top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

कायदा


ब ] कायदा - जी रचना तालाच्या खाली-भरीला अनुसरून असते, ज्याचे अंत्यपद स्वरमय असते, अशा विस्तारक्षम रचनेस 'कायदा' असे म्हणतात. विस्तार करताना कायद्यातील बोलांचाच आधार घेऊन विस्तार केला जातो. 'कायदा' म्हणजे नियम. नियमांमध्ये बांधलेली रचना म्हणजे 'कायदा' होय. तालाचे स्वरूप कायम ठेऊन, बोल-समूहांची केलेली नियमबद्ध रचना म्हणजे 'कायदा' होय. कायद्याचे प्रस्तुतीकरण साधारणपणे विलंबित वा मध्य लयीत केले जाते. कायद्याचे अनेक पलटे / प्रकार होतात व कायदा शेवटी तिहाईने संपवितात. कायदा ही स्वतंत्र तबला वादनातील अतिशय महत्वाची रचना असून, ती पेशकारानंतर वाजविली जाते. प्रत्येक घराण्याच्या घडणीनुसार कायद्याची रचना बनवलेली असते. कायदा हा शब्द 'कैद' म्हणजे बंधनयुक्त, जो अरबी शब्दावरून आला असावा असे मानले जाते. दायाँ-बायाँ वरचे वादकाचे प्रभुत्व आणि त्याची कल्पनाशक्ती या गोष्टी कायद्यामुळेच श्रोत्यांच्या निदर्शनास येतात. कायद्यामध्ये लय, दायाँ-बायाँ वर उमटणारे विविधस्वरूपी नादध्वनी आणि कल्पनाविस्तार या गोष्टी प्रामुख्याने आढळतात. या वादनप्रकारास 'कायदा' ही संज्ञा प्राप्त होण्याचे कारण त्याचा विकास हा ठराविक बंधनातूनच होत असतो.


कायद्यात नियम इतकाच असतो की, एखाद्या कायद्याच्या मुखड्यात अथवा प्रारंभीच्या ठेवणीत वापरली गेलेली अक्षरे अथवा नादध्वनी केवळ यांचाच विस्तार या कायद्यात झाला पाहिजे. एकदा का एखाद्या कायद्याचे मुख मांडले की त्यात असलेल्या नादध्वनीचाच, बोलाचाच, बोलपंक्तीचाच विस्तार करणे आवश्यक असते. दुसरे एक बंधन म्हणजे, 'खाली-भरी'. कुठल्याही कायद्याचे, मग तो कुठल्याही तालात बांधलेला असो, त्याचे 'खाली-भरी' हे दोन भाग होणे आवश्यक असते. हे दोन भाग कायद्यामध्ये वापरलेल्या बोलांवर, त्यांच्या नादध्वनींवर अवलंबून असतात. कायद्याची रचना तालांच्या विभाग-खंडांच्या रचनेवर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे हा प्रकार ठाय, दुगून अशा लयीच्या दर्जांमध्ये वाजविला जातो. तरी सुद्धा लयीवर प्रभुत्व मिळवलेले कलाकार लयीचे अनेक प्रकारचे दर्जे, लयकारी कायद्यात उत्तम प्रकारे करून, मांडून वाजवून दाखवितात.

कायद्याच्या पलट्यांचा, बोलांचा अथवा नादध्वनींचा विस्तार सर्वसाधारणपणे बांधीव आणि एकाच साच्यातील असतो. तबला वादकाला कायद्याचे तालाप्रमाणे पाडलेले खंड, विभागणी, त्याची ठराविक वेळानंतर होणारी खाली व भरी व त्याची लय हे प्रकार लक्षात ठेवून कायद्याचा विस्तार आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर उत्स्फूर्तपणे करावा लागतो. 'भरीमध्ये' काय वाजविले आहे तेच 'खालीमध्ये' वाजविणे आवश्यक असल्यामुळे हा विस्तार पूर्वनियोजित असणे महत्वाचे असते. कायद्याचा आणखी एक महत्वाचा नियम म्हणजे, क्रियापद सांभाळून एका ठराविक क्रमामध्येच (जंत्रीमध्ये, sequence मध्येच) त्याचा विस्तार होणे आवश्यक आहे. हा क्रम सगळ्या तालाच्या कायद्यांमध्ये पाळला जातो व ह्या क्रमानुसारच कायद्याचा विस्तार केला जातो.


