top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

रियाज म्हणजे काय?


रियाज ही संकल्पना बऱ्याचवेळा खूप वर्षे (गुरुंकडून) शिक्षण घेऊनही नीट समजलेली नसते, असे खूपदा जाणवते. रियाज म्हणजेच "विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन (गुरुंच्या) योग्य मार्गदर्शनाच्या आधारे, होकारात्मक दृष्टिकोनासहित, उद्देशाच्या पूर्तीसाठी केलेल्या अविश्रांत मेहेनतीची दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया" होय. संगीतातील ताल हा एक महत्वाचा घटक आहे आणि तबला हे तालवाद्य असल्यामुळे संगीतातील प्रत्येक प्रकाराच्या तालविषयक गरजांची पूर्तता करण्याची जबाबदारी तबल्याची, जेणेकरुन तबला वादकांची असते. या सर्व गोष्टींसाठी योग्य मार्गदर्शन व सद्सद विवेकबुद्धी जागृत ठेवून मेहेनत करणे अतिशय गरजेचे आहे.


रियाज हा विषय अत्यंत मोठा असल्याने विषय समजण्याच्या दृष्टिकोनातून त्याचे भाग पाडल्यास हा विषय समजून घेणे सुकर होईल.


i. क्रियात्मक रियाज

ii. सैद्धांतिक रियाज


i. क्रियात्मक रियाज - क्रियात्मक रियाजा मध्ये खालील गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे -


१) निकास - निकास याचा शब्दशः अर्थ "बाहेर पडण्याचा मार्ग" असा होतो. तबल्याच्या संदर्भात "ध्वनी बाहेर येण्याचा (पडण्याचा) मार्ग होय," असे म्हणता येईल. तबल्यातून ध्वनी म्हणजेच विशिष्ठ नाद बाहेर येणे म्हणजेच निकास होय.

तबल्यामध्ये आसदार, सुरेल व सशक्त नाद वादनातून निर्माण करणे चांगल्या तबला वादकाचे लक्षण आहे. त्यासाठी रियाजाइतकेच 'योग्य निकास' या गोष्टीसही अनन्य साधारण महत्व आहे. तबला-डग्ग्यातून विविध वर्ण निर्माण करण्याची पद्धत म्हणजे निकास होय. तसेच तबला वादनाच्या विशिष्ट पद्धतीलाही निकास असे म्हणता येईल.


२) अक्षर साधना - आपण तबल्याची जी भाषा ठरविली आहे त्याला अनुसरून प्रत्यक्ष वादन करतेवेळी, ती अक्षरे 'सजीव' करण्याची ताकद अक्षर साधनेमुळे प्राप्त होण्यास मदत होऊ शकते. एखाद्या बोलावर प्रभुत्व मिळवण्यासाठी संबंधित बोलाची किती अक्षर-साधना करावी याबाबत निश्चित काही सांगता येणार नाही. कारण, अक्षर-साधना करावी तेवढी थोडीच असते व एखादा बोल किती कालावधीत एखाद्याच्या हातून चांगला वाजेल ते प्रत्येकाला मिळालेले मार्गदर्शन, हाताची ठेवण, प्रकृती, ग्रहण क्षमता इ. गोष्टींवर अवलंबून असते. म्हणून स्वतःला 'दृष्टी' येईपर्यंत याबाबतीत गुरुंच्या आज्ञेचेच पालन करणे योग्य ठरेल. या सगळ्यामुळे अक्षर साधनाही अत्यंत महत्वाची आहे.


