top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

तालाचे दशप्राण - जाती, लय, कला, यती, प्रस्तार


६ ) जाती :- ताल रचनेत विभागाच्या प्रत्येक दोन मात्रेमध्ये कमी-अधिक अक्षरांच्या मात्रांनी, अक्षर कालांनी उपविभाग पडल्यामुळे एका विशिष्ट चलनाचे वजन निर्माण होते, त्याला 'जाती' असे म्हणतात. कोणत्याही तालातील खंडांच्या मात्रांची संख्या वाढविल्यास किंवा कमी केल्यास जे अंतर पडते त्या अंतरास 'जाती' असे म्हणतात.


या जाती पाच प्रकारच्या आहेत..


अ } तिस्त्र जाती :- ३,६,९,१२ इ. लघुअक्षरांची योजना. उदा. दादरा, एकताल, चौताल इ.- एका मात्रेच्या कालावधीत तीन मात्रा म्हणणे अथवा वाजविणे म्हणजे 'तिस्त्र जाती' होय.


ब } चतुस्त्र जाती :- प्रत्येक दोन मात्रांच्या अंतरास २,४,८,१६ अशा मात्रांच्या लघुअक्षरांमुळे जे वजन निर्माण होते, त्यास 'चतुस्त्र जाती' असे म्हणतात.

उदा. तीनताल, केहरवा इ. एका मात्रेच्या कालावधीत चार मात्रा म्हणणे अथवा वाजविणे म्हणजे 'चतुस्त्र जाती' होय.


क } खंड जाती :- लघुअक्षरांची योजना ५,१०,१५. उदा. झपताल, पंचम सवारी, सुलताल इ. एका मात्रेच्या कालावधीत पाच मात्रा म्हणणे अथवा वाजविणे म्हणजे 'खंड जाती' होय.


ड } मिश्र जाती :- लघुअक्षरांची योजना ७,१४. उदा. रुपक, धमार, तेवरा इ. एका मात्रेच्या कालावधीत सात मात्रा म्हणणे अथवा वाजविणे म्हणजे 'मिश्र जाती' होय.


इ } संकीर्ण जाती :- लघुअक्षरांची योजना ९,१८. उदा. मत्त ताल, लक्ष्मी ताल इ. एका मात्रेच्या कालावधीत नऊ मात्रा म्हणणे अथवा वाजविणे म्हणजे 'संकीर्ण जाती' होय.



क्र. जाती मात्रा अक्षर / बोल ताल


१) तिस्त्र ३ तकिट दादरा, खेमटा इ.


२) चतुस्त्र ४ तकधिन त्रिताल, तिलवाडा इ.


३) खंड ५ तकिटतक झपताल, सुलताल इ.


४) मिश्र ७ तकतकतकिट रुपक, दीपचंदी इ.


५) संकीर्ण ९ तकधीणतकतकिट मत्त ताल, लक्ष्मी ताल इ.



कर्नाटक संगीतात जातीला फार महत्व आहे. कोणत्याही तालाची लघुमात्रा बदलली की तालाची 'जाती' बदलते. त्याप्रमाणे मुख्य सात प्रकारचे ताल, त्यांच्या पाच जाती बदल्यामुळे ३५ ताल होतात व त्यांचे पुढे पाच जातीचे पाच भेद होतात, त्यामुळे ३५ × ५ = १७५ ताल तयार होतात.



७) कला :- कला या शब्दाचा अर्थ 'भाग' असा होतो. अशाप्रकारे अक्षरकालाच्या सूक्ष्म विभाजनाला 'कला' असे म्हणता येईल. जर एका तालात एकच स्वर गायला गेला तर त्यास 'एक कला' म्हणता येईल. दोन गायले गेले तर 'दोन कला' आणि चार गायले गेले तर 'चार कला' असे म्हणता येईल. जर एका अक्षरकालाचे तीन भाग करून प्रेत्येक भागासाठी एक एक स्वर गायला गेला तर प्रत्येक भाग म्हणजे 'एक कला' असे म्हटले जाईल. एका अक्षर काळात जितक्या कला असतात त्या कला-समुहास 'गती' असे म्हणतात. चार कलांच्या समुहास 'चतुस्त्र गती', पाच कलांच्या समुहास 'खंड गती', सात कलांच्या समुहास 'मिश्र गती' तर नऊ कलांच्या समुहास 'संकीर्ण गती' असे म्हणतात. अक्षर, काल किंवा मात्रांचे सूक्ष्म विभाजन दाखविण्याच्या क्रियेस 'कला' असे म्हणतात. ताल वाद्य वाजविताना ते कसे वाजवावे, आघात करतेवेळी हाताची ठेवण, बोटांचे फैलावणे, शरीराच्या हालचाली करणे, इ. गोष्टी कशा सौंदर्यपूर्ण असाव्यात हे 'कला' सांगतात.

या कला पुष्कर, मृदंग यासारख्या वादनासाठी आहेत. मृदंग वाजविताना शरीराचे काही भाग हलतात. खांदे, हात, कोपर, मनगट, हातांची बोटे इ.

काही श्रेष्ठ वादकांचा डावा पाय हलतो.


