top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

पंजाब घराणे


६) पंजाब घराणे - भारतातील सहा प्रमुख घराण्यांपैकी 'पंजाब' घराणे हे तबलावादनातील वैशिष्टयपूर्ण घराणे ठरले ते त्याच्या तबला वादनातील निराळ्या बाजामुळे. दिल्ली घराण्याचे उस्ताद सिद्धार खाँ ढाढी व पंजाबचे लाला भवानीदास हे दोघेही समकालीन होते व दोघेही उत्तम पखवाज वादक होते. त्या काळी दिल्ली मध्ये बादशहा महम्मद शहा रंगीले याचे राज्य होते. या दोन्ही कलाकारांमध्ये पहाटेच्यावेळी जुगलबंदी होत असे. लाला भवानीदास हे पंजाब घराण्याचे एक निष्णात पखवाज वादक होते. त्यांनी, उस्ताद कादर बक्ष खाँ साहेब, उस्ताद ताज खाँ डेरेदार, उस्ताद हद्द खाँ लाहोरवाले, उस्ताद अमीर अली खाँ साहेब अशी एक थोर शिष्य परंपरा निर्माण केली, जी पुढे, उस्ताद हुसेन बक्ष खाँ साहेब, उस्ताद फकीर बक्ष खाँ साहेब, उस्ताद मियाँ कादर बक्ष खाँ साहेब आणि उस्ताद अल्लारखा खाँ साहेब अशा प्रतिभावंतांनी समर्थपणे चालू ठेवली.

पंजाब घराण्याची ही परंपरा जवळपास २०० ते २५० वर्षांची आहे. पंजाब

घराण्याची निर्मिती झाली ती पखवाज वादनानेच आणि प्रारंभीच्या काळात पखवाज वादन हेच पंजाब घराण्याचे वैशिष्ट्य होते. बाकी घराण्यांच्या तुलनेत पंजाब घराण्यामध्ये तबला वादन थोडे उशिराने सुरु झाले. असे म्हटले जाते की, उ. अल्लारखा खाँ साहेबांचे दादागुरू 'उस्ताद मियाँ फकीर बक्ष साहेब' यांनी, पखवाजाच्या भाषेत थोडे परिवर्तन करून, ती तबल्यासाठी अनुकूल केली आणि त्याचबरोबर 'तबल्याच्या' पंजाब घराण्याचा प्रारंभ झाला.


पंजाब बाज / वादनशैली - पखवाज वादनाची खुल्या बाजाची परंपराच पुढे तबला वादनात 'तबला-धामाच्या' रुपात चालू राहिली. 'धामा' म्हणजे डग्गाच, फक्त त्यावर शाई न लावता पखवाजाप्रमाणे कणिक लावली जाते. त्यामुळे धाम्यावर बाज पखवाजाचाच वाजविला जातो, परंतु काहीवेळा तबल्याची हलकी शैलीही त्यावर वाजविली जाते. पखवाजाच्या बोलांनीच त्याची शैली आणि भाषा समृद्ध झाली आहे. धृपद-धमारच्या गायकीला वा किर्तनाला धाम्यानेच साथ सांगत केली जात असे. अशाप्रकारे ज्याला 'साथ' म्हटले जाते, त्या 'धामा'चा प्रचार व प्रसार त्यावेळी पंजाबमध्ये झाला आणि हाच 'बाज' तबल्यात परिवर्तन करून, उस्ताद मियाँ कादर बक्ष खाँ साहेब यांनी पंजाब घराण्याची मुहूर्तमेढ रोवली. पखवाजाची परंपरा असल्यामुळे या घराण्यात खुल्या बोलांचे वादन, व खुल्या हातांनी वादन केले जाते. चारही बोटांचा संयुक्तिक वापर करण्याचे तंत्रकौशल्य या घराण्यात दिसून येते.


पंजाब घराण्यातील बोल-समूह -

नट, तट, धट, धटत, दुगदून, नट-कताSन, घिंन-घिंन, धीरधीरकिट धीना, घेघेदि, कतगद्दी अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण बोल-समूहांचा वापर पंजाब घराण्यातील रचनांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतो.


पंजाब घराण्याची वैशिष्टये –


१) तिहाया - पंजाब घराण्याचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, आड-मात्रांपासून वाजविल्या जाणाऱ्या विविध विश्रामांच्या तिहाया. २,४,९ अशा मात्रांपासून तिहाया न घेता पावणेचार, सव्वाचार, सव्वासात अशा अनवट मात्रांपासून निरनिराळ्या तिहायांची रचना पंजाब घराण्यातील रचनांमध्ये दिसून येते आणि या तिहाया अतिशय सहजरित्या, नैसर्गिक आणि बेमालूमपणे समेवर येतात हे या पंजाब घराण्याचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे, जे परंपरेने चालत आलेले आहे.


२) मोहरा - पंजाब घराण्यामध्ये 'मोहरा' या रचनांचे वादन आणि निर्मिती खूप मोठ्या प्रमाणावर होते. मोहरा म्हणजे, एका आवर्तनाची तिहाईयुक्त आकर्षक बोल रचना होय. कोणत्याही मात्रेपासून तिहाईची सुरुवात करून ती समेवर येते, हे या 'मोहरा' रचनेचे वैशिष्टय.

उदा. साप जसा फरेब करतो म्हणजेच धोका देतो त्याचप्रमाणे मोहऱ्याची आणि त्यातील तिहायांची रचना केलेली असते. मोहरा अचानकपणे कुठल्याही मात्रेवर सुरु करून समेवर येतो. पंजाब घराण्यात 'मोहरां'चे प्रकार दिसून येतात. उदा. गझल चे मोहरे, साथ-संगतीचे मोहरे आणि स्वतंत्र वादनातील मोहरे इ.