३) बोलांची स्पष्टता - अक्षर साधना ही वादनामध्ये बोल स्पष्ट व स्वच्छ वाजण्यास मदत करते परंतु वरच्या लयीत म्हणजेच जेथे दोन अक्षरांमधील ( मात्रांमधील ) अंतर विलंबित किंवा मध्य लयीपेक्षा कमी असते त्यावेळी नकळत बोलांची स्पष्टता कमी झाल्यामुळे वादकाची लय वाढणार नाही ह्याची खबरदारी घेणे आवश्यक असते. ज्या लयीत सर्व बोल स्पष्ट, खणखणीत व अतिशय सहजतेने ( शरीराच्या कोणत्याही विचित्र हालचाली न करता ) किमान १० ते १५ मिनिटे वाजविता येईल अशी काळजी रियाज करताना घ्यावी. ह्या टप्प्यामध्ये बोलांच्या स्पष्टतेकडे अतिशय काटेकोरपणे लक्ष देणे आवश्यक आहे.


४) तयारी (वादनातील वेग) - सध्याच्या काळात तबला वादनामध्ये तयारीला अनन्यसाधारण महत्व आहे. परंतु, प्रत्येक बोल अगदी सहजतेने, स्वच्छ आणि स्पष्ट वाजू लागल्यावरच ते बोल अथवा तो कायदा वेगात वाजविण्याच्या विचाराकडे वळावे, तोपर्यंत बोलाच्या शुद्धतेकडेच जास्त लक्ष द्यावे. हाताच्या तयारीसाठी व वेगासाठी, रियाज करतानाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निकास, स्पष्टता इ. गोष्टींशी प्रामाणिक राहावे. बोल जर स्वच्छ, सुस्पष्ट वाजत नसतील तर वादनातील वेग कुचकामी ठरतो. तो कोणत्याही प्रकारचे सौंदर्य निर्माण करू शकत नाही.


५) दमसास - तबला वादनामधील अत्यंत आवश्यक गोष्ट म्हणजे 'दमसास' होय. दमसास हा स्वतंत्र वादन तसेच साथसंगतीतही अत्यंत महत्वाचा आहे. कोणतीही रचना केवळ तयारीने वाजून उपयोग नाही तर ती दीर्घकाळ अविश्रांतपणे, त्याच तयारीने, स्पष्टतेने व जोमाने वाजली पाहिजे. हात व बोटातील चापल्य व ताकद वादनादरम्यान टिकून राहणे यालाच 'दमसास' असे म्हणतात. तसेच दमसास वाढवण्यासाठी 'चिल्ला' या वादनप्रकाराचाही प्रयोग केला जातो, ज्यामुळे हाताची तयारी, वादनाचा वेग व दमसास वाढण्यास चांगलाच फायदा होतो.


आता 'सैद्धांतिक' रियाज म्हणजे काय ते पाहू


१) तालशास्त्र - तबला हे वाद्य संगीताच्या परिमाणाचे काम तालाच्या माध्यमातून करीत असल्याने तबला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना तालशास्त्राच्या सखोल अभ्यासाची अत्यंत आवश्यकता आहे. तबल्यामध्ये वादन-कौशल्याबरोबरच विविध ताल, जाती, पटी यामध्ये कायदे, तिहाया, तुकडे-मुखडे वाजवण्याच्या व हातावर टाळी देऊन म्हणण्याच्या म्हणजेच 'पढंत'ला खूप महत्व आहे. तसेच लयकारी, विविध विश्रामांच्या (उदा. पाव, अर्धा, पाऊण मात्रा इ.) तिहाया, साथसंगतीतील अतिविलंबीत लयीत वाजले जाणारे ताल, पेशकाराच्या मुक्त विहारातील जटिल तालशास्त्र, ह्या सर्व गोष्टींसाठी ती प्रत्येक गोष्ट हातावर म्हणता येणे अत्यंत आवश्यक आहे. ह्या सर्व गोष्टींमुळे तबल्याच्या सैद्धांतिक रियाजामधील 'तालशास्त्र' हा अतिशय महत्वाचा घटक आहे. वरील सर्वच गोष्टींचा स्वतंत्र वादन व साथसंगतीतही खूपच फायदा होतो.


