top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

उपशास्त्रीय संगीताची साथ-संगत


उपशास्त्रीय संगीतामध्ये ठुमरी, टप्पा, दादरा, नाट्यसंगीत इ. गायन प्रकार येतात.

उपशास्त्रीय संगीताची साथ-संगत करण्यासाठी तबलावादकाला खूप मेहेनत घ्यावी लागते कारण, शास्त्रीय संगीतासाठी केवळ ठेका वाजविला तरी चालतो, परंतु उपशास्त्रीय संगीत, सुगम संगीत, नाट्य संगीत या गीत प्रकारात दादरा, केहेरवा, रूपक, एकताल, तिनताल, अध्धा, धुमाळी या तालांचा वापर होतो.

गीतांच्या अंगानुसार त्यांचे वजन पाहून बल वाजविले जातात. उठाण, लग्गी, लग्गीचे प्रकार वाजवून या गीतप्रकारांची व उपशास्त्रीय संगीताची साथ-संगत करावी लागते. हाताच्या तयारी बरोबरच समयसूचकता व प्रसंगावधान राखणे खूपच महत्वाचे असते. उपशास्त्रीय संगीताची साथ-संगत करताना तबलावादकाला आपले कला-गुण दर्शविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. असे असले तरी, काळजीपूर्वक, डोळसवृत्तीने व जबाबदारीने साथ-संगत करणे हे कलाकाराच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचे लक्षण असते. उपशास्त्रीय संगीतातल्या प्रकारांमध्ये म्हणजेच ठुमरी, दादरा, टप्पा इत्यादींमध्ये रस-निर्मिती होते. नवरसांपैकी जवळ जवळ सगळ्याच रसांचा अंतर्भाव या गायन प्रकारांमध्ये होतो, त्यामुळे त्याला अनुरूप अशी साथ-संगत करणे गरजेचे असते.

दायाँ-बायाँचे संतुलन, नादांचा चढ-उतार, बोलांची स्पष्टता, वजन या सर्वच गोष्टींना उपशास्त्रीय साथ-संगतीमध्ये महत्व असते. नेहेमीच्या तालांबरोबरच दीपचंदी, चाचर, जत इ. तालांचाही वापर या साथ-संगतीमध्ये होतो.



१) ठुमरी - ठुमरी या गीत प्रकाराला उपशास्त्रीय संगीतात अग्रगण्य स्थान आहे. ठुमकत चालणाऱ्या व अभिनयासह गीत आळविणाऱ्या रमणिकेच्या अविष्कारातून 'ठुमरी' चा जन्म झाला. 'ठुमकणे' या क्रियापदाशी 'ठुमरी' या शब्दाचा संबंध जोडला गेला आहे. लखनौ नवाब वाजिद अली यांनी 'अख्तर पिया' या नावाने अनेक ठुमऱ्या रचल्या व त्या खूप लोकप्रिय झाल्या. म्हणूनच त्यांना या शैलीचे जनक म्हंटले जाते. या गीत प्रकाराची प्रकृती चंचल असून ही गायकी शृंगाररस प्रधान आहे. हा गीत प्रकार शब्दप्रधान व भावप्रधान आहे. यातील विविध भाव दर्शविण्यासाठी रागामध्ये फेरफार करण्याची मुभा असते. त्यामुळे हा गीत प्रकार उपशास्त्रीय संगीतात येतो. या गीत प्रकारात प्रेम-रस, विरह-रस, राधा-कृष्ण लीला यांचे वर्णन असते. ठुमरी म्हंटल्यानंतर दीपचंदी तालाचे नाव आपल्यासमोर येते. कारण बहुतांशी ठुमऱ्या ह्या दीपचंदी तालातच गायल्या जातात. याचबरोबर पंजाबी, अध्धा, दादरा, केहेरवा वा रूपक अशा विविध तालातसुद्धा ठुमरी गायक, विविध भाव छटांचे दर्शन घडवीत असतो. त्याचे स्थायी व अंतरा असे दोन भाग असतात. बोल अंगाने आलाप करत ठुमरी रंगतदार केली जाते, अशावेळी तबलावादक शुद्ध ठेका वाजवून साथ करीत असतो. स्थायी व अंतरा पूर्ण

केल्यानंतर गीताची पहिली ओळ गायली जाते. ही ओळ चालू झाल्यावर तबलावादक विविध लग्ग्या वाजवून ठुमरीची रंगत वाढवीत असतो. गायक, शेवटी एखादी जलद तान घेऊन ठुमरी पूर्ण करतो, त्याचवेळी तबलावादक तिहाई वाजवून पूर्णत्वाची पावती देतो. म्हणजे लग्गी-दौड करून ठुमरी संपवितात. खमाज, देश, तिलंग, पिलू, काफी या रागांत ठुमरी गायली जाते.


