तबल्यावर वाजविले जाणारे विविध वर्ण (बोल) आणि त्यांची निकास पद्धती
- Team TabBhiBola
- Oct 18, 2020
- 2 min read
Updated: Nov 11, 2023
तबला हे असे एकमेव वाद्य आहे की जे जवळजवळ सर्वच संगीतप्रकारांची सक्षम संगत करू शकते. याचे मुख्य कारण म्हणजे तबला-डग्गा (दायाँ-बायाँ) यामधून निर्माण होणारे विविध नाद. या नादांमधूनच तबल्याची भाषा निर्माण झाली आहे. ज्याप्रमाणे संस्कृत, हिंदी, इंग्रजी इ. मानवी भाषांमध्ये मुळाक्षरे (alphabets) असतात. त्याचप्रमाणे तबल्याच्या भाषेतही मुळाक्षरे आहेत आणि या मुळाक्षरांनाच 'तबल्याचे वर्ण' असे म्हणतात. त्याची माहिती खालीलप्रमाणे -
तबल्याचे वर्ण -
अन्य मानवी भाषांच्या तुलनेत तबल्याचे वर्ण खूपच कमी आहेत.
संस्कृतमधील 'क, ग, घ, ट, ड, त, द, ध, न आणि र' या दहा मुळाक्षरांचा उपयोग करूनच तबल्याचे वर्ण तयार झाले आहेत. या वर्णांचे तीन गटांत वर्गीकरण केले गेले आहे.
१) फक्त तबल्यावर वाजवले जाणारे वर्ण.
२) फक्त डग्ग्यावर वाजवले जाणारे वर्ण.
३) तबला-डग्गा दोन्हीवर वाजवले जाणारे वर्ण.
१} फक्त तबल्यावर वाजवले जाणारे वर्ण :-
फक्त तबल्यातून ( दायाँ ) निर्माण होणारे वर्ण व त्यांची निकास पद्धती पुढीलप्रमाणे :
अ) ना किंवा ता - उजव्या हाताच्या तर्जनीने तबल्याच्या चाटेवर आघात करून जो गुंजयुक्त नाद निर्माण होतो त्यास 'ना' वा 'ता' म्हणतात.
ब) ती - उजव्या हाताच्या मधल्या बोटाने, शाईच्या मध्यभागी आघात करून निर्माण होणाऱ्या बंद नादास 'ती' असे म्हणतात.
क) ट किंवा र - उजव्या हाताच्या तर्जनीने, शाईच्या मध्यभागी आघात करून, निर्माण होणाऱ्या बंद नादास 'ट' किंवा 'र' असे म्हणतात. याशिवाय 'ट' हा वर्ण मधल्या बोटाने वा अनामिका व करांगुली (शेवटची दोन बोटे) यांच्या एकत्रित आघातानेही वाजविला जातो.
ड) दिं - उजव्या हाताची सर्व बोटे जुळवून शाईच्या मध्यभागी आघात करून निर्माण होणाऱ्या खुल्या नादास 'दिं' असे म्हणतात.
२} फक्त डग्ग्यावर वाजवले जाणारे वर्ण :-
फक्त डग्ग्यातून ( बायाँ ) निर्माण होणारे वर्ण व त्यांची निकास पद्धती पुढीलप्रमाणे :
अ) क - डाव्या हाताचे मनगट शाईच्या कोपऱ्यावर मैदानात ठेऊन पंजाच्या सहाय्याने शाईवर आघात करून निर्माण होणाऱ्या बंद नादास क / के / कि असे म्हणतात.
ब) ग - डाव्या हाताच्या तर्जनीने (पहिल्या बोटाने) शाईच्या पुढे मैदानात आघात केल्यावर जो आसदार नाद निर्माण होतो त्यास ग / गे / गी असे म्हणतात.
क) घ, घे - डाव्या हाताचे मनगट डग्ग्याच्या शाईच्या कोपऱ्यावर मैदानात ठेऊन, मध्यमा व अनामिका (मधली दोन बोटे) या दोन बोटांनी लवेत आघात करून जो आसदार नाद उत्पन्न होतो त्यास घ, घे, घी, असे म्हणतात.
३} तबला-डग्गा दोन्हींवर एकत्र वाजवले जाणारे वर्ण :-
तबला -डग्गा या दोन्हींमधून संयुक्तपणे निर्माण होणारे वर्ण आणि त्यांची निकास पद्धती पुढीलप्रमाणे :
अ) धा - तबल्यावरचा 'ना' हा वर्ण आणि डग्ग्यावरील 'घ' हा वर्ण एकत्र वाजविल्यास निर्माण होणाऱ्या आसदार नादास 'धा' असे म्हणतात.
ब) धिं - तबल्याच्या लवेत अथवा शाईच्या कोपऱ्यावर तर्जनीने केलेला गुंजयुक्त आघात 'ना' आणि डग्ग्यावरील 'घ' हा वर्ण हे दोन्ही नाद एकत्र करून निर्माण होणाऱ्या आसदार नादास 'धिं' असे म्हणतात.
क) तीं - तबल्याच्या लवेत किंवा शाईच्या कोपऱ्यावर तर्जनीने केलेला गुंजयुक्त आघात 'ना' आणि डग्ग्यावरील 'क' हा बंद वर्ण हे दोन्ही नाद एकत्र करून निर्माण होणाऱ्या आसदार नादास 'तीं' असे म्हणतात.
अशाप्रकारे तबल्यातून बंद व खुले नाद निर्माण होतात.
क, ती, ट या बंद नादांना 'व्यंजनाक्षरे' तर धा, धिं, तीं या खुल्या नादांना 'स्वराक्षरे' असे म्हणतात.
YouTube Link - https://youtu.be/uu-upR92Wf0?si=M_dy_p3giMCWhZIj
Recent Posts
See All१] तबला - अ) खोड - तबल्याचे खोड हे खैर, शिसवी (शिसम), बाभूळ वा चिंच या झाडांच्या बुंध्यापासून बनवितात. ते आतून २० ते २२ सेंटीमीटर पोकळ...
Whatever Information is provided here is very lucid which helps us to understand diverse & complex concepts in a simple manner and the best thing is that you compile the random information at a single platform. I really appreciate you for this work. It helps me a lot. Thank You and All the Best.😊