top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

लय आणि लयकारी - १


प्रस्तावना-


संगीतामध्ये लय व लयकारी या दोन बाबी अतिशय महत्वाच्या आहेत. लय म्हणजे संगीताच्या पंचप्राणांपैकी एक होय. केवळ संगीतातच नव्हे तर आपले जीवन, विश्व हे एका विशिष्ट लयीमध्ये चाललेले असते. लय बिघडली तर सर्वच असंबद्ध होते. निसर्गातून मिळालेल्या या लयीचा उपयोग मानवाने संगीतात समर्थपणे करून घेतला आहे. मानवाने आपल्या कल्पनाशक्तीच्या व प्रतिभाशक्तीच्या जोरावर लयीचे विविध प्रकार निर्माण केले. यातूनच पुढे लयकारी जन्माला आली.

संगीतामध्ये साथ-संगत करताना लयबद्ध ठेका वाजविणे महत्वाचे असते. लयबद्ध ठेका वाजवितानाच ठेक्याचे वेगवेगळे प्रकार, छोटे-मोठे तुकडे, उठाण, लग्गी असे अनेक प्रकारचे बोल भरुन, तबला वादन करावे लागते. असे केलेले वादन, गायन व नृत्य यांना पोषक ठरते व ते आकर्षक व प्रभावी होऊन रसिकांना आनंद देते. या सर्व आकर्षक, उठावदार वादनासाठी लय व लयकारींचा अभ्यास करणे हे तबला वादकासाठी अतिशय महत्वाचे असते. लय व लयकारींवर प्रभुत्व मिळविणे अतिशय कठीण असते. अतिशय कौशल्याने ते आत्मसात करावे लागते. त्यासाठी गुरुंचे योग्य मार्गदर्शन, रियाज, सातत्य, कल्पनाशक्ती, अभ्यासुवृत्ती, कष्ट इ. गुण वादकांच्या अंगी असणे आवश्यक असते.


अ ] लय -

लय ही एक समान गतीची जाणीव आहे. समान गतीची जाणीव समान

अंतरातून पडणाऱ्या आघातांमुळे होते. आघातातून निर्माण होणाऱ्या समबद्ध गतीची जाणीव म्हणजे 'लय' होय. लयीचा सर्वसाधारण अर्थ लीन होणे किंवा विश्रांती असा होतो. गायन वादनातील क्रिया व वेळेच्या परस्पर मिलनास 'लय' असे म्हणतात. गायन, वादन व नृत्य यांच्यातील वेळेच्या समान अंतरास 'लय' असे म्हणतात. दोन मात्रांमधील समान अंतर व त्यांची सतत होणारी पुनरावृत्ती म्हणजेच 'लय' होय. ताल वाजविताना तालाच्या प्रत्येक मात्रेमध्ये जे समान अंतर राखले जाते. त्यास 'लय' असे म्हणतात. संगीतातील विशिष्ट नियमित गतीला, वेळेच्या समान गतीस 'लय' असे म्हणतात. लय ही चतुस्त्र जातीतच असते. किंबहुना लयीसाठी जातींचा विचार केला जात नाही. सुगम व लोकसंगीताची साथ करताना लयीचा वापर होतो. असे गीतप्रकार सरळ लयीत असतात. यामुळे लयकारीचा येथे वापर होत नाही. लयीचा उपयोग विविध रसांची निर्मिती करण्यासाठी होतो.

उदा. विलंबित लय विरह रसासाठी, मध्य लय शांत, हास्य, शृंगार रसासाठी तर द्रुत लय भयानक, वीर, अद्भूत, रौद्र, बीभत्स इ. रसांच्या निर्मितीसाठी केला जातो.


लयीचे तीन मुख्य प्रकार आहेत ;


१) विलंबित लय २) मध्य लय ३) द्रुत लय


१) विलंबित लय - अतिशय संथ गतीस 'विलंबित लय' असे म्हणतात. ज्या वेळेस दोन मात्रांमधील अंतर फार जास्त असते, त्या वेळेस त्या लयीला 'विलंबित लय' असे म्हणतात. या लयीमध्ये विलंबित ताल वाजविले जातात. तसेच विलंबित ख्याल गायले जातात.


२) मध्य लय - मध्यम गतीने चालणारी लय म्हणजेच 'मध्य लय' होय. विलंबित व द्रुत लयीच्या मधल्या लयीस 'मध्य लय' असे म्हणतात. ही लय विलंबित लयीपेक्षा थोडी द्रुत तर द्रुत लयीपेक्षा थोडी संथ असते. उदा. एका सेकंदाला एक मात्रा / अक्षर.


