top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

ताल निर्मितीचे मूळ व विकास


इ.स. सुमारे ४०० च्या आसपास लिहिल्या गेलेल्या 'भरतमुनींच्या' 'नाट्यशास्त्रातील' विवेचनावरून असे दिसून येते की, त्या काळी सर्व भारत वर्षात एकच संगीत-पद्धती प्रचलित होती. ही पद्धती साधारणपणे 'संगीत-रत्नाकरा'च्या काळापर्यंत अस्तित्वात असावी. सतराव्या शतकात म्हणजे बादशाह शहाजहाँ च्या कारकिर्दीत शहजादा दाराच्या अंतःपुरात एक स्त्री उभ्याने तबला-डग्ग्याची जोडी कंबरेस बांधून साथ करीत असल्याचे चित्र उपलब्ध आहे. याप्रमाणेच महंमद शाह रंगीले च्या काळात म्हणजेच १७४५ मध्ये तयार झालेल्या एका चित्रात नर्तिकांबरोबर तबल्यावर साथ करणारी एक स्त्री दाखवलेली आढळते. या वरून असा निष्कर्ष निघतो की महंमद शहा रंगीलेच्याही आधीच्या काळात तबला हे वाद्य होते. परंतु त्याची साथ-संगत लोकसंगीत अथवा अंतःपुरातील लोकसंगीतापुरतीच मर्यादित होती.

वेदोपनिषदांच्या सुरुवातीच्या काळापासून भारतीय तालशात्र खूप वेगाने प्रगत झाले. निरनिराळ्या ३६० सम आणि विषम तालांचा उल्लेख व माहिती संस्कृत तालशास्त्रात आलेली आहे.


संगीत रचनांचा 'काल' मोजण्याचे परिमाण म्हणजे 'ताल'. प्राचीन काळात गायन होत असताना काल मोजण्याचे साधन म्हणून तालांची निर्मिती झाली. गायन, वादन व नृत्य या तीनही श्रेष्ठ कलांच्या साथीसाठी तालांचा उपयोग केला जातो. कोणत्या तालाचा उपयोग कशासाठी / केव्हां करायचा हे ठरविणे म्हणजे मात्रांची संख्या निश्चित करणे होय. प्राचीन काळी धृपद-धमार गायकीच्या साथीसाठी अधिक मात्रांचे ताल उदा. शिखर, धृपद, धमार हे खुल्या बोलांचे ताल निर्माण झाले व पुढे यात विकास होत गेला. ख्याल गायकीचा उगम झाला व मोठ्या मात्रांचे ताल कमी होऊन ख्याल गायकीस १२,१६ मात्रांच्या तालाला महत्व आले. तालशास्त्रात 'मार्गी ताल' व 'देशी ताल' असे दोन प्रकारचे ताल सांगितलेले आहेत.


ताल निर्मिती -


१) मात्रा - काल किंवा कालस्तर मोजण्याचे परिमाण म्हणजे 'मात्रा' होय. 'काल' मोजण्याचे 'ताल' हे परिमाण आहे तर 'ताल' मोजण्याचे परिमाण 'मात्रा' हे आहे. संगीतामध्ये अणुद्रुत, लघु, गुरू आणि प्लुत या पाच मात्रा प्रचलित आहेत.


२) खंड / विभाग - तालाच्या मात्रा निश्चित झाल्यावर त्याचे २ ते ४ मात्रांचे खंड पडत गेले. तालांच्या रचनेनुसार खंडांची संख्या निश्चित करण्यात आली.


३) टाळी / ताली - खंडांची संख्या निश्चित झाल्यावर टाळी निश्चित करण्यात आली. साधारणपणे पहिल्या मात्रेवर टाळी निश्चित केली गेली आणि तालाचे स्वरूप, मात्रा व विभाग पाहून उर्वरित टाळ्या निश्चित करण्यात आल्या.


४) काल / खाली - साधारणतः तालाचा आर्धा भाग झाल्यानंतरच्या मात्रेवर कालाचे स्थान निश्चित करण्यात आले. तालाच्या मध्यानंतरच्या मात्रेवर काल निश्चित केला गेला.


५) आवर्तन - तालाच्या लघु, गुरु इ. पादभागाची आवृत्ती, परिवर्तन म्हणून मानली जाते. यालाच तालाचे 'आवर्तन' असे म्हणतात. तालाच्या आरंभापासून, नियमानुसार पुनरावर्तित होणारा कालखंड म्हणजे 'आवर्तन' होय. विशिष्ट कालखंडाच्या, नियमितपणे पुन्हा पुन्हा होणाऱ्या चक्रात्मक गतीस 'आवर्तन' म्हणतात.

Recent Posts

See All

ठेका आणि ठेक्याचे गुणधर्म

ठेका - ताल म्हणजे कालाची आकड्यात मोजणी. जेव्हा मोजणीचे आकड्यातून / अंकातून विशिष्ट बोलांमध्ये रूपांतर होते, तेव्हा तो 'ठेका' होतो. तालाला...

मार्गी ताल व देशी ताल

इ.स. सुमारे ४०० च्या आसपास लिहिल्या गेलेल्या भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातील विवेचनावरून असे दिसून येते की, त्या काळी सर्व भारतवर्षात एकच...

ताल

ताल - संगीत शास्त्रामध्ये तालाचे स्थान अतिशय उच्च दर्जाचे व महत्वपूर्ण असे आहे. स्थिरपणाने स्थापित असणे या अर्थाच्या 'तल' या धातुला 'अ'...

Comments


bottom of page