top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

लय आणि लयकारी - ३


लय आणि लयीचे प्रकार -


स्वर आणि लय यांचा उपयोग करून सादर केल्या जाणाऱ्या कलेस 'संगीत' असे म्हणतात. अर्थात संगीतात लयीला अनन्यसाधारण महत्व आहे. दैनंदिन जीवनात दृष्टीस पडणाऱ्या अनेक क्रियांमधून - उदा. चालणे, उड्या मारणे, झाडांच्या पानांची सळसळ, चेंडूचे टप्पे, आकाशातील ढगांचा संचार इ.- आपल्याला गतीची जाणीव होते. या क्रियांपैकी काहींमध्ये एक प्रकारचे सातत्य दिसून येते. घडाळ्याची टिकटिक, हृदयाचे ठोके, सूर्योदय-सूर्यास्त, शिस्तबद्ध कवायती इ. क्रियांमधून आपल्याला गतीच्या नियमित अशा पुनरावृत्तीची जाणीव होते. गतीच्या या नियमित पुनरावृत्तीस संगीतात 'लय' असे म्हणतात. लय निर्माण होण्यासाठी सुरवातीस दोन आघातांची गरज असते. या आघातांमधील अंतर जेव्हा एक सामान असते तेव्हा त्या गतीस 'लय' असे म्हणतात. व आघातांना 'मात्रा' असे म्हणतात.


लयीचे प्रकार.


लयीतील आघातांमध्ये किंवा मात्रांमध्ये जे अंतर असते त्यावरून लयीचा प्रकार ठरतो. लयीचे मुख्य प्रकार व त्याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे :


लयीचे मुख्य तीन प्रकार आहेत;


१) विलंबित लय

२) मध्य लय

३) द्रुत लय


१} विलंबित लय :- जेव्हा एखाद्या लयीमध्ये दोन मात्रांमधील अंतर खूप जास्त असते तेव्हा त्या लयीस 'विलंबित लय' असे म्हणतात. विलंबित लयीची गती फारच कमी असते. स्वतंत्र तबला वादनातील पेशकार, शास्त्रीय संगीतातील बडा ख्याल आणि वाद्य संगीतातील मसितखानी गत हे प्रकार विलंबित लयीत सादर केले जातात.


२} मध्य लय :- जेव्हा एखाद्या लयीमध्ये दोन मात्रांमधील अंतर मध्यम किंवा साधारणपणे एका सेकंदाला एक मात्रा असे असते तेव्हा त्या लयीस 'मध्य लय' असे म्हणतात. मध्य लयीची गती मध्यम असते. स्वतंत्र तबला वादनातील कायदा, शास्त्रीय संगीतातील छोटा ख्याल आणि वाद्य संगीतातील रजाखानी गत हे प्रकार मध्य लयीत सादर केले जातात.


३} द्रुत लय :- जेव्हा एखाद्या लयीमध्ये दोन मात्रांमधील अंतर खूप कमी असते तेव्हा त्या लयीस 'द्रुत लय' असे म्हणतात. द्रुत लयीची गती खूपच जास्त असते. तबलावादनातील रेला, लग्गी, शास्त्रीय गायनातील तराणा आणि वाद्य संगीतातील 'झाला' हे सर्व प्रकार द्रुत लयीत सादर केले जातात.


संगीतातील लय दाखवण्यासाठी जी वाद्य वापरली जातात त्यांना 'लय वाद्ये' म्हणतात. तबला, पखवाज, ढोलक, ढोलकी, नगारा, टाळ, चिपळ्या इ. अनेक तालवाद्ये संगीताच्या विविध प्रकारांमध्ये वाजविली जातात.

Recent Posts

See All

लय आणि लयकारी - २

'लघु-काल-भाव' थोडक्यात - मात्रेचा सर्वात लहान भाग म्हणजे लघु. मात्रा म्हणजे ताल मोजण्याचे परिमाण होय. पण तालातील प्रत्येक मात्रा ही...

लय आणि लयकारी - १

प्रस्तावना- संगीतामध्ये लय व लयकारी या दोन बाबी अतिशय महत्वाच्या आहेत. लय म्हणजे संगीताच्या पंचप्राणांपैकी एक होय. केवळ संगीतातच नव्हे तर...

Comments


bottom of page