३) इज़न - पूर्वीच्या काळी म्हणजे साधारण २००-२५० वर्षांपूर्वी पंजाब घराण्यामध्ये, एकल वादनाच्या सुरवातीला इज़न वाजविली जायची. इज़न म्हणजे उठाण. मुघल कलाकार आपल्या परवरदिगारचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांची आराधना करण्यासाठी स्वतंत्र वादनाच्या सुरवातीला एक छोटी आकर्षक बोलरचना म्हणजेच उठाण वाजवायचे, ज्या रचनेचा शेवट 'दिंदिंता धीरधीरकिटतक तक्कीट धा' या शब्दसमुहानी होत असे. आता ही परंपरा लुप्त होऊन आज याच इज़न रचना एकल तबलावादनात अविस्तारक्षम रचनांच्या स्वरूपात मध्य वा द्रुत लयीत वाजविल्या जातात.


४) पंजाब घराण्याची भाषा / लहेजा यांनी सुद्धा पंजाब घराण्याच्या भाषेवर प्रभाव पाडला आहे. जशी भाषा आहे तशीच बोल-रचना, वाक्यरचना आणि बंदिशींची बनावट केली गेली आहे. या घराण्यात अतिशय क्लिष्ट भाषेचा वापर तबला वादनात होतो. लयकारी, गणिती हिशेब, बंदिशी ही पंजाब घराण्याची वैशिष्ठये मानली जातात. चारही बोटांचा वापर करुन वादन केले जाते. तबल्यावर थाप मारुन वादन करण्याची पद्धत आहे. सर्व बंदिशींवर पंजाबी भाषेचा प्रभाव दिसून येतो. क्लीष्ट लयकारी, विविध जाती, निरनिराळ्या विश्रांतीच्या तसेच आकृतीच्या तिहाया, विविध चलन आणि मिश्र जातीत बांधलेल्या अव्वल गती, दीपअंगी बंदिशी (दीपचंदी च्या अंगाने जाणाऱ्या बंदिशी) आणि पंजाबी चाले ही पंजाबची आणखी काही वैशिष्ट्ये सांगता येतील.


५) पंजाब घराण्याच्या मूळ रचनांमध्ये पेशकार, कायदा यांचा समावेश फार कमी होता. कारण, यावर पखवाजाची छाप होती. परंतु उस्ताद अल्लारखा खाँ साहेबांनी आपल्या उत्स्फूर्त विचार-पद्धतीने आणि मनन-चिंतनातून स्वतंत्र अशी नवीन वादन-शैली निर्माण केली, ज्यात त्यांनी पेशकार, विविध कायदे यांची रचना केली. त्याचबरोबर रेला, रव, गत, गत-तुकडे, अविस्तारक्षम रचनांची तसेच स्वतःच्या स्वतंत्र रचनांची भर टाकली आणि पंजाब घराणे समृद्ध केले.


६) भारत-पाकिस्तान फाळणीमुळे आणि पंजाबमधील बरेचसे स्थायिक कलाकार

पाकिस्तानात गेल्यामुळे भारतातील त्याचे अस्तित्व जवळ-जवळ संपुष्टात आल्यासारखे झाले होते. परंतु अभ्यासू, विचारवंत उस्ताद अल्लारखा खाँ साहेबांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि अनेक रचनांच्या योगदानामुळे भारतात पुन्हा 'पंजाब' घराण्याचा प्रचार व प्रसार झाला व पंजाब घराण्याला लोकप्रियता लाभली.


पंजाब घराण्यातील महान तबला वादक –


उस्ताद मियाँ कादिर बक्ष, उस्ताद मियाँ फकीर बक्ष, उस्ताद करीम बक्ष पेरना, उस्ताद पीर बक्ष, उस्ताद मीरा बक्ष गिलवालिये, उस्ताद बाबा करम इलाही, उस्ताद भाई नासीर पखावजी, उस्ताद बाबा मलंग खाँ साहेब, उस्ताद अल्ला धेत्ता बिहारपूरी, उस्ताद अल्लारखा खाँ साहेब, उस्ताद बहादूर सिंह, खलिफा उस्ताद अख्तर हुसैन खाँ साहेब, उस्ताद मियाँ शौकत अली खाँ साहेब, पंडित सुशीलकुमार जैन, आचार्य लक्ष्मण सिंहजी, उस्ताद झाकीर हुसैन, पंडित योगेश समसी इ.

Recent Posts

See All

बनारस घराणे

५) बनारस घराणे :- या घराण्याचे संस्थापक पंडित रामसहाय हे होत. हे लखनौ घराण्याचे खलिफा उस्ताद मोदू खॉं यांचे शिष्य. पं.रामसहाय यांनी...

फरुखाबाद घराणे

४) फरुखाबाद घराणे :- खुल्या बाजातील लखनौ या आद्य घराण्याचे हे शागीर्द घराणे होय. लखनौ घराण्याचे उस्ताद बक्षू खॉं यांचे जावई उस्ताद हाजी...

लखनौ घराणे

३} लखनौ घराणे :- दिल्ली घराण्याच्या उदयानंतर थोड्या अवधीतच लखनौ घराण्याचा जन्म झाला. या घराण्यावर पखवाजाचा अत्यंत प्रभाव असल्याने या...

Comments


bottom of page