top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

पेशकार, कायदा तसेच रेला यांचे एकल तबला वादनातील स्थान आणि महत्व


तबला हे तालवाद्य, सर्व तालवाद्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असण्याचे कारण म्हणजे, तबला हे तालवाद्य सर्वाधिक विकसित व उपयोगी आहे. या वाद्यातून निर्माण होणाऱ्या आश्चर्यकारक नाद-विविधता आणि गतिमानतेमुळे तबला हे वाद्य सर्व संगीत प्रकारांमध्ये प्रभावपूर्ण संगत करू शकते. याचं आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की, गायन, वादन, नृत्य आणि एकल वादन या कला प्रकारांचे सादरीकरण या वाद्याच्या साथीनेच केले जाते. अनेक प्रतिभावंतांच्या सखोल अभ्यासातून तबला वादनाचे शास्त्र व साहित्य निर्माण झाले आहे. त्याचबरोबर वादनाच्या विभिन्न रचनांच्या निर्मितीसह त्याची घराणी व त्या घराण्यांच्या विविध शैली विकसित झाल्या.

पेशकार, कायदा, रेला व गत यातील रचनांचे स्वतंत्र तबला-वादनामध्ये असाधारण महत्व आहे. या रचनांचं एकल तबला वादनामध्ये असलेलं स्थान आणि महत्व काय आहे हे समजून घेण्यासाठी तबला वादनाची मूळ संकल्पना जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

तबला वाद्याची निर्मिती, खरं तर, ख्याल-गायनाची संगत करण्यासाठी झाली. पण त्याचबरोबर अशी संगत करता करता, स्वतंत्र तबला वादनाचा विचार होऊ लागला व त्यातूनच या संकल्पनेचा विकास झाला. या कारणामुळेच स्वतंत्र तबला वादनावर ख्याल गायनाचा प्रभाव पडलेला दिसून येतो. ख्याल गायकी प्रमाणे स्वतंत्र तबला वादनाचा प्रारंभही विलंबित लयीत होतो आणि हळू हळू लय वाढून शेवट द्रुत लयीत होतो. फक्त दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे की, ख्याल गायकीत एक राग, दोन वा तीन बंदिशींमध्ये गायला जातो तर, तबला वादनात एकच ताल, त्या तालाच्या रचनेनुसार वाढत्या लयीत सादर केला जातो. स्वतंत्र तबला वादनाच्या रचना दोन प्रकारच्या असतात. वादनाच्या पुर्वांगात पेशकार, कायदा व रेला या विस्तारक्षम रचना पेश केल्या जातात, तर उत्तरांगात गत, तुकडा, चक्रदार व परण अशा अविस्तारक्षम म्हणजेच वादनाच्या मूळ संकल्पनाधारीत अशा 'पूर्ण विकसित' रचना, पेश केल्या जातात.


प्रथम, आपण स्वतंत्र तबला वादनात पेशकार, कायदा व रेला या विस्तारक्षम रचनांचं कसं आणि किती महत्वपूर्ण स्थान आहे याबद्दल चर्चा करू.


पेशकार, कायदा तसेच रेला या तिन्ही रचना प्रकारांचं 'खाली-भरी' आणि 'खंडांशी' अगदी घट्ट नातं असतं. कोणतीही विस्तारक्षम असलेली रचना म्हणजे एक सूत्र असतं. कलाकार आपल्या प्रतिभेने या सुत्राचा विस्तार करतो. या सुत्राचा विस्तार करतांना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही, की तबला वादकाला त्या रचनांचं तसेच रचना विस्तारांच्या नियमांचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. पेशकार, कायदा आणि रेला या तीनही रचनांची प्रकृती वेगळी आहे, तसेच प्रत्येकाची विस्तार करण्याची पद्धत व नियमही भिन्न-भिन्न आहेत. या रचनांची असलेली स्वाभाविक प्रकृती आणि त्यांचा विस्तार करण्याचे असलेले वेगळे मार्ग, यामुळे त्या रचनांना स्वतंत्र तबला वादनामध्ये, आपले स्वतःचे एक स्वतंत्र स्थान आणि आगळे महत्व प्राप्त झाले आहे.