हा क्रम खालीलप्रमाणे :


i) मुख ii) दोहरा iii) आधा दोहरा iv) विश्राम v) आधा विश्राम

vi) पलटे / बोलबाँट vii) तुकडा / तिहाई.


आड किंवा अनवट पलटे वाजविल्यास त्यांना 'बलपेच' असे म्हणतात.


कायद्याच्या विस्ताराचे नियम आणि कायद्याचा प्रत्यक्ष विस्तार -


१) कायद्यातील शब्दबंधांचाच उपयोग विस्तारात करावा.

२) खाली व भरीच्या पूर्वी स्वरमय अंत्यपद असावे.

३) दोन पलट्यांमध्ये नाते असावे. म्हणजेच एका पलट्यातून दुसरा पलटा तयार करून वाजवावा.


कायद्यातील प्रत्यक्ष विस्तार - कायदा प्रस्तुत करताना सुरवातीस तो एकपटीत वाजविला जातो. बऱ्याचदा काही विद्यार्थी ही एकपट केवळ उपचार म्हणून एकदाच वाजवून लगेच दुप्पट करतात, परंतु कायद्याची एकपट कलात्मक पद्धतीने वाजविणे हे एक आव्हानच असते.


कायदा एकपटीत वाजविल्यामुळे होणारे परिणाम -


१) कायद्यातील सर्व अक्षरे सुस्पष्टपणे श्रोत्यांपर्यंत पोहचतात.

२) कमी लयीत वाजविताना कायद्यामधील शब्दबंध अधिक स्पष्टपणे दिसून येतात.

३) कायद्याची जी दुप्पट करायची असते त्याचा योग्य अंदाज एकपट करताना व्यवस्थित घेता येतो.


एकपट वाजवून झाल्यावर बऱ्याचदा त्या कायद्याची दीडपट वाजविली जाते व नंतर पुढे दुप्पट केली जाते. काही कलाकार आधी एकपट मग दीडपट व दुप्पट वाजवून टाकतात. तर काही कलाकार या तीनही लयींचा सुंदर खेळ करत दुपटीवर जातात.


कायद्याचा दुपटीतील विस्तार : - कायद्याची एकपट करून झाल्यानंतर त्याची दुप्पट करून त्यातच सर्व पलटे वाजवून कायद्याचा विस्तार केला जातो.

कायद्यातील पलट्यांचे प्रकार आणि त्यांचा विस्तार खालीलप्रमाणे :


१) मुख - हा कायद्याचा पहिला प्रकार, 'मुख' या संज्ञेस साजेसा आहे. कायद्याची मांडणी, त्याचा विस्तार करण्यापूर्वी ज्या पद्धतीने मांडली जाते, त्यालाच 'मुख' असे म्हणतात. दुपटीमध्ये मुख वाजवून झाल्यावर पुढे त्याचेच पलटे/ प्रकार केले जातात. मुखातील शब्दबंधांचाच वापर करून कायद्याचा पुढील विस्तार केला जातो.


२) दोहरा - कायद्याच्या पहिल्या चरणाचे दोन सारखे भाग करून त्यातील पहिला भाग दोन वेळा वाजवून त्याला मुख्य चरण ( मुख ) जोडून, खाली-भरीच्या माध्यमातून जी रचना प्रस्तुत होते, ( जो पलटा तयार होतो ) त्याला 'दोहरा' असे म्हणतात. 'दोहरा' म्हणजे 'दोहराना'. दोहऱ्यातील शब्दबंधांच्या पुनरावृत्तीमुळे एक प्रकारचा छंद निर्माण होतो आणि कायद्याचा आकार दुप्पट मोठा होऊन त्याच्या विस्ताराचे क्षेत्र वाढते.


