top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

तबल्याच्या विविध भागांची सविस्तर माहिती


१] तबला -


अ) खोड - तबल्याचे खोड हे खैर, शिसवी (शिसम), बाभूळ वा चिंच या झाडांच्या बुंध्यापासून बनवितात. ते आतून २० ते २२ सेंटीमीटर पोकळ असते. तबल्याची उंची अंदाजे २५ ते २८ सेंटीमीटर असून, तोंडाकडील भाग निमुळता असतो. तळाकडील भाग तोंडाकडील भागापेक्षा मोठा असतो. तोंडाकडील भागाचा व्यास सुमारे १२ ते १८ सेमी असतो. तबल्याचे वजन अंदाजे ३ ते ५ किलो एवढे असते.


ब) पुडी - तबल्याच्या तोंडावर बकरीचे कमावलेले कातडे वादीच्या सहाय्याने घट्ट बसवितात त्यास 'पुडी' असे म्हणतात. त्या पुडीचे चार थर असतात. सर्वात वरचा थर कापून घेतात व त्याची 'किनार' बनते. शाई, लव (लौ), चाट आणि गजरा मिळून पुडी बनते. वादीच्या सहाय्याने पुडीच्या १६ घरांमधून विणून घेऊन पुडी तबल्याच्या तोंडावर घट्ट बसवितात.


क) पेंदी / पेंदे - तबल्याच्या तळाशी एक गोलाकार वादीचे कडे असते. त्यास 'पेंदी / पेंदे' असे म्हणतात.


ड) वादी - वादी ही म्हशीच्या वा बैलाच्या कमावलेल्या कातड्यापासून बनवितात. ती १ सेंटीमीटर रुंद व १५ ते २० मीटर लांब असते. पुडीच्या १६ घरातून विणून घेऊन, ती तबल्याच्या 'पेंदी / पेंदे' या भागातून ओवून घेतली जाते व तबल्याच्या तोंडावर घट्ट ताण देऊन ती पुडी बसविली जाते.


इ) गठ्ठे - २.५ सेंटीमीटर व्यासाचे व ६ सेंटीमीटर लांबीचे सागवानी लाकडापासून बनवलेल्या गोलाकार अशा लहान ठोकळ्यांना 'गठ्ठे' असे म्हणतात. त्यांची संख्या ८ (आठ) ही निश्चित असते. तबल्याच्या वाद्यांमधून ते बसवितात. गठ्ठे खाली वर ठोकल्याने पुडीवरील ताण कमी-जास्त होतो आणि निरनिराळ्या ध्वनीची (स्वराची) निर्मिती होते.


ई) शाई - तबल्याच्या पुडीच्या मध्यभागी शाई घोटून ती गोल आकारात लावतात. स्वर निर्मितीस शाईचा महत्वाचा उपयोग होतो. खळ, लोखंडाचा कीस व कोळशाची पूड यांचे मिश्रण एकत्र करून तबल्याच्या मध्यभागी त्या शाईचा लेप घोटून घोटून चढवितात व त्यामुळे त्यातून स्वर निर्मिती होण्यास मदत होते.


२ ] डग्गा -


अ) भांडे - तांब्याच्या किंवा पितळ्याच्या पत्र्यापासून डग्ग्याचे भांडे बनवलेले असते. पत्रा जेवढा जाड तेवढे भांड्याचे वजन जास्त. त्यामुळे डग्गा स्थिर राहतो आणि घुमतो. डग्ग्याची उंची २८ ते ३० सेंटीमीटर व व्यास २० ते २६ सेंटीमीटर असतो. डग्ग्याचे वजन साधारणपणे २ ते ४ किलो असते.


ब) पुडी, वादी, पेंदी हे सर्व तबल्याप्रमाणेच असते. वादी खेचून धरण्यासाठी लाकडी गठ्ठयांऐवजी छोट्या खिट्ट्यांचा वापर करतात.


क) शाई - शाई ही पुडीच्या मध्यभागी न लावता, ती पुडीच्या एका बाजूला लावली जाते, जेणेकरून त्यातून घुमारा, घिसकाम, मिंडकाम होऊ शकते.


ड) तबला व डग्गा हे निरनिराळ्या आकाराचे व वजनाचे असतात.



Recent Posts

See All

तबल्यावर वाजविले जाणारे विविध वर्ण (बोल) आणि त्यांची निकास पद्धती

तबला हे असे एकमेव वाद्य आहे की जे जवळजवळ सर्वच संगीतप्रकारांची सक्षम संगत करू शकते. याचे मुख्य कारण म्हणजे तबला-डग्गा (दायाँ-बायाँ)...

Comments


bottom of page