top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

तबल्याच्या भाषेतील 'यति' (विराम)


काव्यशास्त्राच्या नियमानुसार एखादे पद्य लयीमध्ये म्हणताना, त्यातील चरणाच्या किंवा एखाद्या शब्दाच्या शेवटी जो विराम घेतला जातो, त्याला 'यति (विराम)' असे म्हणतात.

जेव्हा विराम घेतला जातो, तेव्हा त्या अक्षराच्या नंतर हा विराम असतो. त्या अक्षरातील स्वर लांबविला जातो. अर्थात विराम म्हणजे फक्त थांबणे नव्हे.

उदा. सदा S सर्वदा S योग तुझा S घडावा SSS

या काव्यामध्ये घेतला जाणारा हा विराम किती असावा हे व्यक्ती परत्वे बदलत जाते. परंतु, या विरामामुळेच ते काव्य-गायन छंदमय व अधिक अर्थपूर्ण बनते. म्हणूनच 'यति' हे काव्यातील एक सौंदर्यतत्व मानले जाते. तबला वादनातील बोलांना जरी मानवी भाषेसारखे अर्थ नसले तरी नाद-वैविध्य, छंदबद्धता, यमक व अनुप्रास यांसारखे अलंकार आणि प्रत्येक रचनेमध्ये दिसून येणारे कलात्मक यति-विराम, या सर्व कारणांमुळे हे बोल काव्यमय वाटतात.


यतिचा प्रयोग तबला वादनातील विविध रचनांमध्ये कशाप्रकारे केलेला असतो यांचे विवरण पुढीलप्रमाणे -


i) ठेक्यातील यति / विराम - ठेका हे ताल रचनेचे सशब्द रूप आहे. ताल हा मात्रांनी व विभागांनी बनलेला असतो. परंतु या मात्रांमध्ये जर विराम घ्यायचा असेल तर ते ठेक्याच्या माध्यमातूनच स्पष्ट होते. विविध ठेक्यांचा अभ्यास करताना असे लक्षात येते की ज्या ठेक्यांमध्ये विरामांचा उपयोग केलेला आहे, ते ठेके उपशास्त्रीय किंवा सुगम संगीताच्या साथीस उपयोगी पडतात. याचे कारण, विरामांमुळे जे आंदोलन ठेक्यात निर्माण होते त्यातील छंद, हा सुगम वा उपशास्त्रीय संगीतातील रंजकता वाढवितो.


ii) कायद्यातील यति / विराम - कायदा हा वादनप्रकार खाली-भरीयुक्त व विस्तारक्षम आहे. कायद्याची प्रस्तुती एकाच विशिष्ठ जातीमध्ये (तीस्त्र, चतस्त्र, खंड इ.) केली जाते. विविध घराण्यांच्या कायद्याचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की 'अजराडा' वगळता अन्य घराण्यातील कायद्यांच्या मुख्य बोलात ( रचनेत ) यति / विराम दिसून येत नाही. अजराडा घराण्यातील कायद्यांमध्ये मात्र, या यति / विराम तत्वाचा अतिशय सुंदर उपयोग केलेला आढळून येतो.


उदा. धीं S धागेना धा S धागेना

धातग घेतग धिनधि नागिना ।


त्यामुळेच 'अजराडा'च्या रचना ऐकताना कर्णमधुर व रंजक वाटतात. असे जरी असले तरी अन्य घराण्यातील प्रतिभावान वादक, कायद्याचा विस्तार करताना यति / विराम तत्वाचा कलात्मक वापर करून विस्तार-क्रिया ( कायदा ) खुलवतात.


iii) रेल्यातील यति / विराम - रेल्यामध्ये सर्वसाधारणपणे दोन प्रकार दिसून येतात.


अ] साधे रेले :- जे एकपट दुपटीच्या माध्यमातून सादर केले जातात.


ब] चलन-रव :- दुसरे रेले जे चलन-रव माध्यमातून सादर केले जातात.


पहिल्या प्रकारच्या तुलनेत दुसऱ्या प्रकारच्या रचनेमध्ये यति / विरामांचा अधिक वापर केलेला आढळून येतो. याचे कारण म्हणजे, ज्या चलनावर रेल्याची 'रव (रौ)' बांधलेली असते त्या चालनातच यति / विराम बांधलेले असतात. अर्थात कायद्याप्रमाणेच रेल्याच्या पलट्यांमध्ये कलात्मक यति-विराम घेता येतात. आणि रेला हा प्रकार मुळातच वेगाने वाजत असल्याने त्या वेगातच निर्माण केलेल्या या विरामांनी त्याचे सौंदर्य वाढण्यास मदत होते.


iv) गत - तुकड्यातील यति / विराम :- गत-तुकड्यांमध्ये सर्वसाधारणपणे तिहाई असतेच आणि विराम हा तिहाईचा अविभाज्य भाग आहे. हे विराम केवळ गणिती असतात. परंतु गत-तुकड्यांच्या तिहाई शिवाय असलेल्या इतर रचनेत जेव्हा हे विराम घेतले जातात, तेव्हा ती रचना अधिक आकर्षक होते असे आढळून येते.

Recent Posts

See All

'बायाँ' च्या वादनात संतुलन राखण्यासाठी रियाजाची पद्धत

तबला हे वाद्य दायाँ (तबला) आणि बायाँ (डग्गा) या दोन वाद्यांचा मेळ साधून निर्माण झालेले वाद्य आहे. तबल्यातून (दायाँ) निघालेले 'तार-स्वर'...

पढंतची आवश्यकता -

स्वतंत्र तबलावादनाच्या सादरीकरणामध्ये 'पढंत'चे स्थान महत्वपूर्ण आहे. या सादरीकरणामध्ये प्रथम वाचेद्वारे वाचून नंतर त्याचं सादरीकरण (पेश...

तबल्याच्या भाषेतील 'यमक'

संस्कृत मध्ये अनेकाक्षरावृत्तीस 'यमक' असे म्हंटले आहे. अनेक अक्षरांमधून अर्थात एखाद्या शब्दातून किंवा शब्दबंधांमधून निर्माण होणाऱ्या...

Comments


bottom of page