३) आधा दोहरा - यात दोहऱ्यामधील पहिली काही अक्षरे म्हणजेच दोहऱ्याच्या अर्ध्या भागातील अक्षरे घेऊन त्याचा पलटा बनवून वाजवितात.


४) विश्राम - 'विश्राम' म्हणजे 'विश्रांती' ( Pause ). मुखातील पहिली काही अक्षरे घेऊन त्यात, मधे दीर्घ विश्रांती घेऊन पलटा वाजविला जातो.


५) आधा विश्राम - यात 'विश्रामाच्या' पलटयांमधली सुरवातीची अक्षरे वाजवून त्यात एक क्षणिक 'विश्राम' घेऊन पलटा वाजविला जातो.


६) पलटे / बोलबाँट - यात मुखातील असणाऱ्या सर्वच अक्षरांचा वापर करून पलटे तयार करून कायद्याचा विस्तार वाजविला जातो.


७) तुकडा / तिहाई - या प्रकारात मुखातील बोलांचा वापर करून अखेरीस लहानशी पंक्ती तीनवेळा वाजवून कायदा संपवितात. कित्येकदा मुखातल्या बोलांचा उपयोग करून चक्रदार तिहाई वाजवून कायदा संपविला जातो. म्हणजेच कायद्यातील अक्षरांनी तयार केलेली तिहाई अथवा चक्रदार वाजवून शेवटी कायदा संपविला जातो.


कायद्याचा विस्तार करताना कायद्यातील आधीच्या पलट्यांमध्ये केलेले काम लक्षात घेऊन पुढील विस्तार केला जातो. त्याप्रमाणेच कायद्यामधील शब्दबंधांचा जो क्रम असतो त्या क्रमानेच कायद्याचा विस्तार केला जातो. या विस्तारामध्ये काही पलटे लयीला अवघड, काही एकाच नादाच्या पुनरावृत्तीने अनुप्रासाचा छंद निर्माण करणारे, तर काही विश्रामयुक्त असल्यामुळे 'यति' या सौंदर्यतत्वाची जाणीव करून देणारे असल्यास त्या कायद्याचा विस्तार हा अत्यंत प्रभावी होतो. अन्यथा केवळ यांत्रिक विस्तार क्रिया ही कंटाळवाणी ठरू शकते.


कायद्याचा विस्तार - समाप्ती


कायद्यामध्ये तयारी किंवा वेगाला विशेष महत्व दिले गेलेले असल्यामुळे बरेच कायदे तद्-अनुषंगिक बोलांच्या वापराने रचले गेलेले आहेत. बोटांची अतिजलद हालचाल आणि ठाय लयीत वाजल्या गेलेल्या बोलांची द्रुत लयीत काढली गेलेली निकास, ह्या गोष्टी श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे कायदा हा प्रकार अतिशय लोकप्रिय झालेला आहे. इतर अविस्तारक्षम रचनांच्या तुलनेत कायद्याची रचना करणे सोपे असते आणि कायद्याची रचना श्रोत्यांना समजण्यासही सोपी असते. ह्या सर्व कारणांमुळे तबला वादनात रचल्या गेलेल्या कायद्यांची संख्या अगणित आहे.

Recent Posts

See All

गत

ड] गत - समेपूर्वी संपल्यामुळे पुनरावृत्ती करताना येणारी व त्यामुळे निसर्गातील विविध चालींचा ( movements ) प्रत्यय देणारी बंदिश म्हणजे...

रेला

क] रेला - ज्या रचनेमधील बोल शीघ्र ( द्रुत ) गतीने वाजू शकतात, अंत्यपद सर्वसाधारणपणे व्यंजन असते, जी रचना विस्तारक्षम असून तालाला अनुसरून...

Comments


bottom of page