top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

मार्गी ताल व देशी ताल


इ.स. सुमारे ४०० च्या आसपास लिहिल्या गेलेल्या भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातील विवेचनावरून असे दिसून येते की, त्या काळी सर्व भारतवर्षात एकच संगीत पद्धती प्रचलित होती. ही पद्धती साधारणपणे 'संगीतरत्नाकरा'च्या (इ.स. १२१० ते १२४७) काळापर्यंत अस्तित्वात असावी. देवगिरीच्या सिंघण राजाच्या अमात्य पुत्राने, शारंग देवाने हा 'संगीतरत्नाकर' ग्रंथ लिहिला.


ताल - संगीत शास्त्रामध्ये तालाचे स्थान अतिशय उच्च दर्जाचे व महत्वपूर्ण आहे. 'संगीतरत्नाकरा'च्या पाचव्या अध्यायात शारंग देवाने 'ताल' या शब्दाचे निरूपण केले आहे, ते खालीलप्रमाणे-


तालस्तलप्रतिष्ठायामिती धतोर्घजी स्मृतः ।

गीतं वाद्यं तथा नृतं यतस्ताले प्रतिष्ठितम ।।


स्थिरपणाने स्थापित असणे या अर्थाच्या 'तल' या धातुला 'अ' हा प्रत्यय लागून 'ताल' हे शब्दरूप तयार झाले आहे. कारण गायन, वादन व नृत्य हे तालामध्ये स्थिरपणाने स्थापित असतात.

तालाचे दोन प्रकार सांगितले गेले आहेत. 'मार्गी ताल' आणि 'देशी ताल'.

पहिल्याची क्रिया निःशब्द तर दुसऱ्याची सशब्द म्हणजेच शब्दयुक्त असते.

निःशब्द क्रियेला 'कला'ही म्हंटले जाते.


मार्ग :- याचा अर्थ 'पथ' असा होतो. मार्ग म्हणजे वाट, रस्ता. तालरचनेचा शेवट गाठण्यासाठी अत्यावश्यक अशा वैशिष्ट्यांमधून जाणारी वाट. मात्रेच्या कालाचे प्रमाण, तालरचनेतील खंड, उपविभाग, विशिष्ट मात्रांवरील नियोजित अक्षरांचा जोरकसपणा किंवा बिन-जोरकसपणा या गोष्टींचे प्रमाण म्हणजे 'मार्ग'.

प्राचीनकाळी भरतमुनी व शारंग देवांनी चार मार्ग सांगितले आहेत.


त्यांचे मात्रांच्या संदर्भातील मूल्यांकन खालीलप्रमाणे ;


१} चित्रा :- १० लघु अक्षरांच्या उच्चारणांमुळे निर्माण झालेली कालाची गती. द्रुत गती.


२} वर्तिकी :- २० लघु अक्षरांच्या उच्चारणांमुळे निर्माण झालेली कालाची गती. मध्य गती.


३} ध्रुवी :- ३० लघु अक्षरांच्या उच्चारणांमुळे निर्माण झालेली कालाची गती. विलंबित गती.


४} दक्षिणी :- ४० लघु अक्षरांच्या उच्चारणांमुळे निर्माण झालेली कालाची गती. अतिविलंबित गती.


सध्या या चार मार्गांचा प्रचार कमी प्रमाणात होतो. तबल्याचे जे ताल आहेत, त्या तालात या मार्गांना आता विशेष स्थान राहिलेले नाही. जेव्हा धृपद गायकी होती तेव्हा या चार मार्गांची चांगली उपयोगिता होती.


क्रिया :- हातानी ताल मोजताना बोटाच्या व तळव्याच्या ज्या विशिष्ट हालचाली होतात त्याला 'क्रिया' असे म्हणतात. हाताच्या टाळीने ताल मोजला जातो. त्या मोजण्याच्या क्रियेला 'क्रिया' असे म्हणतात. तालाची आनंदजनक शक्ती क्रियेमध्ये असते. दोन्ही हातानी टाळी वाजवून शब्द निर्माण करणे, बोटांच्या साहाय्याने मात्रा मोजणे म्हणजे 'क्रिया'.


क्रियेचे दोन प्रकार आहेत. तालात जेव्हा आपण टाळी वाजवितो तेव्हा त्या क्रियेस 'सशब्द' क्रिया म्हणतात. तर टाळी ऐवजी हात बाजूला करुन काल दाखविला जातो तेव्हा त्यास 'निःशब्द' क्रिया असे म्हणतात.


१) सशब्द क्रियेचे चार प्रकार आहेत.


अ} धुवा / ध्रुवा :- चुटकी वाजवत उजवा हात खाली आणणे.


ब} शंपा / शंम्या :- उजव्या हाताने डाव्या हातावर टाळी वाजविणे. / आघात करणे.


क} ताल / तल :- डाव्या हातावर उजव्या हाताने टाळी वाजविणे. / आघात करणे.


ड} सन्निपात :- दोन्ही हातांनी एकमेकांवर टाळी वाजविणे. / आघात करणे.



२) निःशब्द क्रियेचे चार प्रकार आहेत.


अ} अमाप / अवाप :- हात वर उचलून बोटांनी बंद करणे अथवा वर उचलल्या जाणाऱ्या उजव्या हाताची क्रिया.


ब} निष्काम / निष्क्राम :- बोटांना उचलणे. अथवा खाली ठेवलेल्या डाव्या हाताची बोटे फैलावण्याची क्रिया.


क} विक्षेप / विक्षेपक :- उजवीकडे बोटांना हलविणे अथवा वर उचलल्या जाणाऱ्या हातास स्वतःच्या उजव्या पाठीकडे ठेवण्याची क्रिया.


ड} प्रवेश / प्रवेशक :- हाताला खाली आणून डावीकडे हलविणे. खाली ठेवलेल्या डाव्या हाताची बोटे जुळवून वरच्या हाताच्या हातावर त्यावर होणाऱ्या प्रवेशाची वाट पाहाण्याची क्रिया.



३) देशी निःशब्द क्रियेचे सात प्रकार आहेत.


अ} सर्पिणी :- हात उजव्या बाजूला नेणे.


आ} कृष्य :- हात डाव्या बाजूला नेणे.


इ} पद्मिनी :- हात वरून खाली नेणे.


ई} विसर्जित :- हात बाहेर नेणे.


उ} विक्षिप्त :- बोटे बंद करणे.


ऊ} पताक :- हात वर उचलणे.


ए} पतित :- जो हात वर आहे तो खाली आणणे.

Recent Posts

See All

ठेका आणि ठेक्याचे गुणधर्म

ठेका - ताल म्हणजे कालाची आकड्यात मोजणी. जेव्हा मोजणीचे आकड्यातून / अंकातून विशिष्ट बोलांमध्ये रूपांतर होते, तेव्हा तो 'ठेका' होतो. तालाला...

ताल

ताल - संगीत शास्त्रामध्ये तालाचे स्थान अतिशय उच्च दर्जाचे व महत्वपूर्ण असे आहे. स्थिरपणाने स्थापित असणे या अर्थाच्या 'तल' या धातुला 'अ'...

ताल निर्मितीचे मूळ व विकास

इ.स. सुमारे ४०० च्या आसपास लिहिल्या गेलेल्या 'भरतमुनींच्या' 'नाट्यशास्त्रातील' विवेचनावरून असे दिसून येते की, त्या काळी सर्व भारत वर्षात...

Comments


bottom of page