२) घराण्यांचा अभ्यास - तबल्यामध्ये दोन प्रमुख बाज व त्यावर आधारित सहा (६) घराणीआहेत. या प्रत्येक घराण्याची खासियत वेगवेगळी आहे. सर्वसाधारणपणे तबल्याच्या प्रारंभीच्या शिक्षणात दिल्ली घराण्याचा कायदाच शिकवला जातो. प्रत्येक बोटात ताकद व वेग येण्यासाठी प्रथमतः दिल्ली बाजाच्या कायद्यांचा रियाज लाभदायक ठरतो. पण नंतरच्या काळात मात्र सर्वच घराण्यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे. प्रत्येक बाजाची निकास पद्धत इतरांपेक्षा वेगळी असल्याने तबला-डग्ग्यावरील निकासाच्या सर्व अंगांचा सखोल अभ्यास, विविध घराण्यांच्या रचना वाजविण्यामुळे होतो. तबल्याच्या प्रत्येक विद्यार्थ्याने आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक घराण्याच्या रचना त्या त्या घराण्याने आखून दिलेल्या निकासाच्या नियमांचे पालन केल्यावरच सौंदर्यपूर्ण वाटतात, अन्यथा नाही. म्हणूनच प्रत्येक घराण्याचा सखोल अभ्यास केल्याने वादन निश्चितच परिणामकारक होते.


३) स्वतंत्र तबला वादनातील संकल्पनांचा सखोल अभ्यास - स्वतंत्र तबला वादनातील पेशकार, कायदा, रेला, गती, तुकडे-मुखडे, चक्रदार, परण यांचा त्या त्या घराण्यानुसार अभ्यास करुन गुरुंकडून त्यांच्या योग्य निकासी शिकून, त्यांचे योग्य ते वजन, वैशिष्ट्य व नाद-माधुर्य आणि त्याचबरोबर त्या प्रत्येक रचनेचा वेग, ह्या सर्वच गोष्टींचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.


या अभ्यासात तयारी, सहजता, स्पष्टपणा, गणित, ह्या आणि अशा, वर नमूद केलेल्या गोष्टींना जेवढे महत्व आहे त्याहीपेक्षा त्या गोष्टी योग्य वजनाने, हातावर टाळी धरुन म्हणण्यास म्हणजेच 'पढंत' करण्यास अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळेच गती वाजवण्यापूर्वी त्या सर्वसाधारणपणे पढंत केल्या जातात, ज्यामुळे त्या रचनेतील सौंदर्य, भाषा सौंदर्य, शब्दालंकार, यमक, लयकारी, गणिती सौंदर्य, शब्दांतील चढ-उतार इ. चांगल्या प्रकारे श्रोत्यांना समजतात व वाजविताना ( पढंत केल्यामुळे ) त्या अधिक सफाईदारपणे वाजविल्या जातात. म्हणूनच या सैद्धांतिक तसेच बौद्धिक रियाजामध्ये तालशास्त्र, घराणी, वादनकौशल्ये, इ. बरोबरच 'पढंत' या गोष्टीलाही तितकेच महत्व आहे. वरील सर्वच गोष्टींचा सखोल अभ्यास करणे हे तबलावादकाचे प्रमुख ध्येय असावे.


