top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

ठेका आणि ठेक्याचे गुणधर्म


ठेका - ताल म्हणजे कालाची आकड्यात मोजणी. जेव्हा मोजणीचे आकड्यातून / अंकातून विशिष्ट बोलांमध्ये रूपांतर होते, तेव्हा तो 'ठेका' होतो. तालाला जेव्हा बोलांचे भरजरी वस्त्र चढविले जाते, तेव्हा त्याचा 'ठेका' होतो. तबला व पखवाज यातील वर्णाच्या उच्चारांनी मात्रा बांधली जाते. त्या वर्णांच्या / अक्षरांच्या मात्रा मिळून जेव्हा आवर्तन पूर्ण होते, तेव्हा त्यास 'ठेका' असे म्हणतात. ठेका हा एका आवर्तनाचा असतो. निरनिराळे ताल ओळखण्यासाठी ठेक्याची निर्मिती केली गेली आहे व त्यातील मात्रांची संख्याही निश्चित केली गेली आहे. प्रत्येक गीतप्रकाराबरोबर निरनिराळ्या स्वरुपाचे ठेके वाजविले जातात व त्या गीतप्रकाराप्रमाणेच ठेक्याची रचना केलेली असते. ताल हा सरळ असतो. तो मात्रांशी ठराविक लयीने बांधील असतो, मग ती कोणतीही लय असो. मात्र त्यासाठी वापरलेले ठेक्याचे आकर्षक बोल हे तालाच्या चौकटीत बसतील असे वाजविले जातात. प्रत्येक ताल-रचनेसाठी ठराविक मात्रांचा ठेका व बोल ठरविलेले आहेत. त्यामुळे त्याची चौकट बोलांद्वारे ओळखता येऊ शकते व मात्रांच्या अंतराचा ताल व ठेका, यातील फरक सरळपणे स्पष्ट होतो.


ठेक्याचे गुणधर्म -


१) स्वरेल ठेका - चाटे वरची अक्षरं, लवे वरची अक्षरं व शाई वरची अक्षरं यातून निघणाऱ्या नादांची आस तसेच तीट, तिरकिट इ. शाईवरच्या अक्षरांचे वजन प्रमाणबद्ध असावे.

उदा. पंडित नाना मुळे यांचा ठेका स्वरेल आहे.


२) लयदार ठेका - बंदिशीची लय व गायकास अपेक्षित असणारी लय यांची सांगड घालून, योग्य लय शोधून वाजविणे व ती लय टिकवून ठेवणे म्हणजेच लयदार ठेका वाजविणे होय.

उदा. नदीच्या प्रवाहाप्रमाणे एकसंथ, सरळ लय.

पंडित किशन महाराज यांचा ठेका लयदार आहे.


३) वजनदार ठेका - प्रत्येक अक्षराचं व ठेक्याचं वजन त्याचबरोबर डग्ग्यावरील काम (घिसकाम, मींडकाम, घुमारा) यांनाही तितकेच महत्व आहे. 'तबला' हा 'स्वर' निर्मिती करतो तर 'डग्गा' हा 'घुमारा व आस 'यांची निर्मिती करतो तसेच तबल्याच्या स्वरास पोषक असलेली गंभीरता ( बेस ) निर्माण करतो. त्यामुळे ठेक्याला जो वजनदारपणा व वजन प्राप्त होते. त्यास 'वजनदार' ठेका असे म्हणतात.

उदा. पंडित वसंत आचरेकर यांचा ठेका वजनदार आहे.


४) लयकार ठेका - आग्रा, ग्वाल्हेर अशा लयप्रधान घराण्यांच्या गायकीबरोबर, स्वरेल, वजनदार ठेक्याबरोबरच लयकार व लयदार ठेक्यांची गरज असते. या गायकीत साथ व संगत या दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव होतो. साथ करताना विरुद्ध (कॉन्ट्रास्ट) ठेका तर संगत करताना लयकार ठेका वाजविला जातो. गायकाच्या बरोबरीने निघणे हा आग्रा-ग्वाल्हेर गायकीचा अविभाज्य घटक आहे. कारण ही लय-प्रधान घराणी आहेत.

Recent Posts

See All

मार्गी ताल व देशी ताल

इ.स. सुमारे ४०० च्या आसपास लिहिल्या गेलेल्या भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातील विवेचनावरून असे दिसून येते की, त्या काळी सर्व भारतवर्षात एकच...

ताल

ताल - संगीत शास्त्रामध्ये तालाचे स्थान अतिशय उच्च दर्जाचे व महत्वपूर्ण असे आहे. स्थिरपणाने स्थापित असणे या अर्थाच्या 'तल' या धातुला 'अ'...

ताल निर्मितीचे मूळ व विकास

इ.स. सुमारे ४०० च्या आसपास लिहिल्या गेलेल्या 'भरतमुनींच्या' 'नाट्यशास्त्रातील' विवेचनावरून असे दिसून येते की, त्या काळी सर्व भारत वर्षात...

Comentários


bottom of page