top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

तबल्याचा उगम


प्रस्तावना - तबला हे वाद्य तालवाद्य असून, उत्तर भारतीय संगीतामध्ये या अवनद्ध वाद्यास अतिशय महत्वाचे स्थान आहे. तबला हे वाद्य, दोन वाद्ये मिळून तयार झालेले आहे. तबला व डग्गा म्हणजेच दायाँ आणि बायाँ ही दोन वाद्ये. तबला म्हणजे दायाँ-उजव्या हाताने व डग्गा म्हणजे बायाँ-डाव्या हाताने वाजवितात.

तबल्याची निर्मिती केव्हा, कुठे, कशी झाली व कोणी केली याबाबत विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही. एवढेच नव्हे, तर तबल्याचा जन्म भारतातच झाला असावा का, हेही सांगणे कठीण आहे. तबला या वाद्याच्या निर्मितीसंबंधी भिन्न-भिन्न मतप्रवाह, प्रवाद आणि मनोरंजक आख्यायिका आढळून येतात. तबल्याच्या उत्पत्ती संदर्भात, इतिहासाबरोबरच पौराणिक कथा व काल्पनिक तत्वांचा समावेश झालेला दिसून येतो. प्राचीन मंदिरे व गुहांमधील चित्रे, शिल्प आणि मूर्ती यांवरही तबल्याचे अस्तित्व आढळून आलेले आहे.


तबल्याचा उगम - प्राचीन काळापासूनच आपल्या देशात अवनद्ध वाद्ये अस्तित्वात होती, याचे अनेक दाखले ग्रंथांमधून, इतिहासातून व मिळालेल्या अनेक पुराव्यांमधून आढळून आलेले आहेत. प्राचीन लेण्या, शिलालेख, गुहांमधील चित्रे व शिल्पांवरुन आपल्याला अनेक अवनद्ध तालवाद्यांचे अस्तित्व दिसून आलेले आहे. मृदंग, भेरी, घट, वीणा अशा अनेक वाद्यांचा उल्लेख रामायणात आढळतो. बुद्धकाळातील नर्तिकेला साथ करणारा मृदंग-वादक बुद्ध लेण्यात तसेच अजिंठ्याच्या चित्रकृतीत आढळतो.


पूर्वी भारतात ज्या प्रमाणे युद्धावर जाताना शंख, दुंदुभी अशा वाद्यांचा उपयोग, शूरांना सूचना देण्यासाठी केला जायचा, त्याचप्रमाणे अरेबियन, फार प्राचीन काळापासून नगारा या वाद्याचा उपयोग सैनिकांना उत्तेजन देण्यासाठी करीत असत. १५ व्या शतकात राजा मानसिंग तोमर याने धृपद गायकीचा आविष्कार केला. त्या काळात धृपदाच्या साथीसाठी पखवाजासारखे घन-गंभीर तालवाद्य वापरले जायचे. त्यानंतर ख्याल सारख्या मृदू-मुलायम, हलक्या गायकीचा उगम झाला. या गायकीच्या साथीसाठी एक मधुर व बंद बोल उत्त्पन्न होणाऱ्या तालवाद्याची आवश्यकता होती व ह्यातूनच तबल्याचा जन्म झाला. प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत तबल्यामध्ये अनेक बदल तसेच परिवर्तनही घडून आले.


उत्तर भारतात एक मतप्रवाह असा आहे की, मध्य युगात पखवाजाचे मध्यभागातून दोन तुकडे केले. त्या दोन भागांना उभ्या स्थितीत ठेऊन वाजविले. त्यातूनच तबला या वाद्याचा उगम झाला असावा असे मानले जाते, परंतु याला कशाचाही शास्त्रीय पुरावा नाही. त्या काळात अनेक पर्शियन वाद्ये तबला ह्या वाद्याच्या आकाराशी, नावाशी साधर्म्य असणारी होती. उदा. तबल - टर्की, तबल - सामी, तबल - जंग, तबल - बलागी अशी अनेक तालवाद्ये, लाकूड अथवा धातुपासून बनवलेली होती. परंतु या वाद्यांवर शाई लावल्याचा उल्लेख आढळून येत नाही.


८ व्या शतकात मुघलांकडून हे वाद्य भारतात आले असावे व त्यात पुढे सुधारणा करून त्याला आधुनिक तबल्याचे रूप दिले असावे, असेही मत आहे. १३ व्या शतकात अनेक संगीतप्रेमी सुलतान होऊन गेले. अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात काही कलावंतांनी तबल्याची रचना, बांधणी व सुधारणा केली असावी. तबल्याच्या जनकामध्ये उस्ताद अमीर खुसरौ यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. परंतु, खऱ्या अर्थाने अमीर खुसरौ हेच तबल्याचे जनक आहेत, यालाही कुठल्याप्रकारचा पुरावा नाही.


ज्या वाद्यांचे मुख चामड्याने मढवलेले असते त्या तालवाद्यांना फारसी भाषेत 'तब्बल' असे म्हणतात. कदाचित ह्यावरूनच येथील अवनद्ध वाद्याला 'तबला' म्हणण्याची प्रथा मुघलांच्या काळात पडली असावी असा अंदाज आहे. तबल्याला आधुनिक रूप देण्याचे व त्याला विकसित करण्याचे श्रेय खऱ्या अर्थाने सिद्धार (सुधार) खाँ ढाढी यांना दिले जाते. १८ व्या शतकात तबल्याच्या वादनशैलीत बदल करून तबल्याला आधुनिक रूप दिले ते यांनीच ! ख्यालाच्या साथीसाठी पूरक वाद्य करण्याच्या दृष्टीने तबल्यामध्ये अनेक आधुनिक बदल केले, जसे की, शाई लावणे, गठ्ठे लावणे,वादीचा वापर करणे,असे अनेक बदल व सुधारणा त्यांनी या वाद्यात घडवून आणल्या.


अशा प्रकारे तबल्याच्या इतिहासाबाबत विविध विचार व मतप्रवाह असल्यामुळे तसेच संशोधन आणि ठोस पुराव्या अभावी निश्चित अशी माहिती अजून उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे अजूनही तबल्याचा इतिहास हा एक संशोधनाचा विषय राहिला आहे.

Recent Posts

See All

सांगता

अशाप्रकारे सध्याच्या काळात 'तबला' या वाद्याला अतिशय प्रसिद्धी मिळाली आहे. आजच्या आधुनिक युगात शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, नाट्य...

तबल्याचे आधुनिक परिवर्तन

१) पूर्वी तबल्यासाठी एकाच जाड चामड्याचा वापर केला जात होता. परंतु पुढे एका जाड चामड्याऐवजी दोन पातळ चामड्याचा वापर करण्यात येऊ लागला....

Comments


bottom of page