top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

तबला वादकांचे गुण दोष


१} रियाज :- तबला वादकाचा महत्वाचा गुण म्हणजे 'रियाज' होय. तबला हे वाद्य सहजसाध्य नाही. अतिशय मेहनत, चिकाटी व गुरुंच्या योग्य मार्गदर्शनाखाली रियाज करणे हे उत्तम तबला वादकाचे लक्षण आहे. तर रियाज नसणे हा तबला वादकाचा दोष म्हणता येईल.


२} अभ्यास :- तबला विषयाचा उत्तम अभ्यास असणे हा एक तबला वादकाचा गुण म्हणता येईल. तबल्यातील उत्तमोत्तम रचनांचा सखोल अभ्यास व बोल भांडारांची विपुलता असणे हेही एक चांगल्या, गुणी तबला वादकाचे लक्षण आहे, तर तबल्याचा योग्य अभ्यास नसणे हा तबला वादकाचा दोष आहे.


३} निर्देश पालन :- गुरुंनी शिकवलेल्या बोलांचा रियाज करून ते आत्मसात करणे व गुरुकृपा लाभणे हा एक गुणच होय. तर गुरुंच्या निर्देशनाचं पालन न करणे, अयोग्य रीतीने रियाज करून तबला वाजविणे हे तबला वादकाचे दोष आहेत.


४} लय व ताल ज्ञान :- ताल व लयीचे योग्य ज्ञान नसणे हा एक दोष आहे कारण, तालाचे वजनच माहीत नसेल तर ताल स्थापित होऊ शकणार नाही आणि लयीचे ज्ञान नसेल तर लयकारीचे कामही करता येणार नाही. लय व तालाचे योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच तालांचे वजन, बोलांचे वजन, तालांचे विभाग व तालांची इतर माहिती, लयीचे प्रकार या सगळ्यांचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे.


५} स्वर ज्ञान :- तबला वादकाला जसे ताल, लय यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे तसेच स्वरज्ञान असणेही आवश्यक आहे. तबला वादकाला आपला तबला स्वरात मिळवता येणे देखील आवश्यक आहे. तबला स्वरात लावता न येणं, स्वरज्ञान नसणं हा एक दोष आहे.


६} अनुकरण :- चांगल्या वादकांचे गुण आत्मसात करण्याची व त्यांच्या चांगल्या रचना आणि वादनाचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती असणे हे चांगल्या तबला वादकाचे लक्षण मानले जाते, तर इतर कलाकारांच्या चांगल्या गुणांकडे, त्यांच्या चांगल्या वादनाकडे दुर्लक्ष करणे हे वादकाचे दोष म्हणता येतील.


७} निकास :- बोलांचा निकास सुस्पष्ट असावा. खुले व बंद बोल वाजवण्यात कौशल्य असावे. बोलांची पढंत खणखणीत असावी, हे सगळे गुण आहेत, तर वादनात कर्कशपणा असणे, पढंत सुस्पष्ट नसणे हे सगळे दोष आहेत.


८} सादरीकरण :- चेहरा प्रसन्न, आनंदी ठेवणे, शांतपणे पण वजनदार, प्रगल्भ वादन करणे, श्रोत्यांशी सुसंवाद साधणे हे सगळे गुण आहेत, तर तबला वाजविताना अकारण अंग घुसळणे, चेहेरा वेडा वाकडा करणे हे दोष आहेत.


९} आदर :- गुणीजन, गुरुजन यांचा आदर करणे, श्रोत्यांबद्दल कृतज्ञता असणे, तसेच सतत शिकण्याची जिज्ञासा असणे हे गुण आहेत. तर गुरुजनांचा अपमान करणे, अनादर करणे, श्रोत्यांपुढे उद्धट वर्तणूक करणे, नवनवीन शिकण्याची ओढ नसणे हे सगळे तबला वादकाचे दोष आहेत.


१०} निवड :- योग्य तबला निवडणे, पुडी चांगली का वाईट ह्याचे ज्ञान असणे, उपलब्ध वेळेनुसार स्वतंत्र वादनासाठी योग्य ताल, योग्य रचना, योग्य वजनाचे आणि रागाचे लेहरे निवडणे हे सगळे तबला वादकाचे गुण आहेत. तर तबला निवडता ना येणे, संगीताची जाण नसणे, रागांची माहिती नसणे हे तबला वादकाचे दोष आहेत.


वरील सर्व गुण-दोष ध्यानात ठेवून आपली कला जिवंत ठेवणे हे प्रत्येक कलाकाराचे कर्तव्य आहे.


YouTube Link - https://youtu.be/LrV4XbAXiUM?si=wdZXyJWfissLpJNV

Recent Posts

See All

तालांची वैशिष्टये -

१) तीनताल / त्रिताल - हा तबल्यातील व स्वतंत्र तबला वादनातील प्रमुख ताल आहे. विलंबित, मध्य व द्रुत अशा तीनही लयीत हा ताल वाजविला जातो....

'बायाँ' च्या वादनात संतुलन राखण्यासाठी रियाजाची पद्धत

तबला हे वाद्य दायाँ (तबला) आणि बायाँ (डग्गा) या दोन वाद्यांचा मेळ साधून निर्माण झालेले वाद्य आहे. तबल्यातून (दायाँ) निघालेले 'तार-स्वर'...

पेशकार, कायदा तसेच रेला यांचे एकल तबला वादनातील स्थान आणि महत्व

तबला हे तालवाद्य, सर्व तालवाद्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असण्याचे कारण म्हणजे, तबला हे तालवाद्य सर्वाधिक विकसित व उपयोगी आहे. या...

Kommentare


bottom of page