top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

पढंतची आवश्यकता -


स्वतंत्र तबलावादनाच्या सादरीकरणामध्ये 'पढंत'चे स्थान महत्वपूर्ण आहे. या सादरीकरणामध्ये प्रथम वाचेद्वारे वाचून नंतर त्याचं सादरीकरण (पेश करणे) करण्याचा प्रघात आहे. प्रेक्षकांना असं प्रस्तुतीकरण आवडतं, भावतं. 'पढंत' हे तबला-वादनाच्या कलेचं असं एक सौंदर्यलक्षण आहे, जे कथक-नृत्य वा आजकालच्या फ्यूजन-संगीतातही प्रकर्षाने जाणवतं. यासाठी तबला वादनाच्या विद्यार्थ्यांनी 'पढंत'चा अर्थ आणि त्याचे तबला वादनातील महत्व समजून घेणे अतिशय आवश्यक आहे.


'पढंत'ची परिभाषा :-

"जी बंदिश, ज्या लयीत, ज्या ताकदीने आणि सुंदरतेने पेश केली जाते, त्यापूर्वी त्यामधील सर्व बारकाव्यानिशी हाताने टाळी किंवा लयीबरोबर त्यास पूरक अशी देहबोली आणि स्पष्ट वाणीसह पेश करणे म्हणजे 'पढंत'!"


या परिभाषेत 'पढंत'च्या आकलनाचे जे विविध प्रकार आहेत ते असे -


१) 'पढंत' ही एक वाचिक क्रिया आहे, त्यामुळे त्यासाठी वाणी शुद्ध असणे अत्यंत गरजेचे आहे.

२) 'पढंत' ही नेहेमीच लय-ताल देऊन केली जाते त्यामुळे 'पढंत'साठी लयीचं संतुलन असणं आवश्यक आहे.

३) ज्या बोलांची 'पढंत' करायची आहे, त्या बंदिशीच्या बोलांचा नाद, त्याची भाषा, बंदिशी-कर्त्यांचा त्या मागील विचार, या सर्व गोष्टींचं ज्ञान, कलाकारासाठी आवश्यक आहे.

४) 'पढंत' करताना आपले हात, मान आणि डोके यांच्या उचित आविष्काराने ते सादरीकरण प्रभावी होते.


गायन शब्दाप्रमाणे तबल्याच्या भाषेतील (बोलांचा) अर्थ स्पष्ट होत नाही. तबल्याच्या बंदिशीमधील अर्थ हा केवळ सांगीतिक अर्थ असतो. असा हा सांगीतिक अर्थ श्रोत्यांपर्यंत पोहचविण्याचं महत्वपूर्ण कार्य 'पढंत' केल्याने साध्य होतं. मनोवैज्ञानिकांच्या मते मौखिक (वाचिक) भाषेला उचित देहबोलीने दिलेल्या साथीतून व्यक्त होणारे भाव, अतिशय उत्कृष्ट परिणाम साधतात. उस्ताद थिरकवा, उस्ताद अफाक हुसैन, पंडित सुरेश तळवलकर, पंडित योगेश समसी अशा नामवंत तबला वादकांचे तबला वादन लोकप्रिय होण्याचे कारण त्यांचा रियाज आणि विचारांची केलेली कलात्मक 'पढंत', हे होय.


'पढंत'चा अर्थ आणि तबलावादनावर असलेले त्याचे महत्वपूर्ण स्थान या गोष्टी समजून घेतल्यानंतर, विद्यार्थ्यांना 'पढंत'चे होणारे विविध फायदे याबद्दल चर्चा करूया -


१) गुरूंकडून शिकलेल्या रचना ताल-बद्ध लयीत वाजविणे हे विद्यार्थ्याचे प्रथम कर्त्यव्य आहे. हातावर ताल देत ती रचना म्हणताना त्या बंदिशीचे प्रत्येक अक्षर, तालाच्या कुठल्या मात्रेवर वा पोटमात्रेवर येते, त्याचे अचूक ज्ञान विद्यार्थ्याला होते, ज्यामुळे विद्यर्थ्याचा आत्मविश्वास दुणावतो.

२) बंदिशीचे हे बारकावे लक्षात आल्यामुळे, ती बंदिश लिपिबद्ध करणे विद्यर्थ्यासाठी सुलभ होते.

३) बंदिशीची सातत्याने 'पढंत' केल्यामुळे विद्यार्थ्याची स्मरणशक्ती वाढते.

४) बंदिशीची 'पढंत' करताना विद्यार्थ्याला जिभेवरची, जणू, कसरत करावी लागते. त्यामुळे त्याची वाणी शुद्ध होते.

५) 'पढंत' करतेवेळी ती बंदिश तोंडपाठ करताना, कंठस्थ करताना त्या बंदिशीचे सर्व बारकाव्यांसह विद्यार्थ्याच्या मेंदूवर संस्कार होतात आणि तबला वादनात हे सर्व संस्कार सर्व तपशिलांसह विद्यार्थ्याच्या हातात उतरतात. म्हणून तर म्हणतात की 'जिसकी जबान साफ उसका हाथ साफ'. (ज्याची वाणी स्वच्छ त्याचा हात स्वच्छ).


वरील विवेचनावरुन तबला वादनात 'पढंत'ची आवश्यकता आणि त्याचे महत्व काय आहे हे स्पष्ट होते.

Recent Posts

See All

'बायाँ' च्या वादनात संतुलन राखण्यासाठी रियाजाची पद्धत

तबला हे वाद्य दायाँ (तबला) आणि बायाँ (डग्गा) या दोन वाद्यांचा मेळ साधून निर्माण झालेले वाद्य आहे. तबल्यातून (दायाँ) निघालेले 'तार-स्वर'...

पेशकार, कायदा तसेच रेला यांचे एकल तबला वादनातील स्थान आणि महत्व

तबला हे तालवाद्य, सर्व तालवाद्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असण्याचे कारण म्हणजे, तबला हे तालवाद्य सर्वाधिक विकसित व उपयोगी आहे. या...

रियाजाची उद्दिष्टे -

१) तंत्र विकसित करणे (बोटांच्या स्वतंत्र व संयुक्त हालचाली सहज करता येणे, डग्ग्यावरील विविध क्रिया समजून घेणे, हात व बोटांच्या...

Comments


bottom of page