४) पढंत - तबल्याची भाषा ही व्यावहारिक अर्थाच्या भाषेपेक्षा पूर्णतः भिन्न असून तबला-डग्ग्यातून प्रगट होणाऱ्या विविध नाद-ध्वनींच्या सांकेतिक अक्षराद्वारे प्रकट होणारी ही जाणिवेची भाषा होय. व्यावहारिक भाषेतील व्याकरण तसेच काव्याचे विविध प्रकार, छंद, गीत, वृत्त, जाती, इ. असंख्य प्रकार तबल्याच्या शास्त्रातही रचले गेले आहेत, एवढी तबल्याची भाषा समृद्ध आहे. बंदिशींचा आकार, शब्द, वजन, विराम, ऱ्हस्व, दीर्घ, जोरदार तथा मुलायम आघात इ. सर्व गोष्टी बंदिशींमध्ये समाविष्ट असतात. तबल्याची भाषा ही आपली अर्जित प्रेरणा आहे, म्हणजेच प्रयत्नपूर्वक मिळवलेली प्रेरणा होय. पण वाणी ही जैविक प्रेरणा आहे. म्हणूनच मातृभाषा ही न शिकवता येते. तबल्याची भाषा ही तबला-डग्ग्यातील नादांमधून प्रकट होते. कष्टसाध्य असलेली अर्थातच ती अर्जित प्रेरणा आहे. तबल्याची भाषा वाजत जरी असली तरीही शिकवताना प्रथमतः ती मौखिक रित्या शिकविली जाते. त्याचे कारण एवढेच की त्या भाषेची अनुभूती प्रथम वाणीला झाल्यास मेंदूवर त्याचे संस्कार विनासायास होऊ शकतात. तसेच वाणीद्वारे प्रथमतः त्याचे अध्ययन केल्यास संबंधित रचनेची भाषा, त्यातील चढ-उतार, भाषेतील विविध नियम, वैशिष्ट्ये इ. गोष्टी, वाजविण्यापेक्षा म्हणण्यामुळे म्हणजेच पढंतमुळे लवकर लक्षात येतात. म्हणूनच असे म्हंटले जाते की, जी गोष्ट वाणीतून स्पष्ट प्रकट होत नाही, ती हातातूनही स्पष्ट प्रकट होत नाही. भाषेचे संस्कार, भले ती भाषा तबल्याची असो वा व्यवहाराची, वाणीद्वारेच लवकर होतात.

तबल्याच्या बोलांची पढंत हा एक अतिशय कष्टसाध्य प्रकार आहे. केवळ यांत्रिकपणे, कोणत्याही प्रकारचे चढउतार, विराम यांचा विचार न करता केली गेलेली पढंत, हा एक निर्जीव प्रकार आहे. विद्वान लोकांनी केलेल्या पढंतचे श्रवण नेहमीच फायदेशीर ठरते. तबल्यातील कित्येक गोष्टी अशा आहेत की, ज्या केवळ वाजविल्याने लोकांना कळत नाहीत वा त्या परिणामकारक वाटत नाहीत. यासाठी 'पढंत' आवश्यक आहे. तबल्यातील विविध घराण्यांनी आपापल्या श्रेष्ठ रचना व विचारांद्वारे तबल्याच्या साहित्यात विविध दृष्टीने मोलाची भर घातली आहे. हे विविध साहित्य-प्रकार केवळ वाजवून दाखविल्यास त्याचे सौंदर्य निश्चितच कळत नाही म्हणून 'पढंत'ला तबला वादनात अतिशय महत्वाचे स्थान आहे.

Recent Posts

See All

'बायाँ' च्या वादनात संतुलन राखण्यासाठी रियाजाची पद्धत

तबला हे वाद्य दायाँ (तबला) आणि बायाँ (डग्गा) या दोन वाद्यांचा मेळ साधून निर्माण झालेले वाद्य आहे. तबल्यातून (दायाँ) निघालेले 'तार-स्वर'...

पेशकार, कायदा तसेच रेला यांचे एकल तबला वादनातील स्थान आणि महत्व

तबला हे तालवाद्य, सर्व तालवाद्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असण्याचे कारण म्हणजे, तबला हे तालवाद्य सर्वाधिक विकसित व उपयोगी आहे. या...

पढंतची आवश्यकता -

स्वतंत्र तबलावादनाच्या सादरीकरणामध्ये 'पढंत'चे स्थान महत्वपूर्ण आहे. या सादरीकरणामध्ये प्रथम वाचेद्वारे वाचून नंतर त्याचं सादरीकरण (पेश...

Comments


bottom of page