top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

लय आणि लयकारी यातील परस्पर संबंध व व्याख्या


निसर्गात सर्वत्र एक प्रकारचे चैतन्य असलेले जाणवते. झरे, ओढे, नद्या, समुद्राच्या लाटा यामधील प्रवाह-गती आणि नाद, हरणे किंवा हत्ती कळपाने मार्गक्रमण करीत असताना किंवा पक्षी थव्याने जात असताना त्यांची होणारी हालचाल, यातून आपल्याला चैतन्याची अनुभूती येते. येवढेच नव्हे तर आपल्याला, शरीरातील गती, नाडीचे नियमित ठोके, यामधील असलेले एक प्रकारचे अनुशासन, असलेली शिस्त याचीही प्रचिती येते. सृष्टीचा कालप्रवाह हा अखंडपणे पुढे जातच असतो. मात्र कालगतीची जाणीव, ज्ञान आपल्याला, दिवस-रात्रीच्या या नियमित चक्रगतीने होते. कुठल्याही क्रियेची अशी ठराविक, शिस्तबद्ध गतीची, आपल्याला जी अनुभुती होते, त्या अनुभवालाच 'लय' असे म्हणतात.

संगीत कलेची दोन आधारतत्व आहेत, ती म्हणजे- १) नादतत्व आणि २) लयतत्व. कुठल्याही संगीत-प्रकारात भिन्न-भिन्न नादामध्ये किंवा नादा-कृतीमध्ये जी ठराविक, नियमित गती असते तिलाच 'लय' असे म्हणतात.


लयीची परिभाषा -

१) दोन क्रियांमध्ये असलेल्या समान कालांतराला 'लय' असे म्हणतात.

२) समांतर चलन-कालास 'लय' असे म्हणतात.

३) आघातातून निर्माण होणाऱ्या समबद्ध गतीला 'लय' असे म्हणतात.

४) समान कालांतराच्या अखंड शृंखलेतून मिळणाऱ्या अनुभूतीला 'लय' असे म्हणतात.


विभिन्न संगीत प्रकाराच्या अभ्यासातून असं लक्षात येतं की, एक हिंदुस्थानी संगीत सोडलं तर जवळजवळ सगळ्याच संगीत प्रकारांचं सादरीकरण हे एकाच लयीत होत असत. भारतात 'धृपद' आणि 'कर्नाटक' संगीत हे एकाच लयीत गायलं किंवा वाजविलं जात. या दोन्ही संगीत प्रकारच्या रचनांचं सादरीकरण, सुरवातीपासून शेवटपर्यंत एकाच लयीत केलं जात. परंतु, 'ख्याल' संगीताच्या बंदिशीची सुरुवात संथ गतीत होते आणि त्याची लय हळूहळू वाढत जाते. यामुळे हिंदुस्थानी संगीतात लयीचे विविध प्रकार आहेत, त्यातील तीन मुख्य प्रकार खालील प्रमाणे -


१) विलंबित लय - या लयीची गती अतिशय संथ (धीमी) असते. दोन मात्रांमधील असणारा काळ (अंतर) खूप मोठा असतो. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत-रचनांचा आरंभ विलंबित लयीतच होतो. दीर्घ मात्रा-कालामुळे तालाचे आवर्तनही दीर्घ होते. यामुळे कलाकाराला स्वर-शब्द आणि बंदिश, श्रोत्यांपुढे अधिक स्पष्ट रूपात मांडण्यासाठी आणि ती खुलवण्यासाठी पुरेपूर वेळ मिळतो. यासाठीच कलाकाराच्या सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या आणि प्रयोगशीलतेला न्याय देणाऱ्या, विस्तारक्षम रचना या विलंबित लयीत सादर केल्या जातात. शास्त्रीय गायनातील बडा-ख्याल, वादनातील मसीदखानी गत, तबल्यातील पेशकार त्याचप्रमाणे कत्थक नृत्यातील ठाठ, हे सर्व विलंबित लयीत पेश केले जातात.


२) मध्य लय - या गतीची लय मध्यम असते. जाणकार विद्वानांच्या मते, मात्राकाल हा एक सेकंद किंवा त्याच्या आसपास असेल, तेव्हा ती लय 'मध्य लय' असते. अर्थात या विषयात अनेक मतभेद आहेत. परंतु, मध्य लय ही एक नैसर्गिक आणि स्वाभाविक लय आहे हे वादातीत आहे. ही लय मध्यम गतीची असल्यामुळे, या लयीतील रचना समजायला सुलभ असतात. कलाकाराची तयारी, लायदारी आणि लयकारी तसेच त्याची सृजनशीलता आणि प्रयोगशीलता, पेश करण्यासाठी त्याला पुरेपूर वाव मिळतो. अर्थात या मध्ये कलाकाराची मात्र, या लयीत कला सादरीकरण्यात, एक कठीण कसोटी असते. शास्त्रीय गायनातील छोटा ख्याल, वादनातील रजाखानी गत, तसेच तबल्यातील कायदा, हे सर्व मध्य लयीत पेश केले जातात.


३) द्रुत लय - या लयीची गती शीघ्र (द्रुत) असते, म्हणूनच याला 'द्रुत लय' असे म्हणतात. दोन मात्रांमध्ये असलेले अंतर अतिशय कमी असते. गायनात गळ्याची, वादनात हातांची आणि नृत्यात पायांची किती जोरदार तयारी आहे, हाच ह्या लयीचा उद्देश आहे. या लयीचं सादरीकरण म्हणजे, असा एक नवलपूर्ण चमत्कार असतो की, ज्यामुळे रसिक प्रेक्षक, श्रोते हे थक्क होतात, आश्चर्यचकित होतात. गायनातील तानक्रिया आणि तराणा यासारख्या रचना, वाद्यवादनातील झाला, तबला-वादनातील रौ तसेच रेला आणि कत्थक नृत्यातील तत्कार, आपल्याला 'द्रुत' लयीचा साक्षात्कार घडवितात.


