top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

तालाचे दशप्राण - काल, मार्ग, क्रिया, अंग, ग्रह


तालांच्या दश - प्राणांचा संक्षिप्त अभ्यास


ताल निर्मितीसाठी दहा प्राणांची आवश्यकता असते, असे प्राचीन संगीत शास्त्रात सांगितले आहे. प्राचीनकाळी अखंड भारतात जेव्हा एकाच प्रकारचे संगीत प्रचारात होते तेव्हा या दहा प्राणांचा उपयोग केला जात होता. उत्तर भारतात मोगल साम्राज्याचा प्रभाव वाढल्यामुळे ह्या संस्कृत संज्ञा मागे पडल्या. परंतु दक्षिण भारतातील किंवा कर्नाटक संगीतात मात्र यांचा वापर आजही दिसून येतो. भारतीय शास्त्रीय संगीतात तालाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. जेव्हा आपण तालाच्या दहा प्राणांचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असे लक्षात येते की आज कर्नाटक संगीतामध्येच या दहा प्राणांचा उपयोग अधिक प्रमाणात केला जातो.

तरीसुद्धा तबलावादकाला तालाच्या दहा प्राणांचा अभ्यास करणे, माहिती असणे आवश्यक आहे.


संस्कृत पंडितांनी प्राचीन काळापासून तालाचे दहा प्राण मानले आहेत. 'अमरकोश'कार अमरसिंह पंडित व नारदकृत 'संगीत मकरंद' या ग्रथांतसुद्धा तालाच्या दहा प्राणांचा उल्लेख आहे.


कालो मार्ग: क्रियागानि ग्रहो जाती कला लय ।

यती प्रस्तार कश्चेती ताल प्राण दशस्मृता ।।


अशाप्रकारे काल, मार्ग, क्रिया, अंग, ग्रह, जाती, लय, कला, यती आणि प्रस्तार हे तालाचे दहा प्राण (अंग) आहेत.



१) काल :- कालाचा अर्थ वेळ. कोणत्याही तालाचा जो खंडानुसार वेळ निश्चित होतो, त्याला 'काल' असे म्हणतात. ताल, ठेका, टाळी, खंड, मात्रा हे सगळे कालावर आधारित असतात.


सध्या संगीत प्रचारात असलेले काल व त्यांची मात्रा-संख्या खालीलप्रमाणे :


क्र. काल मात्रा(सेकंद)


१ त्रुटी १/८


२ अणुद्रुत १/४


३ द्रुत १/२


४ लघू १


५ गुरू २


६ प्लुत ३


७ काकपाद ४


८ हंसपद ८


९ महा हंसपद १६



२) मार्ग :- याचा अर्थ 'पथ' असा होतो. मार्ग म्हणजे वाट, रस्ता.

तालरचनेचा शेवट गाठण्यासाठी अत्यावश्यक अशा वैशिष्ट्यांमधून जाणारी वाट.

मात्रेच्या कालाचे प्रमाण, तालरचनेतील खंड, उपविभाग, विशिष्ट मात्रांवरील नियोजित अक्षरांचा जोरकसपणा किंवा बिन-जोरकसपणा या गोष्टींचे प्रमाण म्हणजे 'मार्ग'. प्राचीनकाळी भरतमुनी व शारंग देवांनी चार मार्ग सांगितले आहेत.


त्यांचे मात्रांच्या संदर्भातील मूल्यांकन खालीलप्रमाणे :


१} चित्रा :- १० लघू अक्षरांच्या उच्चारणामुळे निर्माण झालेली कालाची गती. द्रुत गती.


२} वर्तिकी :- २० लघू अक्षरांच्या उच्चारणामुळे निर्माण झालेली कालाची गती. मध्य गती.


३} ध्रुवी :- ३० लघू अक्षरांच्या उच्चारणामुळे निर्माण झालेली कालाची गती. विलंबित गती.


४} दक्षिणी :- ४० लघू अक्षरांच्या उच्चारणामुळे निर्माण झालेली कालाची गती. अतिविलंबित गती.