३) द्रुत लय - जलद गतीने चालणारी लय म्हणजेच 'द्रुत लय' होय. ही लय मध्य लयीपेक्षा जलद असते. साधारणपणे विलंबित लयीची दुप्पट म्हणजे मध्य लय व मध्य लयीची दुप्पट म्हणजे द्रुत लय होय. म्हणजेच विलंबित लयीची चौगुन म्हणजे 'द्रुत लय' होय.

उदा. एका सेकंदाला चार वा आठ मात्रा / अक्षरं ( चौपट वा आठपट ).


अशाप्रकारे या तीन लयींमध्ये संगीत सादर केले जाते. साधारणपणे ठेका एकपट, दुप्पट, तिप्पट, चौपट या लयींमध्ये वाजविला अथवा म्हटला जातो.


ब ] लयकारी –

एखादी मूळ लय व त्या मूळ लयीच्या संदर्भात निर्माण केलेली दुसरी लय, या दोन्ही लयींमध्ये निश्चित असं प्रमाण किंवा गुणोत्तर निर्माण होतं, तेव्हा त्या प्रमाणास / गुणोत्तरास 'लयकारी' असे म्हणतात. मूळ लय कायम ठेवून त्या लयीतून दुसऱ्या जातींची वा वेगवेगळ्या लयींची निर्मिती झाली तर त्याला 'लयकारी' असे म्हणतात. अक्षरं किंवा लघुंमध्ये बदल केले तर लयकारी होते. लयकारी ही उत्तर हिंदुस्थानी वा कर्नाटक संगीतातून घेतली गेली आहे.

ताल विस्तार करताना मूळ लय कायम ठेवून ठेक्यातील अक्षरसमुहात

कमी-अधिक अक्षरांचा बदल करून वाजविले तर ते वादन प्रभावी होते.

यालाच 'लयकारी' असे म्हणतात. कल्पनाशक्तीच्या जोरावर तयार केलेली व विविध लयींनी नटलेली सुंदर रचना म्हणजे 'लयकारी' होय. लयकारीचा उपयोग शास्त्रीय गायन करताना होतो. तसेच तबला वादनात पेशकार वाजविताना व कायदे विविध लयकरींमध्ये वाजविताना लयकारींचा वापर होतो. याचबरोबर तबला वादनातील गती वाजविताना क्लिष्ट अशा लयकारींचा उपयोग केला जातो. अशा लयकारींमुळे श्रोत्यांना आनंद मिळतो. लयकारी ही पाच जातींवर आधारलेली असते. तीस्त्र, चतुस्त्र, खंड, मिश्र व संकीर्ण जातींवर लयकारी केली जाते. शास्त्रीय गायन वादन, शास्त्रीय नृत्य व जुगलबंदी करताना लयकारींचा कुशलतेने वापर केला जातो.


लयकारीचे दोन मुख्य प्रकार :


१) सरळ लयकारी - सरळ लयकारीत एकपट, दुप्पट, तिप्पट, चौपट इ. लयकारींचा समावेश होतो. एका मात्रेच्या कालावधीत एक मात्रा म्हणणे अथवा वाजविणे याला 'एकपट' असे म्हणतात. एका मात्रेच्या कालावधीत दोन मात्रा म्हणणे अथवा वाजविणे याला 'दुप्पट' असे म्हणतात. एका मात्रेच्या कालावधीत तीन मात्रा म्हणणे अथवा वाजविणे याला 'तिप्पट' असे म्हणतात. तर एका मात्रेच्या कालावधीत चार मात्रा म्हणणे अथवा वाजविणे याला 'चौपट' असे म्हणतात.


२) वक्र लयकारी - चार मात्रांच्या कालावधीत पाच मात्रा वाजविणे, यास 'कुआडी', सहा मात्रा वाजविणे म्हणजे 'आडी' तर सात मात्रा वाजविणे वा म्हणणे यास 'बिआडी' लय असे म्हणतात.


सर्वसाधारणपणे प्रत्येक तालाचे ११ लयकरींमध्ये रूपांतर करता येते. लयकारींचे मुख्य आड, बिआड, कुआड असे तीन प्रकार पडतात. तसेच या लयींच्या दुप्पटीस महा-आडी, महा-कुआडी आणि महा-बिआडी असे म्हणतात.

Recent Posts

See All

लय आणि लयकारी - ३

लय आणि लयीचे प्रकार - स्वर आणि लय यांचा उपयोग करून सादर केल्या जाणाऱ्या कलेस 'संगीत' असे म्हणतात. अर्थात संगीतात लयीला अनन्यसाधारण महत्व...

लय आणि लयकारी - २

'लघु-काल-भाव' थोडक्यात - मात्रेचा सर्वात लहान भाग म्हणजे लघु. मात्रा म्हणजे ताल मोजण्याचे परिमाण होय. पण तालातील प्रत्येक मात्रा ही...

Comments


bottom of page