स्वतंत्र तबला वादनात 'पेशकारा'चे स्थान आणि महत्व -


तालाच्या विलंबित लयीने तबला वादनाची सुरुवात 'पेशकारा'ने होत असते. 'संथ गती आणि मुख्य मात्रांपासून थोडी मुक्त असणारी, डगमगती आणि मधेच ठेहराव असणारी लय' ही पेशकाराची मुख्य वैशिष्टये आहेत. या वादनात ख्याल गायकीच्या आलाप क्रियांचा प्रभाव जाणवतो. पेशकाराच्या परिणामकारक सादरीकरणात 'दायाँ-बायाँ'तून निर्माण होणाऱ्या नादांचे सुस्पष्ट आणि पूर्ण उच्चारण, त्याचबरोबर लय आणि लायकारीचा सखोल अभ्यास हा तबला वादकासाठी अत्यावश्यक आहे. पेशकाराचा विस्तार करतेवेळी, मुख्य रचनेत असलेल्या शब्दांव्यतिरिक्त अन्य शब्दांचा प्रयोग वा लय बदल करण्याचे स्वातंत्र्य कलाकाराला दिलेले असते. तबला वाद्याचे नाद वैविध्य, त्या भाषेचे विभिन्न शब्दबंध, खाली-भरीची कलात्मक पद्धत, तिहाई, लयकारी इ. तबला वादनाच्या सर्व अलंकारांचे सादरीकरण, 'उपज' अंगाने करणे, हा 'पेशकारा'चा मुख्य उद्देश आहे. पेशकाराचा आरंभ जरी विलंबित लयीत होत असला तरी त्याचा विस्तार हळू-हळू वाढणाऱ्या लयीत होत असल्यामुळे हे सादरीकरण, संपूर्ण तबला वादनाचे संक्षिप्त रूप असल्यासारखे वाटते. गायनातील आलापी आणि त्याला मिळालेली सक्षम संगत, यामुळे स्वतंत्र तबला वादनात पेशकाराला असाधारण महत्व आहे.


स्वतंत्र तबला वादनातील 'कायद्या'चे स्थान आणि महत्व -


स्वतंत्र तबला वादनाच्या पुर्वांगात पेशकारानंतर 'कायदे' वाजविले जातात. पेशकाराप्रमाणेच कायद्याच्या रचना देखील खाली-भरीयुक्त आणि विस्तारक्षम असतात परंतु, कायद्याचा विस्तार हा नियमांचे काटेकोर पालन करुन केला जातो. 'कायदा' हा शब्द 'कैद' या मूळ शब्दाचे रूप आहे, ज्याचा अर्थ 'नियम' किंवा 'बंधन' असा आहे. त्यामुळे साहजिकच कायद्याचा विस्तार नियमबद्ध असणे अनिवार्य आहे.


कायद्याचा विस्तार ज्या नियमांच्या आधारे होतो, ते प्रमुख नियम खालीलप्रमाणे -


१) कायद्याच्या विस्तार क्रियेमध्ये कायद्याच्या मुख-बोलांचाच केवळ उपयोग करणं बंधनकारक असते, अन्य बाह्य-बोल हे निषिद्ध मानले जातात.

२) खाली-भरीच्या नियमानुसार, भरीमध्ये वाजवलेल्या बोलांचीच म्हणजेच बायाँ विरहित नादांची खाली वाजविणे अपेक्षित असते.

३) खाली-भरीच्या विभागांची समाप्ती 'स्वरमय' अंत्यपदाने करण्याचा रिवाज आहे.

४) कायद्याचे मुख ज्या जातीमध्ये बांधले आहे, ती जाती शेवटपर्यंत कायम ठेवून विस्तार करणे हे अनिवार्य आहे.


अशा कडक नियमांचे पालन करून कायद्याचा विस्तार करणे हे तबला वादकांसाठी मोठे आव्हान असते. कायद्यामधील असलेल्या बोलांची उलटापालट करून त्याच बोलांच्या आधारे नवीन शब्दबंध निर्माण करून, त्या शब्दबंधात विभिन्न आकाराच्या विरामांची योजना करीत कायद्याच्या विस्तार मार्गाची निर्मिती केली जाते.