एकूण आठ प्रकारच्या कला वर्णिलेल्या आहेत.


क्र. कला प्रकार कला / क्रिया


१} ध्रुवा सशब्द आवाजयुक्त.


२} सर्पिणी हात डाव्या बाजूस करणे.


३} कृष्णा हात उजव्या बाजूस नेणे.


४} पद्मिनी हात खाली करणे.


५} विसर्जिता हात बाहेर नेणे.


६} विक्षिप्ता पसरलेली बोटे आकुंचित करणे.


७} पताक हात वर करणे.


८} पतिता हात सरळ खाली आणणे.



८) लय :- दोन क्रियांमध्ये असणाऱ्या अवकाशास 'लय' असे म्हणतात. ताल-शास्त्रात, दोन मात्रांमधील अंतर व त्याची होणारी पुनरावृत्ती म्हणजे 'लय'.


लयीचे मुख्य ३ प्रकार आहेत.

विलंबित लय, मध्य लय आणि द्रुत लय.


१} अति विलंबित लय :- अतिशय संथ गती म्हणजे अति विलंबित

लय होय.


२} विलंबित लय :- संथ गती म्हणजे विलंबित लय होय.


३} मध्य लय :- मध्यम गती म्हणजे 'मध्य' लय.



९ ) यती :- लयीला सुंदर रुप देण्यासाठी जे नियम अथवा सिद्धांत आहेत त्यांना 'यती' असे म्हणतात. संगीतात लयीच्या प्रवाही गुणालाच 'यति' असे म्हटले आहे. म्हणजे लयीला सुंदर रुप देण्यासाठी घातलेले नियम म्हणजे 'यति' होय. लयीच्या वृत्तीचे, वेगाचे / गतीचे नियमन ज्यामुळे होते त्यास 'यती' असे म्हणतात.


यतीचे एकूण पाच प्रकार आहेत -


अ } समा :- प्रारंभापासून अखेरपर्यंत एकच लय असते. तुकड्याचे प्रारंभ, मध्य व शेवट असे तीन भाग मानले जातात. एखाद्या तुकड्यामधील तीनही भागांमध्ये, समान लय असते तेव्हा त्यास 'समा यती' असे म्हणतात.


ब } स्रोतवाह / स्रोतगता :- प्रवाहातून वाहणारी, धबधब्यासारखी, प्रारंभी विलंबित, मध्य आणि त्यानंतर द्रुत लय म्हणजे स्रोतवाह. नदीच्या स्रोतातून पाणी ज्या प्रकारे वाहते, त्या प्रकारच्या गतीला 'स्रोतगता' असे म्हणतात.


क } गोपुच्छा :- गायीच्या शेपटीप्रमाणे जिची रचना असते, तिला 'गोपुच्छा' असे म्हणतात. सुरुवातीला द्रुत, मध्य, विलंबित आणि पुन्हा द्रुत लय, म्हणजे 'गोपुच्छा' होय.


ड } मृदंगा :- प्रारंभी मध्य, विलंबित व शेवटी द्रुत लय. यामध्ये सुरुवातीला व शेवटी द्रुत लय असते तर मध्यभागी मध्य लय असते. अथवा सुरवातीला व शेवटी मध्य लय आणि मध्यभागी विलंबित लय असते, त्यास 'मृदंगा' असे म्हणतात.


इ } पिपीलिका / डमरू यती :- मुंगीप्रमाणे असणारी लय. मध्य लय, विलंबित लय, द्रुत लय व शेवटी पुन्हा मध्य लय. सुरवात व शेवट विलंबित किंवा मध्य लयीत असतो आणि मध्यभागी मध्य वा द्रुत गतीचा समावेश झाल्यानंतर 'डमरू' यती होते.



१० ) प्रस्तार :- 'प्रस्तार' याचा अर्थ प्रसार करणे असा होतो. ज्याप्रमाणे गायनामध्ये स्वरांचा प्रस्तार केला जातो, त्याचप्रमाणे तालाच्या अंगाचाही प्रस्तार केला जातो. तेव्हा कोणत्याही तालात मुखडे, तुकडे, मोहरे, पेशकार, कायदे, रेले, चक्रदार वाजविले जातात तेव्हा त्यास 'प्रस्तार' असे म्हणतात. तबला वादनातील ताल रचनेमध्ये बांधलेल्या बंदिशींचा, ताल-खंडांप्रमाणे होणारा विस्तार म्हणजे 'प्रस्तार' होय.


चार लघू - मात्रांचा विस्तार


१) ३+१ = ४


२) १+३ = ४


३) २+२ = ४


४) २+१+१ = ४


५) १+१+२ = ४


६) १+२+१ = ४


७) १+१+१+१ = ४


YouTube Link - https://youtu.be/c34N34sZToY?si=d7O4wpqsxjaf3roY

Recent Posts

See All

तालांची वैशिष्टये -

१) तीनताल / त्रिताल - हा तबल्यातील व स्वतंत्र तबला वादनातील प्रमुख ताल आहे. विलंबित, मध्य व द्रुत अशा तीनही लयीत हा ताल वाजविला जातो....

bottom of page