top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

शास्त्रीय संगीताची साथ-संगत


शास्त्रीय संगीतात ख्याल गायन, तराणा, धृपद - धमार, चतरंग, त्रिवट इ. गीतप्रकारांचा समावेश होतो. ख्याल गायनाची साथ करण्यासाठीच तबल्याची निर्मिती झाली असावी असे मानले जाते. या गानप्रकारांच्या साथ-संगतीचा सिद्धांत खालील प्रमाणे :


१} ख्याल गायकी - आज ही सदाबहार गायकी सर्व गीत प्रकारात श्रेष्ठ मानली जाते. धृपद-धमार गायकी लोप पावल्यानंतर या गायकीचा प्रचार व प्रसार झाला. ही गायकी शांत, मधुर व शृंगाररसपूर्ण आहे. या गायकीत राग स्वरूप कायम ठेऊन आलाप, ताना, बोलताना, लयकारी, सरगम इत्यादींच्या कल्पक विस्ताराने गायकीमध्ये रंग भरले जातात. धृपद ही ताल प्रधान तर ख्याल ही स्वर प्रधान गायकी आहे. ख्याल गायकीचे दोन प्रकार आहेत.


i) विलंबित ( बडा ) ख्याल - हा गानप्रकार विलंबित लयीत, म्हणजेच संथ लयीत गायला जातो. या गानप्रकारात शब्द कमी असून स्थायी व अंतरा अशा दोन प्रकारात याची रचना असते. विलंबित ख्याल, विलंबित तिलवाडा, एकताल, झुमरा, तिनताल इ. तालात गातात. बडा ख्यालाची सुरुवात झाल्यावर एखादा मुखडा अथवा उठाण वाजवून तबलावादक समेवर येतो व ठेका वाजविण्यास सुरुवात करतो. विलंबित लय असल्यामुळे डग्ग्यावरील मिंडकाम, घिसकाम, तसेच अधून-मधून तिट, तिरकिट, त्रक अशा विविध बोलांचा भरणा करून ठेका वाजविला जातो व गायनास शांत, मधुर व शृंगारिक साथ केली जाते.


ii) द्रुत ( छोटा ) ख्याल - हा गानप्रकार बडा ख्यालापेक्षा द्रुत लयीत गातात. छोटा ख्याल विशेषतः तिनताल, झपताल, एकताल, रूपक इ. तालांच्या मध्य लयीत गायला जातो. छोटा ख्यालसुद्धा अस्थायी व अंतरा अशा दोन भागात गायला जातो. तबलावादक तालाचे स्वरूप स्पष्ट करून सम व कालाचे स्थान दर्शवित ठेका वाजवितो. ठेक्याचे विविध प्रकार वाजवून गायनास अनुरूप अशी साथ-संगत करावी लागते. गायनाच्या मधे मधे मुखडा, तुकडा, मोहरा, तिहाई घेऊन योग्य व आकर्षक अशी संगत करावी लागते. गायकाने तान घेतली असता, तशाच अंगाचा एखादा तुकडा वाजवून साथ करणे, हे तबला -वादकाच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. यास 'सवाल-जवाब' वा 'लडन्त-भिडन्त' असे म्हणतात. हे करीत असताना गायक व तबला वादक दोघेही तालाला पक्के, अतिशय बुद्धिमान, लयीला पक्के, लयकारींवर प्रभुत्व असणारे आणि अनुभवी कलाकार असणे आवश्यक असते.



२} स्वर प्रधान व लय प्रधान गायकी - स्वर-प्रधान गायकीत संपूर्ण वादनात शक्यतोवर भरणायुक्त, आसदार ठेका वाजवावा लागतो. शक्यतोवर चौपटीतील अक्षरांचा वापर करू नये. सरळ, स्पष्ट व वजनदार ठेका वाजवावा. लय-प्रधान गायकीत, दुप्पट-चौपट लयीतील बोल, लयीच्या अंगाने, आलापी व तानांच्या अनुषंगाने वाजवित, शेवटच्या दोन-चार मात्रांमध्ये दुपटीत वा चौपटीत एखादा सुंदर मुखडा वाजवून समेचे सौंदर्य वाढवावे. विलंबित लयीत, स्थायी व अंतरा गात असताना आलाप, बोल-आलाप, बेहलावे इ. मुक्त बरसात करून गायक ख्यालाची बढत करीत असतो. म्हणजेच तो लय वाढवित जातो व जेव्हा ताना घेतो तेव्हा तबलावादकाने लय वाढवून त्याला योग्य, पोषक, मिळती-जुळती अशी साथ संगत करणे हे वादकाच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचे लक्षण असते.


३} तराणा - हा गीत प्रकार छोटा ख्याला नंतर साधारणपणे अतिद्रुत लयीत गायला जातो. यात शब्दांपेक्षा गतीला जास्त प्राधान्य असते. तन देरेना, नोम-तोम इ. शब्दांच्या सहाय्याने अती जलद लयीत तराणा गातात. या गीत प्रकाराची साथ करताना, तबलावादकाला आपली तयारी, कला दाखविण्याची संधी असते. मध्य लयीत सुरू होणारा तराणा द्रुत लयीत संपतो. त्यामुळे द्रुत लयीत साथ करताना तबलावादकाचे कौशल्य व हाताची तयारी श्रोत्यांना दिसून येते. तराणा सर्वसाधारणपणे द्रुत तिनताल, द्रुत एकताल या तालांत गायला जातो.


अशाप्रकारे शास्त्रीय संगीताची साथ करताना तबलावादकाने शुद्ध ठेकाच वाजविणे अपेक्षित असते. थोडक्यात, शास्त्रीय गायनास अनुरूप, पोषक व उठावदार साथ-संगत तबलावादकाला करावी लागते व ही साथ-संगत अथक मेहेनत, परिश्रम, सातत्य, रियाज, गुरु निष्ठता व गुरूंच्या योग्य मार्गदर्शनाने करणे गरजेचे असते आणि अशी केलेली साथ-संगतच योग्य, आकर्षक, परिपूर्ण, प्रेक्षकवर्ग आणि गायक-कलाकार यांचे लक्ष वेधून घेणारी व मने जिंकून घेणारी असते.

Recent Posts

See All

वाद्यसंगीताची साथसंगत -

१) गायकी अंग व तंतकारी अंग या दोन्ही प्रकारांची माहिती २) गायकी अंगात ख्यालाप्रमाणेच साथ परंतु हाताची तयारीसुद्धा अपेक्षित ३) तंतकारी...

ख्यालाची साथसंगत -

१) नादमय, सशक्त आणि आसदार ठेका २) लयदारी ३) बडा व छोटा ख्याल यांच्या मांडणीचा अभ्यास. (ठेकापूर्व आलाप, नोमतोम, मुखडा, सम, बंदिशीची लय,...

Comments


bottom of page