कायद्याची रचना दोन वा तीन शब्दबंधांच्या मर्यादेत होते आणि तिचा विस्तार एकाच जातीमध्ये केला जातो. त्यामुळे विविध शब्दबंध घेऊन आणि त्यात अलग-अलग जातींची योजना करून नव-नवीन कायदे तयार केले जातात.

तबल्याची विविध घराणी आपापल्या विचारानुसार कायद्याचा विस्तार करीत असतात. ही प्रक्रिया तबला वादकाचे हस्तकौशल्य आणि विचार याच्या एकवाक्यतेची परीक्षा घेणारी तर असतेच पण याशिवाय कायदा रचनेचा सखोल अभ्यास करण्यामधे तबला अध्ययनातील सर्वाधिक वेळ घेणारी असते. म्हणूनच एकल तबला वादनामध्ये कायदा रचनेला महत्वपूर्ण स्थान दिलं जातं.


स्वतंत्र तबला वादनातील 'रेल्या'चे स्थान -

'रेला' हा एक पंजाबी भाषेतील शब्द आहे, ज्याचा अर्थ 'प्रवाह' असा आहे. या अर्थाप्रमाणेच रेल्याची रचना प्रवाही म्हणजे गतिमान असते. खरं तर कायदा व रेला या दोन्हीमध्ये एक समान धागा आहे. या दोन्हीही विस्तारक्षम रचना आहेत आणि त्यांचा विस्तारसुद्धा एकाच जातीत होतो. परंतु रेल्यामध्ये असलेले बोल असे असतात जे द्रुत लयीत वाजविले असता त्यातून एकप्रकारचे गुंजन आणि मधुर नाद निर्माण होतो.

साधारणपणे, रेल्याची रचना एकाच शब्दबंधाच्या आधारे केली जाते. तिरकिट, धिरधिर, तकतक धिनगिन अशा शीघ्र गतीमुळे निर्माण होणाऱ्या नादमय शब्दबंधांनीच रेल्याची रचना केलेली असते. शब्दबंधातील कमी-अधिक गतिमानतेमुळे रेल्याचा विस्तार, त्यात असलेल्या अंतर्भूत वळणाच्या आधारे केला जातो. काही रेले एकाच चलनाच्या आधारे तयार केले जातात, त्यांना 'रौ' असे म्हणतात. गतिमान 'रौ' ऐकताना श्रोत्यांना 'चलन' ऐकत असल्याचा भास होत राहतो.

रेला ही स्वतंत्र तबला वादनातील सर्वाधिक लोकप्रिय रचना आहे. पेशकाराची संथ गती तथा लयकारी समजणे, श्रोत्यांसाठी कठीण जाते. एकाच प्रकाराने कायद्याच्या शब्दबंधांचा होणारा विस्तार श्रोत्यांना कंटाळवाणा होण्याची शक्यता असते. परंतु, रेल्याची गतिमानता आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अखंड गुंजनामुळे श्रोते या तबला वादनाकडे आकर्षित होतात. चलन-रौ च्या वादनावेळी अधिकतमय श्रोते त्या चलनाच्या मधुर नादावर डोलू लागतात. तबला वादनाच्या तयारीला, त्याच्या कौशल्याला आव्हान देणाऱ्या आणि श्रोत्यांना आकर्षित करणाऱ्या या अद्भुत रचनेचं तबला वादनात एक खास स्थान आहे, हे निश्चित.

Recent Posts

See All

'बायाँ' च्या वादनात संतुलन राखण्यासाठी रियाजाची पद्धत

तबला हे वाद्य दायाँ (तबला) आणि बायाँ (डग्गा) या दोन वाद्यांचा मेळ साधून निर्माण झालेले वाद्य आहे. तबल्यातून (दायाँ) निघालेले 'तार-स्वर'...

पढंतची आवश्यकता -

स्वतंत्र तबलावादनाच्या सादरीकरणामध्ये 'पढंत'चे स्थान महत्वपूर्ण आहे. या सादरीकरणामध्ये प्रथम वाचेद्वारे वाचून नंतर त्याचं सादरीकरण (पेश...

रियाजाची उद्दिष्टे -

१) तंत्र विकसित करणे (बोटांच्या स्वतंत्र व संयुक्त हालचाली सहज करता येणे, डग्ग्यावरील विविध क्रिया समजून घेणे, हात व बोटांच्या...

Comments


bottom of page