top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

लखनौ घराणे


३} लखनौ घराणे :- दिल्ली घराण्याच्या उदयानंतर थोड्या अवधीतच लखनौ घराण्याचा जन्म झाला. या घराण्यावर पखवाजाचा अत्यंत प्रभाव असल्याने या घराण्याला खुल्या बाजातील आद्य घराणे असे म्हटले जाते. नादीर शहाच्या आक्रमणानंतर दिल्लीतील अनेक कलाकार दिल्लीच्या पूर्वेला असलेल्या लखनौ शहरात आश्रयास गेले. त्यात उस्ताद सिद्धार खॉं ढाढी यांचे नातू मोदू खॉं व बक्षू खॉं हेही लखनौ शहरात येऊन स्थायिक झाले. लखनौचे नवाब संगीताचे रसिक व नृत्याचे शौकीन होते. त्यांनी या दोघा बंधुंना आपल्या दरबारी ठेवून त्यांना राजाश्रय दिला. लखनौ शहरात कत्थक नृत्याचा खूप प्रसार होता. नृत्याची साथ-संगत करताना नृत्यातील तत्काराबरोबर द्रुत लयीतील पखवाज वादन करणे अडचणीचे भासू लागले. पखवाजाच्या तुलनेत सुलभ बैठक तसेच नाजूक व जोरदार दोन्ही प्रकारचे बोल निर्माण करण्याची क्षमता व वेग, या गोष्टींमुळे नृत्यासाठी पखवाजापेक्षा तबला हे वाद्य उजवे ठरू लागले. त्यामुळे पखवाजाची जागा हळूहळू तबला या वाद्याने घेतली. पुढे मोदू खॉं व बक्षू खॉं यांनी विचारपूर्वक पखवाज वादन शैलीचे रुपांतर तबला वादनात करून पूरब बाजाची निर्मिती केली. या बाजातच पुढे स्वतंत्र तबला वादनही होऊ लागले. पुढे ही वादनशैली प्रस्तुत करणारे अनेक कलाकार निर्माण झाले आणि यातूनच पुढे लखनौ घराण्याची निर्मिती झाली.


लखनौ वादन वैशिष्ट्ये :- तबल्याच्या चाटेऐवजी व डग्ग्याच्या लवेऐवजी

मैदानावर पुढे आघात करून पखवाज वादनाशी मिळते-जुळते नाद, तबला-डग्ग्यातून कसे निर्माण होतील याकडे त्यांनी लक्ष दिले. कालांतराने डग्ग्याच्या मैदानावर खुले आघात करण्याऐवजी लवेतच बोटांनी आघात करून अतिशय वेगात तबला वादन केले जाऊ लागले. या शैलीत होणारे तबला वादन खुलया बोलामुळे नृत्याच्या साथ-संगतीस अतिशय पोषक ठरले. वादन वैशिष्ट्यांवरून लखनौ बाजाला 'थापीयाँ'बाज असेही म्हणतात. कारण, या बाजात तबल्यावर अंगठ्याशिवाय इतर चार बोटे जुळवून त्या चारही बोटांच्या एकत्रित आघाताने जोरदार नाद निर्माण केला जातो. डग्ग्यावरही संपूर्ण पंजाने मैदानावर आघात करण्याची प्रथा या बाजात होती, पण कर्णमधुरता वाढावी, आवश्यक तिथे, बोल नाजूक-मुलायम यावेत, वेगही थोडासा वाढावा या दृष्टीने डग्ग्यावरील मैदानावर खुला आघात करण्याची प्रथा कमी होत गेली. चाटीऐवजी लवेमधे आघात केल्याने नाद अधिक रुंद बनला, पण ही पद्धत वेगाला पोषक न ठरल्याने दिल्ली बाजाच्या तुलनेत या बाजात कायदे निर्मिती फारशी होऊ शकली नाही. जे काही कायदे या बाजात आहेत ते दिल्ली, अजराडा पेक्षा मोठ्या आकाराचे असून त्याचा फारसा विस्तार होत नाही.


या शैलीत धिट-तिट, कडधे तिट, किटतक-धेत, ताके तिट, धेत-धेत इ. बोल-समूह जास्त दिसून येतात. कायदे, रेले या रचनांपेक्षा गत, तुकडे, परण, चक्रदार इ. जोरकस रचनांमुळे लखनौ घराणे व तबला वादन समृद्ध झाले आहे. नृत्य शैलीचा खास प्रभाव या बाजावर पडलेला दिसून येतो. कत्थक नृत्याने प्रभावित होऊन या घराण्याने चलन आणि रौ हे वादनप्रकार विकसित केले आहेत. लखनौ घराण्याला आपल्या स्वतंत्र वादन-शैलीमुळे तबला वादनात एक निराळे महत्व प्राप्त झाले आहे. मोदू खॉं व बक्षू खॉं यांचे अनेक शिष्य तयार होऊन त्यांची शिष्य-परंपरा तयार झाली आहे.


शिष्य परिवार आणि कलाकार :- उ. बडे मुन्ने खॉं, उ. आबिद हुसैन, उ. वाजिद हुसैन, उ. आफाक हुसैन, पं. स्वपन चौधरी इ.

Recent Posts

See All

पंजाब घराणे

६) पंजाब घराणे - भारतातील सहा प्रमुख घराण्यांपैकी 'पंजाब' घराणे हे तबलावादनातील वैशिष्टयपूर्ण घराणे ठरले ते त्याच्या तबला वादनातील...

बनारस घराणे

५) बनारस घराणे :- या घराण्याचे संस्थापक पंडित रामसहाय हे होत. हे लखनौ घराण्याचे खलिफा उस्ताद मोदू खॉं यांचे शिष्य. पं.रामसहाय यांनी...

फरुखाबाद घराणे

४) फरुखाबाद घराणे :- खुल्या बाजातील लखनौ या आद्य घराण्याचे हे शागीर्द घराणे होय. लखनौ घराण्याचे उस्ताद बक्षू खॉं यांचे जावई उस्ताद हाजी...

Comments


bottom of page