२) टप्पा - चमत्कृतीपूर्ण, चपळ व वेगळी गीतशैली म्हणून हा गीतप्रकार प्रसिद्ध आहे. पंजाबकडील वाळवंटी भागाला 'टप्पा' असे नाव आहे. तेथील जन-जीवन उंटाच्या साहाय्यामुळे साकार होते. उंटाच्या 'टप टप' चालीवरून आणि त्या प्रसंगातील गीत प्रकारांवरून 'टप्पा' गीतशैलीची निर्मिती झाली. लखनौ नवाब असिफ उदौला यांच्या दरबारातील चतुरस्त्र गायक गुलामबनी यांनी हा गीत प्रकार अभ्यास करून ही शैली प्रचारात आणली व 'शौरीमिया' ह्या नावाने अनेक 'टप्पे' रचले. टप्पा प्रामुख्याने पंजाबी भाषेत रचलेला असतो व अत्यंत अवघड अशा 'टप्पा' तालात तो गायला जातो. ही गायकी अवघड असून चपळ, पेचदार, तानयुक्त अशी असते. पिलू, खमाज व काफी या रागांत प्रामुख्याने 'टप्पा' गायला जातो.


३) नाट्य - संगीत - नाट्यसंगीत हे शास्त्रीय संगीताचे अपत्य आहे असे म्हंटले जाते. परंतु यामध्ये रंजकता येण्यासाठी रागामध्ये फेरफार करण्याची मुभा असते. त्यामुळे हा गीतप्रकार उपशास्त्रीय संगीतात येतो. नाट्यगीते ही साधारणतः तिनताल, एकताल, अध्धा, पंजाबी, रूपक, दादरा, धुमाळी, केहेरवा इ. तालात गायली जातात. नाट्य गीते ३ ते ५ कडव्यांची असतात. नाट्यगीते गात असताना तबलावादक अनुरूप अशी साथ-संगत करतो. विविध ठेके वाजवून त्याला उठाव आणण्याचे काम तबलावादक करीत असतो. गायक जेंव्हा ध्रुवपदाची सुरवात करतो तेव्हा तबलावादक त्याच तालात विविध लग्ग्या वाजवून साथ-संगत करतो. नाट्य गीतातील लग्ग्या वाजविण्याकरीता डग्ग्यावर व तबल्यावर 'थापेच्या' साहाय्याने उठाण वाजविले जातात. त्यानंतर लग्ग्या वाजविल्या जातात. यातील उठाण हा प्रकार उस्त्फुर्त असतो. यातून तबलावादकाचे कौशल्य दिसून येते. बालगंधर्व यांचे नाट्यगीत व उस्ताद अहमदजान थिरकवाँ यांची तबला साथ हे एक नाट्य संगीताच्या साथीचे उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल.


याचबरोबर चैती, कजरी व दादरा असे राग संगीतावर आधारित उपशास्त्रीय संगीताचे प्रकार आहेत. हेही गीतप्रकार केहेरवा, दादरा, धुमाळी, जत अशा तालांमध्ये पेश केले जातात. विविध लग्ग्या वाजवून या गीत प्रकारांची रंगत वाढविली जाते.

Recent Posts

See All

वाद्यसंगीताची साथसंगत -

१) गायकी अंग व तंतकारी अंग या दोन्ही प्रकारांची माहिती २) गायकी अंगात ख्यालाप्रमाणेच साथ परंतु हाताची तयारीसुद्धा अपेक्षित ३) तंतकारी...

ख्यालाची साथसंगत -

१) नादमय, सशक्त आणि आसदार ठेका २) लयदारी ३) बडा व छोटा ख्याल यांच्या मांडणीचा अभ्यास. (ठेकापूर्व आलाप, नोमतोम, मुखडा, सम, बंदिशीची लय,...

Comments


bottom of page