लयीच्या वरील तीन प्रकारांबरोबरच अति विलंबित लय आणि अति द्रुत लय हेही दोन प्रकार आहेत, ज्यांच्या नावावरूनच त्यांचा अर्थ लक्षात येतो.


लयकारी

'लय-संकल्पना' समजल्यावर आपल्या लक्षात येतं की, मात्रांमध्ये असलेल्या समान अंतरातूनच लय-निर्मिती होते. समान अंतर असणाऱ्या या उपजत गुणामुळे संगीत रचनेला एक प्रकारचे स्थैर्य, स्थिरता येते. निसर्गाचा नियम असा आहे की, कोणतीही वस्तू किंवा क्रिया जेव्हा एका जागी स्थिर होते. तेव्हा ती कंटाळवाणी होते, जणू काही निर्जीव होते. स्थिर लय संगीतासाठी आधारभूत असते हे निश्चित, पण ह्या स्थिरतेमुळे संगीत रचना कंटाळवाणीही होऊ शकते. असं होऊ नये यासाठी जाणता कलाकार या स्थिर लयीत आपल्या कारागिरीने चैतन्य निर्माण करतो. स्थिर लयीत केलेल्या या कलाकुसरीलाच 'लयकारी' असे म्हणतात. 'कार' या शब्दाचा अर्थ 'करणे' असा होतो, म्हणून 'लयकारी'चा अर्थ होतो, 'लयीसह काम करणे'. अर्थात, मूळ लय-स्वरूप कायम ठवून, तिला धक्का न लावता, ही कामगिरी, हे नक्षीकाम केले जाते.


लयकारीचा व्याख्या -

जेव्हा मूळ लयीच्या संबंधात किंवा संदर्भात दुसऱ्या लयीची निर्मिती होऊन या लयींमधील गुणोत्तर प्रमाण निश्चित होते, तेव्हा या प्रमाणबद्ध प्रस्तुतीला किंवा सादरीकरणाला 'लयकारी' असे म्हणतात.


लयकारीचे प्रकार -

अ] सरळ लयकारी :- जेव्हा तालाच्या एका मात्रेमध्ये दोन, तीन, चार अशी पूर्ण संख्या घेऊन लयकारी केली जाते, तेव्हा त्याला 'सरळ लयकारी' असे म्हणतात. त्याचे प्रकार खालीलप्रमाणे -


१} दुगून (दुप्पट) : एका मात्रेत दोन मात्रा घेऊन केलेली लयकारी.

२} तिगून (तिप्पट) : एका मात्रेत तीन मात्रा घेऊन केलेली लयकारी.

३} चौगुन (चौपट) : एका मात्रेत चार मात्रा घेऊन केलेली लयकारी.


बी] वक्र लयकारी :- जेव्हा तालाच्या एका मात्रेत १/३, २/३, ३/४ अश्या अपूर्ण मात्रांद्वारे लयकारी केली जाते, तेव्हा त्याला 'वक्र लयकारी' असे म्हणतात. त्या लयीची काही उदाहरणे खालीलप्रमाणे -


१} सवागुन (सव्वापट) : जेव्हा एका मात्रेमध्ये सव्वा मात्रा किंवा चार मात्रांत पाच मात्रांद्वारे लयकारी केली जाते, तेव्हा त्याला 'सवागुन लयकारी' असे म्हणतात. अशी लयकारी 'कुआड लय' या नावाने ओळखली जाते.

२} डेढगुन (दीडपट) : जेव्हा एका मात्रेमध्ये दीड मात्रा वा दोन मात्रांमध्ये तीन मात्रा घेऊन लयकारी केली जाते, तेव्हा त्याला 'डेढगुन लयकारी' असे म्हणतात. ही लयकारी 'आड लय' म्हणून ओळखली जाते.

३} पौने दो गुन (पावणे दोन पट) : जेव्हा एका मात्रेमध्ये सव्वा मात्रा किंवा चार मात्रांत सात मात्रांद्वारे लयकारी केली जाते, तेव्हा त्याला पौने दो गुन (पावणे दोन पट) असे म्हणतात. या लयकारीला 'बिआड लय' असे संबोधिले जाते.


अशा प्रकारे नवम गुण (नऊ पट), एकादश गुण (अकरा पट) इत्यादी लयकारी, संगीत प्रयोगात सादर केल्या जातात.

Recent Posts

See All

लय आणि लयकारी - ३

लय आणि लयीचे प्रकार - स्वर आणि लय यांचा उपयोग करून सादर केल्या जाणाऱ्या कलेस 'संगीत' असे म्हणतात. अर्थात संगीतात लयीला अनन्यसाधारण महत्व...

लय आणि लयकारी - २

'लघु-काल-भाव' थोडक्यात - मात्रेचा सर्वात लहान भाग म्हणजे लघु. मात्रा म्हणजे ताल मोजण्याचे परिमाण होय. पण तालातील प्रत्येक मात्रा ही...

लय आणि लयकारी - १

प्रस्तावना- संगीतामध्ये लय व लयकारी या दोन बाबी अतिशय महत्वाच्या आहेत. लय म्हणजे संगीताच्या पंचप्राणांपैकी एक होय. केवळ संगीतातच नव्हे तर...

Comments


bottom of page