top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

खाली भरी


खाली-भरी ही संकल्पना केवळ ताल क्रियेशी निगडीत नसून तबला

वादनातील ते एक महत्त्वाचे सौंदर्य शास्त्र (सौंदर्यतत्व) आहे.


ताल : - स्थिरपणाने स्थापित असणे या अर्थाच्या 'तल' या धातुपासून 'ताल' शब्द अस्तित्वात आला. ताल म्हणजे क्रियेने मापला जाणारा 'काल'. 'तळ' म्हणजे हाताचा तळवा. म्हणजेच हातांनी मोजला जाणारा ( टाळीने ) तो 'ताल'. संगीत रचनांचा काल मोजण्याचे परिमाण म्हणजे 'ताल'.

गायन, वादन व नृत्य यांच्या साथीसाठी तालांचा उपयोग केला जातो. ताल क्रिया ही वर्तुळाकार असते. पुन्हा पुन्हा येत असते म्हणून ही क्रिया वर्तुळाकार होते. अर्ध्या भागावर असणाऱ्या कालाच्या योजनेमुळे ही क्रिया समबद्ध होते. त्या वर्तुळाचे दोन सम भाग होतात आणि कोणतीही समबद्ध किंवा प्रमाणबद्ध रचना, ही सौंदर्य निर्माण करते.

तबला वादनातील ताल क्रिया ही ठेक्याच्या माध्यमातून केली जाते त्यामुळे, तालामधील टाळी व खाली, तबल्यातील नादांच्या माध्यमातून व्यक्त केली जाते. परंतु, ठेका-विचार हा केवळ ताल क्रियेशी निगडीत नसून तो गाण्याशी वा त्याच्या बंदिशीवर आधारलेला असतो. या बंदिशीच्या मागणीनुसार ठेक्यातील अक्षारांची योजना केली जाते. असे करताना प्रत्येक वेळी तो ठेका ताल रचनेच्या नियमांप्रमाणे जातोच असे नाही. याचे मुख्य कारण बंदिश ही आधी ठेक्यावर गायली जाते आणि मग तालामधे. ठेक्याच्या अशा रचना अभ्यासताना खाली-भरी हा केवळ नियम न होता, हे एक सौंदर्य-तत्व आहे असे दिसून येते.


उदा. तीनतालाचा ठेका.

९ व्या मात्रेवर म्हणजेच खालीला 'धा' हे भरीचे अक्षर येते तर १३ व्या मात्रेवर 'ता' हे खालीचे अक्षर टाळीवर येते.

तीनताला प्रमाणेच एकताल, आडा-चौताल या तालांमध्येही हे तत्व दिसून येते.


स्वतंत्र तबला-वादनातील बंदिशी-खास करुन विस्तारक्षम रचनांच्या बंदिशींचे मूळ हे ठेक्यातचअसते. अर्थात या विस्तारक्षम रचनांमध्येही खाली-भरी तत्वाचाच प्रयोग केलेला आढळून येतो. स्वतंत्र तबला वादनाचे, विस्तारक्षम रचनांचा पूर्वार्ध आणि पूर्ण संकल्पित वा अविस्तारक्षम रचनांचा उत्तरार्ध,असे दोन भाग असतात. पैकी उत्तरार्धातील रचनांचे मूळ पखावज वादन आहे. परंतु, पूर्वार्धातील विस्तारक्षम रचना, हे तबला आणि तबलावादनाचेच वैशिष्ट्य आहे आणि या रचना खाली-भरी या तत्वावरच आधारित असतात.


खाली-भरीची अक्षरे -

भरीमध्ये बायाँ ची गुज असणारी अक्षरे, उदा. घे, धाघे, धीनागिन इ. वाजतात. तर खाली मध्ये क, के, तिनाकीन, ताके, ना इ. अक्षरे वाजतात. अशा विरोधी नादांमधूनच खाली-भरी उत्पन्न होते.


कायद्यातील खाली भरी –


मुळात खाली-भरीमुळे कायद्याचे दोन समान भाग होतात. कायद्याच्या विस्तारामध्ये जे अनुशासन पाळावे लागते त्यातील महत्वाचे म्हणजे कायद्यातील अक्षरांचाच वापर करून व त्याच्या खाली-भरीला अनुसरुन त्याचा केला जाणारा विस्तार. मुळात तबला या वादयाचा आविष्कार 'ख्यालाच्या' साथीसाठी झाला. ख्याल गायकीची, राग विस्तार आणि आरोह-अवरोहाच्या नियमांतून आवर्तन पूर्ण करण्याची पद्धत, ही दोन वैशिष्ट्ये आहेत. नेमक्या याच दोन वैशिष्ट्यांचा प्रभाव तबल्याच्या विस्तार क्रियेमध्ये दिसतो. विस्तारक्षम बंदिशीतील बोलांची, गाण्याच्या मुखड्याप्रमाणे 'आमद' ठेवून बढत केली जाते आणि आरोह अवरोहाप्रमाणे खाली-भरीच्या माध्यमातून आवर्तन पूर्ण होते. (आरोह-अवरोह दिसून येतो.)

खाली भरीचे नाद हे परस्पर विरोधी असल्यामुळे त्यातून विरोधनाद-संगती निर्माण होते. वर म्हटल्याप्रमाणे खाली-भरी हा विस्तार क्रियेतला एक नियम आहे, पण त्याचप्रमाणे ते एक सौंदर्यतत्त्वही आहे आणि म्हणूनच प्रतिभावान कलाकार, या कला शास्त्रातील हे नियम कधी वाकवतात तर कधी मोडतात.


उदा. अजराडा घराणांच्या कायद्यांमध्ये खाली मध्ये मूळ कायद्याच्या अक्षरांऐवजी तिनतिनाकीन, ताके तिरकिट अशी अक्षरे वाजवली जातात. मुळात खाली-भरीतून जी विरोधी संगती निर्माण होते, त्याचा सुंदर कल्पक वापर तबला वादनातील रचनांमध्ये दिसून येतो. (उत्तरार्धातील रचनांमध्ये)

उदा. धागे तीट - ताके तीट, धेत धेत धा त्रक - धेत तेत ता त्रक इ.

Recent Posts

See All

ठेका आणि ठेक्याचे गुणधर्म

ठेका - ताल म्हणजे कालाची आकड्यात मोजणी. जेव्हा मोजणीचे आकड्यातून / अंकातून विशिष्ट बोलांमध्ये रूपांतर होते, तेव्हा तो 'ठेका' होतो. तालाला...

मार्गी ताल व देशी ताल

इ.स. सुमारे ४०० च्या आसपास लिहिल्या गेलेल्या भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातील विवेचनावरून असे दिसून येते की, त्या काळी सर्व भारतवर्षात एकच...

ताल

ताल - संगीत शास्त्रामध्ये तालाचे स्थान अतिशय उच्च दर्जाचे व महत्वपूर्ण असे आहे. स्थिरपणाने स्थापित असणे या अर्थाच्या 'तल' या धातुला 'अ'...

Comments


bottom of page