सध्या या चार मार्गांचा प्रचार कमी प्रमाणात होतो. तबल्याचे जे ताल आहेत, त्या तालात या मार्गांना आता विशेष स्थान राहिलेले नाही. जेव्हा धृपद गायकी होती तेव्हा या चार मार्गांची चांगली उपयोगिता होती.



३) क्रिया :- हातानी ताल मोजताना बोटाच्या व तळव्याच्या ज्या विशिष्ट हालचाली होतात त्याला 'क्रिया' असे म्हणतात. हाताच्या टाळीने ताल मोजला जातो. त्या मोजण्याच्या क्रियेलाही 'क्रिया' असेच म्हणतात. तालाची आनंदजनक शक्ती क्रियेमध्ये असते. दोन्ही हातानी टाळी वाजवून शब्द निर्माण करणे, बोटांच्या साहाय्याने मात्रा मोजणे म्हणजे 'क्रिया'.


क्रियेचे दोन प्रकार आहेत. तालात जेव्हा आपण टाळी वाजवितो तेव्हा त्या क्रियेस 'सशब्द' क्रिया म्हणतात. तर टाळी ऐवजी हात बाजूला करुन काल दाखविला जातो तेव्हा त्यास, 'निःशब्द' क्रिया असे म्हणतात.


१) सशब्द क्रियेचे चार प्रकार आहेत.


अ} धुवा / ध्रुवा :- चुटकी वाजवत उजवा हात खाली आणणे.


ब} शंपा / शंम्या :- उजव्या हाताने डाव्या हातावर टाळी वाजविणे. / आघात करणे.


क} ताल / तल :- डाव्या हातावर उजव्या हाताने टाळी वाजविणे. / आघात करणे.


ड} सन्निपात :- टोनही हातांनी एकमेकांवर टाळी वाजविणे. / आघात करणे.


२) निःशब्द क्रियेचे चार प्रकार आहेत.


अ} अमाप / अवाप :- हात वर उचलून बोटांनी बंद करणे अथवा वर उचलल्या जाणाऱ्या उजव्या हाताची क्रिया.


ब} निष्काम / निष्क्राम :- बोटांना उचलणे. अथवा खाली ठेवलेल्या डाव्या हाताची बोटे फैलावण्याची क्रिया.


क} विक्षेप / विक्षेपक :- उजवीकडे बोटांना हलविणे. अथवा वर उचलल्या जाणाऱ्या हातास स्वतःच्या उजव्या पाठीकडे ठेवण्याची क्रिया.


ड} प्रवेश / प्रवेशक :- हात खाली आणून डावीकडे हलविणे. खाली ठेवलेल्या डाव्या हाताची बोटे जुळवून वरच्या हातावर, त्यावर होणाऱ्या प्रवेशाची वाट पहाण्याची क्रिया.


३) देशी निःशब्द क्रियेचे सात प्रकार आहेत.


अ} सर्पिणी :- हाताला उजव्या बाजूला नेणे.


आ} कृष्य :- हाताला डाव्या बाजूला नेणे.


इ} पद्मिनी :- हाताला वरून खाली नेणे.


ई} विसर्जित :- हाताला बाहेर नेणे.


उ} विक्षिप्त :- बोटांना बंद करणे.


ऊ} पताक :- हात वर उचलणे.


ए} पतित :- जो हात वर गेलेला आहे तो खाली आणणे.



४) अंग :- तालाच्या विविध भागांना किंवा अवयवांना 'अंग' असे म्हणतात.

विविध तालाचे खंडसुद्धा विभिन्न असतात. या अंगाच्या माध्यमातूनच ताल बनविले जातात. तालाच्या लघु गुरु खंडांना 'अंग' असे म्हणतात. त्याच्या चिन्हाप्रमाणे मात्रांची निश्चिती ठरलेली असते. उत्तर हिंदुस्थानी ताल पद्धतीत त्याला 'विभाग' असे म्हणतात, तर दक्षिण हिंदुस्थानी ताल पद्धतीत त्याला 'अंग' असे म्हणतात.

