top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

तबल्याच्या भाषेतील 'अनुप्रास'


जेव्हा एखाद्या अक्षराची किंवा शब्दाची पुनरावृत्ती करण्यात येते तेव्हा 'अनुप्रास' हा अलंकार निर्माण होतो. वास्तविक ही पुनरावृत्ती त्या अक्षराची किंवा शब्दाची नसून त्यामधून उत्पन्न होणाऱ्या नादाची असते. तबला वादनातील रचनांचा अभ्यास केला असता असे दिसून येते की सर्वच वादन-प्रकारांमध्ये हा अलंकार लपलेला दिसून येतो. परंतु त्याची जाणीव फारच थोड्या कलाकारांना असते. या अलंकाराचा जाणीवपूर्वक वापर, रचनांमध्ये केल्यास त्याचा प्रभाव निश्चितच वाढेल.


पेशकारातील 'अनुप्रास' - 'पेशकार' हा तबला वादनातील अतिशय महत्वाचा वादन-प्रकार आहे. लय-लयकारी, नादाची मृदू-कठोर अशी विविध रूपे, तयारी आणि उत्स्फूर्तता अशा सर्वच अंगांचा, 'पेशकार' वादनात कस लागत असतो. या सर्वच अंगांचा मुक्तपणे वापर करण्याची मुभा वादकास असते आणि म्हणूनच त्या वादनात सुसूत्रता आणणे आव्हानात्मक असते. अशावेळी प्रतिभावान वादक एखादे अक्षर (धा, धिं, तीं) निवडून शब्दबंधांमध्ये त्याची कलात्मक पुनरावृत्ती करत, पेशकार वादन खुलवतो. या अक्षरांची व शब्दबंधांची पुनरावृत्ती म्हणजेच 'अनुप्रास' होय.


कायद्यातील 'अनुप्रास' - कायद्याच्या रचनेत व त्याच्या विस्तारात मर्यादित शब्दबंध असतात. खरंतर कायदा प्रस्तुतीकरणात या शब्दबंधांची सतत पुनरावृत्ती होत असते, परंतु तरीही यात अनुप्रास जाणवत नाही, कारण इथे पुनरावृत्ती जाणीवपूर्वक केलेली नसते तर ती वादनाच्या ओघात होत असते. असे जरी असले तरी कायद्याचा विस्तार जर विचारपूर्वक केला तर अनुप्रासाची चांगली अनुभूती येऊ शकते. कायद्याचे पलटे तयार करीत असताना विस्ताराची शिस्त पाळून कायद्याच्या मुखात असणारे शब्दबंध क्रमाक्रमाने उलगडायचे असतात. असे करताना या शब्दबंधांच्या जाणीवपूर्वक पुनरावृत्तीतून अनुप्रासाची उत्तम निर्मिती करता येते.

उदा. 'धाती धागेना धाती धागेना धागे धीनागिन' या पलट्यात 'धाती धागेना' हा बोल दोन वेळा येतो व त्यातून 'अनुप्रास' हा अलंकार निर्माण होतो.


रेल्यातील 'अनुप्रास' - गतिमानता हे रेल्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. अर्थात एकाक्षरी नादांची आवृत्ती येथे शक्य नसते. परंतु 'तिरकिटतक' सारख्या कठोर आणि 'धिनगिन' सारख्या मृदू शब्दबंधांची पुनरावृत्ती करून वाजविल्याने रेल्यामध्ये 'अनुप्रास' हा अलंकार निर्माण होतो. त्याचप्रमाणे विविध छंदांची पुनरावृत्ती हे देखील रेला वादनाचे एक वैशिष्ट्य आहे.


गत - तुकड्यातील 'अनुप्रास' - 'गत-तुकडा' म्हणजे तबला वादनातील कविताच असतात. तालावर्तनाचे बंधन सोडल्यास या रचनांना निश्चित असे कोणतेच नियम नसतात. रचनाकार त्याच्या प्रतिभेप्रमाणे या रचना निर्माण करतो. या रचना तयार करताना तो जी सौंदर्यतत्त्वे वापरतो त्यामध्ये बऱ्याचदा पुनरावृत्ती हे तत्व वापरलेले आढळून येते. दुधारी, तिधारी किंवा चौधारी रचना हे गत-तुकड्यातील 'अनुप्रासाचे' एक उत्तम उदाहरण आहे.

Recent Posts

See All

'बायाँ' च्या वादनात संतुलन राखण्यासाठी रियाजाची पद्धत

तबला हे वाद्य दायाँ (तबला) आणि बायाँ (डग्गा) या दोन वाद्यांचा मेळ साधून निर्माण झालेले वाद्य आहे. तबल्यातून (दायाँ) निघालेले 'तार-स्वर'...

पढंतची आवश्यकता -

स्वतंत्र तबलावादनाच्या सादरीकरणामध्ये 'पढंत'चे स्थान महत्वपूर्ण आहे. या सादरीकरणामध्ये प्रथम वाचेद्वारे वाचून नंतर त्याचं सादरीकरण (पेश...

Comments


bottom of page