top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

पाश्चात्त्य संगीतातील वाद्यांची थोडक्यात माहिती


पाश्चात्त्य अवनद्ध वाद्यांचा विकास कसा झाला याचे अध्ययन केल्यानंतर असे लक्षात येते, की या वाद्यांच्या निर्मितीमध्ये सुरुवातीला दगड, हाडे, लाकूड, चामडे इ.चा प्रयोग केला गेला. इजिप्त, फ्रान्स इ. देशातील, प्राचीन संस्कृतीत प्राप्त झालेल्या चित्रकला व शिलालेखांवरून हे सिद्ध होते की 'ड्रम' हे प्राचीन अवनद्ध वाद्य आहे. सुरुवातीला पाण्यात राहणाऱ्या जीव-जंतूंच्या चामडीने ही वाद्ये मढविली जात असत. एखाद्या हत्याराने लाकडाला आतून पोकळ केले जाऊन त्यावर चामडे मढवले जात असे. मातीची भांडी तयार करण्याची कला अवगत झाल्यानंतर त्या भांड्यांचा उपयोग वाद्यांसाठी केला गेला. अशा प्रकारे 'ड्रम्स'चा उपयोग, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संकेत पाठवण्यासाठी केला जात असे. रात्रीच्या वेळी या 'ड्रम्स'चा आवाज फार दूर पर्यंत पोहचत असे. 'सुदान' येथील संग्रहालयात सर्वात मोठा ढोल दिसून आला. याचा आकार सुमारे ९ फूट लांब व ३ फूट उंच आहे. सुरुवातीला या अवनद्ध वाद्यांचे चामडे ताणून ठेवण्यासाठी खुंट्यांचाच प्रयोग केला गेला. या मध्ये विकास होत ही वाद्ये पुढे आकाराने लहान होत गेली व चामडे ताणून धरण्यासाठी स्क्रू चा वापर होत गेला.


पाश्चात्त्य अवनद्ध वाद्यांचेसुद्धा दोन भागात वर्गीकरण केले आहे. हे वर्गीकरण तारता (Pitch) च्या दृष्टिकोनातून केले गेले आहे.


१) निश्चित तारता वाद्य - (Definite pitch)

यात रिम्पनी, झायलोफोन, कैटील ( कौट्रील ) ड्रम, सेलेररा, ग्लॉकनस्पिएल, चिमेस इ. वाद्यांचा समावेश होतो.


२) अनिश्चित तारता वाद्य - (Indefinite pitch)

यात साईड ड्रम, स्नेअर ड्रम, सिम्बल बेस ड्रम इ. वाद्यांचा समावेश होतो.


पाश्चात्त्य अवनद्ध वाद्ये : - बेस ड्रम, साईड ड्रम, स्नेअर ड्रम, कैटील ड्रम इ.


पाश्चत्त्य घन वाद्ये : - टेम्बोराईन, मोठ्ठी झांज ( सिम्बल्स ), ट्रँगल, खुळखुळे इ.



पाश्चात्त्य संगीतातील वाद्ये –


१) बेस ड्रम - हे वाद्य आपल्याकडील मोठ्या आकाराच्या ढोलाप्रमाणे असते. याचे भांडे धातुचे असून अरुंद आणि ढोलापेक्षा जास्त व्यासाचे असते. लोखंडी कडी व नट-बोल्टच्या सहाय्याने भांड्याच्या दोन्ही तोंडावर दोन गोलाकार चामडी घट्ट ताणून बसवितात. चावी फिरवून या चामड्यांवरील ताण कमी-जास्त केला जातो. छोट्या लाकडी दांडीच्या टोकाला कापडी किंवा रबरी चेंडू बसवून, त्याचा उपयोग बेस ड्रम वाजविण्यासाठी केला जातो. कधी कधी दोन हातात अशा दोन दांड्या घेऊन त्यांच्या सहाय्याने बेस ड्रमच्या दोन्ही चामडी पृष्ठभागावर लागोपाठ जोरकस आघात करतात. एक-एक, दोन-दोन लयबद्ध ठोके वाजवून बेस ड्रम चे वादन केले जाते.


२) साइड ड्रम ( स्नेअर ड्रम ) - याची रचना बेस ड्रम प्रमाणेच असते. परंतु हे वाद्य आकाराने बरेच लहान आणि अरुंद असते. धातूची कडी आणि नट-बोल्टच्या सहाय्याने, भांड्याच्या दोन्ही तोंडावर दोन गोलाकार चामडी, ताण देऊन घट्ट बसवितात. एका चामडी गोलाकार पृष्ठभागावर त्याच्या मध्यातून जाणाऱ्या दोन किंवा चार चामडी दोऱ्या पृष्ठभागास चिकटून व ताण देऊन बांधल्या जातात. या चामडी पृष्ठभागावर आघात होताच थरथरत निघणारा एक निराळा आवाज निर्माण होतो. साईड ड्रम वाजविण्यासाठी निमुळत्या व एका टोकाशी लाकडी गोटी असलेल्या दोन लाकडी दांड्यांचा उपयोग केला जातो. लाकडी गोटीचा चामडी पृष्ठभागावर आघात होताच थरथरणाऱ्या नादाची निर्मिती होते. तारेच्या ब्रश चा उपयोग करून किंवा साध्या दांड्याच्या सहाय्यानेही साईड ड्रम वाजविले जाते. साईड ड्रमच्या जोडीला, एका बाजूला चामडे मढवलेले आणि छोट्या डग्ग्याच्या आकाराचे (डुग्गी) दुसरे लहान ड्रमही असतात. हाताने किंवा लाकडी चेंडू बसविलेल्या छोट्या दांड्याने या वाद्याचे वादन केले जाते.