अंगाचे एकूण आठ प्रकार आहेत, ते खालीलप्रमाणे ;


क्र. नाव चिन्ह संकेत मात्रा

१. अणुद्रुत अर्धचंद्र १


२. द्रुत पूर्णचंद्र २


३. द्रुत विराम द्रुत च्या वर अर्धचंद्र ३


४. लघू उभी रेष ४


५. लघू विराम उभ्या रेषेवर तिरपी रेष ५


६. गुरू ഗ सर्पाकृती ८


७. प्लुत सर्पाकृतीवर तिरपी रेष १२


८. काकपाद काकपक्षी पद चिन्ह १६


'अंग' हा तालाचा महत्वपूर्ण भाग आहे. वरील चिन्हांद्वारे 'अंग' प्रदर्शित केले जातात. दक्षिण भारतीय संगीतात आजही ह्या 'अंगांचा' व चिन्हांचा उल्लेख आढळून येतो. कर्नाटक संगीतात 'लघु अंगाला' महत्व आहे. जातीनुसार या अंगांच्या किमतीमध्ये बदल होतो.



५) ग्रह :- संगीत आणि ताल सुरू होण्याच्या क्रियेस 'ग्रह' असे म्हणतात. प्राचीन ग्रंथांनुसार गीताची सुरुवात व तालाची सुरुवात एकत्र वा मागे पुढे होते, या व्यवस्थेला / स्थितीला 'ग्रह' असे म्हणतात.


ग्रह चार प्रकारचे आहेत.


अ } समग्रह :- जेव्हा गीताची व तालाची सुरुवात एकत्र होते, तेव्हा त्या व्यवस्थेला 'समग्रह' असे म्हणतात.


ब } विषमग्रह :- जेव्हा संगीत व ताल वेगवेगळ्या वेळी सुरु होतात, तेव्हा त्या व्यवस्थेला 'विषमग्रह' असे म्हणतात.

जेव्हा समेला अशा प्रकारे लपविले जाते की समेचे स्थान स्पष्टपणे लक्षात येत नाही. त्यास 'विषमग्रह' असे म्हणतात.


क } अतित ग्रह :- अगोदर ताल आणि नंतर संगीत सुरू होते, तेव्हा

तालावर्तनात समेनंतर येणाऱ्या आघातयुक्त जागेस 'अतित ग्रह' असे म्हणतात.

गायनात जेव्हा सम निघून गेल्यानंतर सम दाखविली जाते, तेव्हा त्यास 'अतित ग्रह' असे म्हणतात.


ड } अनागत ग्रह :- सम येण्यापूर्वीच जेव्हा गायनात, वादनात सम दाखविली जाते, तेव्हा त्यास 'अनागत ग्रह' असे म्हणतात.

जेव्हा गायनाची सुरुवात अगोदर आणि तालाची सुरुवात नंतर होते, तेव्हा त्या व्यवस्थेला 'अनागत ग्रह' असे म्हणतात.


अनागत आणि अतित गत - थोडक्यात -


अशा प्रकारच्या व्यवस्थेमध्ये गीताच्या आरंभ बिंदूचा तालाच्या समेशी लपंडाव चालतो. या दोघांमधले अंतर जितके कमी तितका समेचा आनंद अधिक. गीताचा मुखडा तालाच्या समेच्या थोडा आधी किंवा नंतर येतो, त्यामुळे गाण्यातील आलाप, ताना इ. क्रिया मुखड्याच्या त्या स्थानावरती संपविणे आवश्यक असते. ही कसरत कलात्मकतेने जो कलाकार सादर करतो, त्याचे गायन / वादन अतिशय प्रभावी होते. अनागत / अतित यांच्या या मुखड्यांपासून प्रेरणा घेऊन प्रतिभावान तबला वादकांनी तबल्याच्या अनागत / अतितच्या अनेक रचना तयार केल्या आहेत.


YouTube Link - https://youtu.be/W7OZf-t7zRA?si=Ph1ZANXQptfVKVfx

Recent Posts

See All

तालांची वैशिष्टये -

१) तीनताल / त्रिताल - हा तबल्यातील व स्वतंत्र तबला वादनातील प्रमुख ताल आहे. विलंबित, मध्य व द्रुत अशा तीनही लयीत हा ताल वाजविला जातो....

Comments


bottom of page