनेक कायदे, रेले अतिशय तयारीने, ताकदीने आत्मसात केले व श्रोत्यांसमोर सादर केले. परंतु त्यांची खरी ताकद, सौंदर्य त्यांच्या गत-तुकडे वाजवण्यात दिसे. अनेक जुन्या व वेगवेगळ्या घराण्यांच्या बंदिशी, गत-तुकडे ते रचनाकारांच्या नावासह पढंत करून वाजवीत असत. गतींचे अनेक प्रकार त्यांना अवगत होते. केवळ गत-तुकडे, बंदिशी ते दोन-दोन तास पेश करून रसिक-श्रोत्यांना मंत्र-मुग्ध करीत असत. तबला वादनातील सर्व प्रकार ते अतिशय तयारीने सादर करीत असत. परंतु गतिमान तबला वादन हे त्यांचे खास वैशिट्य असून अतिशय वरच्या लयीत ते एकल तबला वादन करीत असत. अतिशय विपुल आणि समृद्ध भाषेचा वापर त्यांच्या तबला वादनात दिसून येत असे. वयाच्या चोवीसाव्या वर्षी उस्ताद अमीर हुसेन खॉं साहेब तबला वादनात एवढे पारंगत झाले होते की मुनीर खॉं साहेबांनी मुंबईस तार पाठवून त्यांना रायगढला बोलाविले आणि रायगढ़च्या महाराजांना त्यांचा तबला ऐकवला. रोज दोन तास केवळ कायदे, रेले वाजवून आठव्या दिवशी त्यांनी सहा तास संपूर्ण तबला गत-तोड्यांसह त्यांना ऐकवला. त्यांच्या आकर्षक व तयार वादनावर खुश होऊन महाराजांनी त्यानं एक हजार अश्रफींची थैली दिली.


ड} योगदान व शिष्य परिवार :- उत्कृष्ट वादक, रचनाकार, शिक्षक आणि माणूस ह्या सर्व बाबींमध्ये श्रेष्ठत्वास पोहचलेला त्यांच्यासारखा कलावंत लाखात एखादा सापडेल. त्यांनी केलेल्या अगणित रचना त्यांच्या कल्पना शक्तीची, अमोघ प्रतिभेची आणि विद्वत्तेची साक्ष देतात. मुस्लिम कलावंतांच्या कुरेशी जमातीच्या चौधरी पदाचा मान त्यांना मिळाला होता. उस्ताद अमीर हुसेन खॉं साहेबांच्या रचना ऐकून त्यांच्यावर खुश होऊन उस्ताद मुनीर खॉं साहेबांनी त्यांच्या मागे (नंतर) खलिफा पदाचा मान त्यांना दिला होता. तबला-वाद्य आणि वादन कला आजही लोकप्रिय असल्याचे महत्वाचे कारण उस्ताद अमीर हुसेन खॉं साहेब यांनी तयार केलेले अनेक शिष्य. ते अतिशय श्रेष्ठ गुरु होते. त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना आपल्याकडील विद्या अगदी सढळ हातांनी दान केली. उस्ताद अमीर हुसेन खॉं साहेबांचे अनेक शिष्य नावारूपास आलेले आहेत. त्यात प. अरविंद मुळगांवकर, पं. पंढरीनाथ नागेशकर, पं. यशवंत केरकर, उ. बाबासाहेब मिरजकर, पं. निखिल घोष, पं. पांडुरंग साळुंके, पं. सुधीर संसारे, सुपुत्र फकीर हुसेन खॉं आणि डॉक्टर श्रीम.आबान इ मिस्री यांचा समावेश होतो.


इ} मृत्यू :- अशा या महान तबला वादकाचे, दि. ५ जानेवारी १९६९ रोजी यकृताच्या कर्करोगाने मुंबईत निधन झाले.

Recent Posts

See All

उस्ताद गामे खॉं

१} बालपण आणि शिक्षण :- दिल्ली घराण्याचे सुप्रसिद्ध तबला नवाझ मरहूम उस्ताद छोटे काले खॉं साहेबांचे हे सुपुत्र. वयाच्या पाचव्या वर्षांपासून...

उस्ताद इनाम अली खॉं साहेब

१} जन्म :- उस्ताद ईनाम अली खॉं साहेबांचा जन्म १२ नोव्हेंबर १९२८ रोजी झाला. दिल्ली घराण्याचे मशहूर तबला नवाझ उस्ताद गामे खॉं साहेबांचे हे...

Comments


bottom of page