top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

सुगम संगीताची साथ-संगत


सुगम या शब्दाचा अर्थ सरळ, साधा व सोप्पा असा होतो. सुगम संगीताला शब्दप्रधान आणि भावप्रधान गायकी असे म्हणतात. सुगम संगीतात भावगीत, भक्तीगीत, गझल, चित्रपटगीत, भजन इ. गीत प्रकारांचा समावेश होतो. सुगम संगीतात साधारणतः दादरा, केहरवा, रूपक, भजनी ठेका व क्वचित अध्धा व झपताल या तालांचाही वापर होतो. ठेका वाजविताना त्याची वेगवेगळी किस्म आणि प्रकार यांचाही वापर केला जातो. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या तालाच्या वेगवेगळ्या लग्ग्या यांचेही वादन केले जाते. सुगम संगीतात विविध छंदांचे वर्णन व वापर केलेला असतो. या छंदांना अनुरूप अशी भाषा वापरली जाते. ठेक्यांची लय साधारणतः मध्य वा द्रुत असते.


१) भजन - भजन ही भक्तिरसपूर्ण गायकी आहे. या गीत रचनेत ईश्वर स्तुती, आळवणी यांचे प्रत्यंतर येते. भजन अतिशय भक्तिभावाने गायले जाते. भजन साधारणपणे धुमाळी, दादरा, भजनी ठेका इ. तालात गायले जाते. काही प्रसंगी केहरवा व दीपचंदी या तालातही भजन गायले जाते. गीत गातांना ठेका वाजविला जातो व कडवे पूर्ण झाल्यावर मुख्य ओळ म्हणजेच ध्रुवपद गात असताना तबलावादक विविध लग्ग्या वाजवून या गीत प्रकाराची रंजकता वाढवित असतो. भजनाची संगत करताना भरीव व आसदार ठेका वाजवितात.


२) भावगीत - या गीत प्रकाराला सुगम संगीताचे महत्वाचे अंग मानले जाते. सुगम

संगीतात भावगीत या गीत प्रकाराला महत्वाचे स्थान आहे. शब्दप्रधान व अर्थपूर्ण असलेल्या गीताची साथ करण्यासाठी तबलावादकाला खूप मेहनत घ्यावी लागते. या गीत प्रकाराची साथ करण्यासाठी तबलावादकाला केवळ शुद्ध ठेका वाजवून चालत नाही, तर भावगीताच्या साथीसाठी विविध प्रकारांनी ठेका सजविला जातो. भावगीताची जी चाल असते, त्यानुसार विविध ठेके वाजविले जातात. त्याचबरोबर विविध लग्ग्या वाजवून भावगीताला साथ केली जाते. भावगीते ही साधारणतः दादरा, केहरवा, रूपक, झपताल व दीपचंदी या तालात गायली जातात.


) चित्रपटगीत - हा सुद्धा सुगम संगीतातील एक लोकप्रिय गीत प्रकार आहे.

भावगीताप्रमाणेच या गीत प्रकाराची साथ केली जाते. तबलावादकाची कल्पना-शक्ती, तल्लख बुद्धिमत्ता, हाताची तयारी, प्रसंगावधान, समयसूचकता व वादनकौशल्याचे दर्शन, या गीत प्रकाराची साथ-संगत करताना होते.


४) गझल - गझल हा सुगम संगीताचाच एक गान प्रकार आहे. तसेच या गान प्रकारात शब्दांना व ठेहरावांना अधिक महत्व दिले जाते. गझल गायनात शब्दफेक अतिशय महत्वाची असते. उर्दू, फारसी, अरबी या भाषेतील हा गीतप्रकार हल्ली एक लोकप्रिय गीत प्रकार म्हणून मान्य झाला आहे. या काव्यात शृंगाररस प्रमुख असून आषुक-माषुक वर्णन, सौंदर्य वर्णन, शेरो-शायरी, सवाल-जवाब, विरह रस इत्यादीचे वर्णन असते. दादरा, केहरवा या तालात गझल गायली जाते. मूळचा उर्दूतील हा गीतप्रकार जनमान्य, लोकमान्य, लोकप्रिय झाला आहे. यात शायरीला स्वरांमध्ये बांधून नजाकत, अदाकारीने गझल पेश केली जाते. विशिष्ट शब्दोच्चारण, पातळ आवाज व लयीवर प्रभुत्व असणे गझल गायकास आवश्यक असते. बेगम अख्तर, पंकज उधास, गुलाम अली, मेहेंदी हसन यांची नावे गझलगायक म्हणून प्रामुख्याने घेतली जातात. गझल या शब्दप्रधान व अर्थप्रधान गीतप्रकाराची साथ करण्यासाठी तबलावादकाला खूप परिश्रम घ्यावे लागतात. या गीताची साथ करण्यासाठी समयसूचकता व उस्फूर्तता असावी लागते. विविध ठेके व रंगतदार लग्ग्या वाजवून गझल गायनाची रंजकता वाढविली जाते. पंडित हरिहरन यांची गझल व उस्ताद झाकीर हुसैन यांची तबला साथ असलेल्या 'हाज़िर' या ध्वनिफिती, गझल या प्रकाराचे एक उत्तम उदाहरण आहे.

Recent Posts

See All

वाद्यसंगीताची साथसंगत -

१) गायकी अंग व तंतकारी अंग या दोन्ही प्रकारांची माहिती २) गायकी अंगात ख्यालाप्रमाणेच साथ परंतु हाताची तयारीसुद्धा अपेक्षित ३) तंतकारी...

ख्यालाची साथसंगत -

१) नादमय, सशक्त आणि आसदार ठेका २) लयदारी ३) बडा व छोटा ख्याल यांच्या मांडणीचा अभ्यास. (ठेकापूर्व आलाप, नोमतोम, मुखडा, सम, बंदिशीची लय,...

Comments


bottom of page