top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

तबल्याच्या भाषेतील 'यमक'


संस्कृत मध्ये अनेकाक्षरावृत्तीस 'यमक' असे म्हंटले आहे. अनेक अक्षरांमधून अर्थात एखाद्या शब्दातून किंवा शब्दबंधांमधून निर्माण होणाऱ्या नादांच्या आवृत्तीस 'यमक' असे म्हणतात. सर्वसाधारणपणे काव्याच्या लागोपाठच्या दोन किंवा अधिक चरणांच्या शेवटी एकच शब्द किंवा एकच नाद असलेला शब्द योजलेला असतो. या योजनेमुळे जो शब्दालंकार तयार होतो त्यास मराठी साहित्यात 'यमक' असे म्हणतात.


उदा. सुसंगती सदा घडो सुजनवाक्य कानी पडो,

कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो ।।


याच शब्दालंकारास हिंदीमध्ये 'तुक' आणि उर्दू भाषेत 'काफिया' असे म्हटले जाते. तबल्याच्या भाषेमध्ये यमक हा अलंकार पेशकार, कायदा, रेला आणि लडी अशा विस्तारक्षम रचनांमध्ये ठळकपणे दिसून येतो.


१) पेशकारातील 'यमक' - पेशकाराच्या रचनेमध्ये प्रत्येक चरणात शेवटी 'धिंना' हे अंत्यपद येत असते. खाली-भरीच्या तत्वानुसार वादन करताना 'तींना आणि धिंना' यांच्या योजनेमुळे 'यमक' या शब्दालंकाराची जाणीव स्पष्ट होते. परंतु ही एक सहज क्रिया असल्याने यात कलाकाराचा स्वतंत्र विचार दिसून येत नाही. काही कलाकार मात्र धींना-तींना च्या अगोदर विशिष्ट शब्द / अक्षर योजून नवनवीन यमक शब्द तयार करतात. त्यामुळे त्या अंत्यपदाची आमद बनून ती रचना अधिकाधिक प्रभावी आणि काव्यमय बनत जाते.


२) कायद्यातील 'यमक' - खरंतर खाली-भरी तत्वानुसार वाजणारे कायद्याचे प्रत्येक चरण 'यमक' अलंकारच असतात. असे असले तरी त्यातील 'धीनागिना' हे अंत्यपद त्यांच्या स्वरमयतेमुळे 'यमक' अलंकाराची जाणीव ठळकपणे करून देत असते.


i) आद्य यमक - पेशकार व कायदा या दोन्ही विस्तारक्षम रचनांमध्ये आद्य यमकाचा देखील वापर केला जातो. ज्या अंत्यपदाने पेशकार व कायद्याचे चरण संपते, त्याच अंत्यपदाने पुढच्या चरणाची सुरुवात होते.


उदा: धागेना धात्रक धेतीट धागेना । धात्रक धिनाग धिनधि नागिना ।

धिनधि नागिना धात्रक धिनाग । धात्रक धिनाग तिनति नाकीना ।


ii) दाम यमक - दाम यमक हा देखील यमकाचा एक प्रकार आहे. दाम यमकामध्ये, प्रत्येक ओळीच्या शेवटी येणारा शब्द हा दुसऱ्या ओळीची सुरुवात असते. काही गत-तुकड्यांच्या रचना ह्या 'दाम यमकावर' आधारित आढळून येतात, ज्याला 'अंताक्षरीचे बोल' असेही म्हणतात.



३) रेल्यातील 'यमक' - रेल्याचा 'यमक' शब्द हा सर्वसाधारणपणे धींना-किटतक, धिंतिरकिटतक यांसारखा व्यंजनप्रधान असतो. या शब्दामुळे गतिमानतेत फिरणाऱ्या रेल्याच्या अक्षरांना चक्राकार गती प्राप्त होते आणि त्यामध्ये एकप्रकारचा छंद निर्माण होतो.

Recent Posts

See All

'बायाँ' च्या वादनात संतुलन राखण्यासाठी रियाजाची पद्धत

तबला हे वाद्य दायाँ (तबला) आणि बायाँ (डग्गा) या दोन वाद्यांचा मेळ साधून निर्माण झालेले वाद्य आहे. तबल्यातून (दायाँ) निघालेले 'तार-स्वर'...

पढंतची आवश्यकता -

स्वतंत्र तबलावादनाच्या सादरीकरणामध्ये 'पढंत'चे स्थान महत्वपूर्ण आहे. या सादरीकरणामध्ये प्रथम वाचेद्वारे वाचून नंतर त्याचं सादरीकरण (पेश...

Comments


bottom of page