top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

तबला वादनातील स्वरांची व व्यंजनांची नादमयता


i ) तबला हे केवळ लय वाद्य नसून एका ठराविक मर्यादेपर्यंत त्या वादयातून सुरेल नाद निर्मिती होत असते.


ii ) तबला व डग्गा ह्या दोन्ही वाद्यातून अनुक्रमे तार व खर्ज असे नाद निर्माण होतात. उदा. ना, घे इ.


iii ) तबल्याच्या शाईवर होणाऱ्या बोटांच्या, पंजाच्या एकत्रित किंवा स्वतंत्र आघातांमुळे बंद अशा व्यंजनाक्षरांची निर्मिती होते. उदा. ती, ट, त्र, इ.


iv ) डग्ग्यातून निर्माण होणारी स्वर-व्यंजने आणि तबल्यातून निर्माण होणारी स्वर-व्यंजने यांच्या संयोगातून नवीन स्वर व व्यंजन अक्षरे निर्माण होत असतात. उदा. धा, धिं, धिट, तीं इ.


v ) अशा विविध नादाक्षरांमधूनच तबल्याच्या भाषेतील विविध शब्दबंध तयार होतात. आणि या शब्दबंधांपासूनच तबला वादनातील विविध रचनांचा अविष्कार होतो. या रचना विलंबित, मध्य, द्रुत अशा तीनही लयींमध्ये सादर होतात. या तीनही लयींना अनुरूप ठरतील अशा शब्दबंधांची योजना त्या त्या रचनांमध्ये केलेली असते. या शब्दबंधांना, पर्यायाने त्यातील विविध स्वर-व्यंजनांच्या नादांना, योग्य न्याय दिला तरच त्या रचना प्रभावी ठरतात.


स्वर - व्यंजनांच्या उत्कृष्ठ नाद निर्मितीसाठी दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे


अ ) नादांची समज ब ) निकास तंत्र


अ ) नादांची समज - नादांची समज ही नादांच्या संस्कारातून होते. मुळात तबला हे वाद्य चामड्याच्या पुडीवरती शाईचा थर देऊन व ही पुडी गोलाकार, लाकडी पोकळ भांड्यावरताणून बसवल्यामुळे नाद निर्मिती होते. परंतु, तबला हे वाद्य असे वैशिष्टयपूर्ण आहे की यातून निर्माण होणारे नाद हे वादकाला स्वतःला निर्माण करावे लागतात, आणि अर्थातच त्यासाठी तबल्यातून निर्माण होणाऱ्या विविध नादांचा संस्कार घडवून घेणे वादकाला गरजेचे असते. मुळात मनुष्य स्वभाव हा अनुकरण-प्रिय आहे. संपर्कात येणाऱ्या सजीवांच्या आवाजाची व वर्तनाची नक्कल करण्याची त्याच्यात अंतःप्रेरणा असते. या प्रेरणेचा फायदा घेऊन जास्तीत जास्त तबला वादन ऐकून आणि पाहून नादांचा संस्कार करता येतो.


ब ) निकास तंत्र - वाद्य संगीताच्या शिक्षणामध्ये तंत्राला अत्यंत महत्व आहे. बऱ्याचदा नादांची उत्तम समज असलेला विद्यार्थी हातातील तांत्रिक दोषांमुळे, तंत्राकडे दुर्लक्ष केल्यामुळे किंवा तंत्राचा अतिरेक केल्यामुळे, वादयातून योग्य नाद निर्माण करू शकत नाही. मुळात नाद हा विषय समजण्याचा आहे, तर त्याचे तंत्र, समजलेले नाद उत्पन्न करणे, त्यामध्ये सुस्पष्टता सहजसाध्य करणे यास मदत करते.


यावरून असे लक्षात येते की नादांची समज आणि तंत्र या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या पाहिजेत. नादांची आणि विषयांची समज ही तालमीने येते तर तंत्र रियाजाने पक्के होते. वादकाची तांत्रिक बाजू जरी उत्तम झाली तरी प्रत्यक्ष कला सादरीकरणातील नाद निर्मितीसाठी मानवी भाषा, त्यातील भाव-भावना, वाद्याची क्षमता, त्यातून निघणारे मृदू व कठोर नाद आणि साथ-संगत करताना त्या प्रकारच्या गायन-वादनाची, नृत्याची समज असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपोआपच तबल्याचे नाद सुंदर येतात. स्वतंत्र तबला वादनात मात्र गायन किंवा नृत्याप्रमाणे मानवी भाव-भावना थेट प्रगट होत नाहीत, परंतु तबला वाद्याच्या, खास करून डग्ग्याच्या नादक्षमतेचा वापर करून, तबला वादक तबला वादनही नादमय करू शकतात.

Recent Posts

See All

'बायाँ' च्या वादनात संतुलन राखण्यासाठी रियाजाची पद्धत

तबला हे वाद्य दायाँ (तबला) आणि बायाँ (डग्गा) या दोन वाद्यांचा मेळ साधून निर्माण झालेले वाद्य आहे. तबल्यातून (दायाँ) निघालेले 'तार-स्वर'...

पेशकार, कायदा तसेच रेला यांचे एकल तबला वादनातील स्थान आणि महत्व

तबला हे तालवाद्य, सर्व तालवाद्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असण्याचे कारण म्हणजे, तबला हे तालवाद्य सर्वाधिक विकसित व उपयोगी आहे. या...

पढंतची आवश्यकता -

स्वतंत्र तबलावादनाच्या सादरीकरणामध्ये 'पढंत'चे स्थान महत्वपूर्ण आहे. या सादरीकरणामध्ये प्रथम वाचेद्वारे वाचून नंतर त्याचं सादरीकरण (पेश...

Comentarios


bottom of page