३) कैटील ड्रम - हे वाद्य भारतीय 'नगारा' या वाद्यासारखे दिसते. धातूंच्या दोन वेगवेगळ्या ड्रम्स पासून हे वाद्य तयार केले जाते. याचे मुख चामड्याने मढवलेले असते. हे वाद्य स्टॅन्ड वर ठेऊन, टोकाला गादी लावलेल्या दोन छड्यांनी (काठ्यांनी) वाजविले जाते. याची पुडी चारही बाजूनी, स्क्रू सारख्या चावीने ताणलेली असते. परदेशात ऑर्केस्ट्रा मध्ये रॉक, पॉप व जॅझ संगीतात याचा उपयोग केला जातो.


४) मोठी झांज - साधारणतः मोठ्या ताटाच्या आकाराची आणि पितळी धातूची झांज, मध्यभागातील छिद्रांमध्ये स्क्रू च्या सहाय्याने एका स्टँडवर बसविली जाते. काठीच्या सहाय्याने झांजेच्या पृष्ठभागावर आघात करून ठोके वाजविले जातात.


५) ट्रँगल - त्रिकोणी आकारात दोन टोके सुटी ठेवून लोखंडी भरीव सळई पासून हे वाद्य बनविले जाते. एखाद्या चिमट्याच्या सहाय्याने, एका हातात हे वाद्य धरून दुसऱ्या हाताने छोट्या लोखंडी दांडीने आघात करून हे वाद्य वाजविले जाते. वाद्य-वृंदात लय बद्ध ठोके वाजविण्याची क्रिया या वाद्याच्या सहाय्याने केली जाते.


६) खुळखुळे (मरॅकस आणि कब्बास) - नारळाच्या आकाराचे, आतून पोकळ असलेले व लाकडी दांडी असलेले हे एक छोटे लाकडी वाद्य आहे. याच्या पोकळ भागात धातुच्या गोळ्या किंवा मणी असतात. लाकडी दांडीच्या सहाय्याने, हातांनी लयबद्ध हालचाल करून हे वाद्य वाजवितात. अशाच लाकडी वाद्याच्या पृष्ठभागावर, तारेमध्ये मण्यांची गुंफण करून, 'कब्बास' हे वाद्य तयार करतात. लाकडी दांडीच्या सहाय्याने हे वाद्य गोलाकार फिरवताच, वाद्यावरील पृष्ठभागावर मण्यांचे घर्षण होऊन त्यामधून एक निराळी लयबद्ध नाद निर्मिती होते.


७) टेम्बोराईन - भारतीय डफ किंवा खंजिरीसारखे हे पाश्चात्त्य घन वाद्य आहे. हे वाद्य चामड्याने मढवलेले असते. डाव्या हातात पकडून हे वाद्य उजव्या हाताने व बोटांनी वाजविले जाते. त्याच्या गोल पात्तळ लाकडी भागावर (पट्टीवर) गोल चिपळ्या बसविलेल्या असतात. हे वाद्य वाजविताना दोन वाद्ये वाजविल्याचा भास होतो. इराण देशात या वाद्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, तर रशियामध्ये लोकगीत व नृत्याच्या साथीसाठी हे वाद्य वाजविले जाते.


अशा प्रकारे पाश्चात्त्य वाद्यांचा उपयोग, बँड म्युझिक, ऑर्केस्ट्रा, रॉक, पॉप व जॅझ संगीतात मोठ्या प्रमाणावर केला जातो.

Recent Posts

See All

पखवाजावर वाजविले जाणारे वर्ण आणि त्यांची निकास पद्धती -

पखवाज हे वाद्य केव्हा, कोणी, कसे निर्माण केले, याबाबत ठोसपणे माहिती कोणत्याही ग्रंथात आढळून येत नसली तरी या अवनद्ध वाद्याची उत्पत्ती...

पखवाज/पखावज -

भगवान शंकराजवळील डमरू हे सर्वात प्राचीन वाद्य आहे. या आधारावर पखवाजाची उत्पत्ती झाली. पखवाज या वाद्याच्या प्राचीनतेचा पुरावा ऋग्वेदात...

Comments


bottom of page