top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

कर्नाटक संगीतातील वाद्यांची थोडक्यात माहिती


१) मृदंगम - याचे खोड फणस, निंब किंवा शिसवीच्या लाकडापासून बनवितात. याचा आकार साधारणपणे आपल्याकडील पखवाजाप्रमाणे असतो. खोडाची लांबी जरा कमी म्हणजे ५५ ते ६० से.मी. असते. मधल्या फुगीर भागाचा व्यास अंदाजे ३० से.मी. असून हा फुगीर भाग डाव्या बाजूस जास्त असतो. डाव्या तोंडाचा व्यास २० ते २२ से.मी. तर उजव्या तोंडाचा व्यास १५ ते १७ से.मी. असतो. मृदंगमच्या दोन्ही तोंडावर चामड्याच्या पुड्या वादीची गुंफण करून आणि ताण देऊन घट्ट बसवितात. उजव्या पुडीला 'वलनतलै' असे म्हणतात. या पुडीच्या मध्यभागी शाईचा लेप असतो. मात्र तबल्याप्रमाणे चाटी / किनार कापलेली नसून, ती शाई भोवती गोलाकार थोडे अंतर सोडून ठेवलेली असते. डाव्या पुडीला 'तोप्पी' असे म्हणतात. या पुडीवर गव्हाच्या किंवा तांदळाच्या पिठाचा लेप देतात. प्रत्येक वादनाच्या वेळी हा लेप नव्याने द्यावा लागतो.


वादनशैली - दोन्ही हात, बोटे यांचा उपयोग करून, पखवाजाप्रमाणेच मृदंगम चे वादन केले जाते. मृदंगम मांडीवर आडवे घेऊन, दोन्ही हातांनी व दोन्ही हातांच्या बोटांनी वाजविण्याची पद्धत आहे. मृदंगम हे वाद्य कर्नाटक वा दक्षिण भारतीय संगीतातील प्रमुख ताल-वाद्य आहे. दक्षिण भारतीय संगीत पद्धतीतील सर्वच ताल या वाद्यावर वाजविले जात असल्यामुळे सहाजिकच साथीच्या संदर्भात कर्नाटक संगीतातील हे अतिशय महत्वाचे ताल-वाद्य आहे. प्रत्येक तालाच्या स्वरूपानुसार ठराविक मात्रांमध्ये लघु-गुरु अंगाने मृदंगमचे वादन केले जाते. हे वादन अतिशय तयारीने सादर केले जाते. तसेच मृदंगमच्या वादनात विविध लयकारींचे मनोहारी दर्शन होते.


२) ताविल - हे वाद्य फणसाच्या लाकडापासून तयार करतात. याचा आकार मृदंगम या वाद्याप्रमाणेच, परंतु थोडा लहान असतो. खोडाची लांबी सुमारे ४० ते ४२ से.मी. असते, आणि मधला फुगीर भाग ३५ से.मी. व्यासाचा असतो. दोन्ही तोंडे सारखीच म्हणजेच २१ से.मी. व्यासाची असतात. ताविलच्या दोन्ही पुड्या वेगळ्या पद्धतीने तयार करतात. वेताच्या किंवा वेळूच्या पात्तळ पट्ट्या गोलाकार वळवून, त्यांची योग्य आकारात गोलकडी तयार करतात. या दोन्ही कड्यांवर पातळ चामडे भरपूर ताण देऊन घट्ट बसवितात. चामडे बसविलेली ही कडी नंतर वादीची गुंफण करून, खोडाच्या दोन्ही तोंडावर भरपूर ताण देऊन बसवितात. चामड्यावरील ताण भरपूर आणि स्थायी स्वरूपाचा असल्यामुळे ताविल हे तालवाद्य वारंवार स्वरात मिळवून घेण्याची आवश्यकता भासत नाही.


वादनशैली - मृदंगम प्रमाणेच ताविल हे वाद्य मांडीवर घेऊन दोन्ही हातांनी वाजवितात. ह्यातील उजव्या पुडीवर मनगट, तळवा आणि हाताची बोटे यांनी आघात करून तर डाव्या पुडीवर लहान काठीने आघात करून वादन करण्याची पद्धत आहे. ग्रामीण आणि अभिजात कर्नाटक संगीत, अशा दोन्ही संगीत प्रकारांच्या साथ-संगतीमध्ये ताविल हे वाद्य वाजविले जाते. 'नागस्वरम' या स्वरवाद्याच्या साथीला ताविल हे ताल वाद्य घेण्याची पद्धत असून, या वाद्यमेळ्यास 'पेरीयमेलम' असे म्हणतात.


३) खंजिरी - या वाद्यात, गोलाकार अशा अडीच इंच रुंद, लाकडी चकतीच्या एका बाजूला, घोरपडीचे कातडे ताणून बसविलेले असते तर दुसरी बाजू मोकळी असते. खंजिरीचा व्यास सुमारे १० इंच असतो. लाकडी पट्टीमध्ये ३ ते ४ भोकं ठेवलेली असतात, त्यात सळ्या योजून त्या सळ्यांमध्ये धातूच्या पात्तळ गोलाकार चकत्या घातलेल्या असतात.


वादनशैली - हे वाद्य हलविताच त्या चकत्यांचा किणकिणाट होतो. हे वाद्य डाव्या हातात धरून उजव्या हाताच्या तळव्याने व बोटांनी, तोंडावरच्या कातड्यावर आघात करून हे वाद्य वाजविले जाते. कातड्याला थोडे पाणी लावताच स्वर उतरतो. वाजविताना कडेला असणाऱ्या कातड्याच्या भागावर चारही बोटांची उघड-झाप करून नादात विविधता आणली जाते. दक्षिणेत अभिजात गाण्याच्या बैठकीतही मृदंगम वाद्याबरोबर साथीचे वाद्य म्हणून खंजिरीचे वादन केले जाते.


४) घटम - घटम हे मातीचे ताल-वाद्य असून ते विशिष्ठ प्रकारच्या मातीपासून तयार केले जाते. ह्याचा आकार गोल आणि मोठ्या माठासारखा असून त्याचे तोंड निमुळते आणि लहान असते. मध्यभागाचा घेर बराच मोठा आणि फुगीर असून मातीमध्ये लोखंडाची थोडी पुड मिसळून त्या मिश्रणापासून घटम तयार करतात. घटमची बनावट आणि भाजणी अतिशय काळजीपूर्वक करावी लागते.


वादनशैली - घटम हे तालवाद्य वाजविण्याची पद्धत फारच वेगळी आहे. वादक मांडी घालून बसतो. आपल्या उघड्या पोटावर घटमचे तोंड दाबून धरतो. दोन्ही हातांच्या तळव्यांनी आणि बोटांनी घटमच्या तोंडावर आणि निरनिराळ्या जागी आघात करून हे वाद्य वाजविले जाते. आघात करण्याच्या जागा भिन्न असल्यामुळे घटम मधून निर्माण होणाऱ्या बोलांमध्ये विविधता येते. पोटाशी दाबून धरलेल्या तोंडावरील दाब कमी-अधिक करूनही बोलांमध्ये विविधता निर्माण केली जाते.

घटम वाद्य वाजविणे कठीण असून वादक कुशल आणि तयारीचा असल्यास, लय-तालांचा सुंदर आणि कलात्मक आविष्कार या वाद्याच्या वादनामधून आपणास ऐकावयास मिळतो. कर्नाटक संगीतामध्ये मृदंगमच्या जोडीला साथ-संगत स्वरूपात घटम या ताल-वाद्याचे वादन केले जाते. खास करून 'विधिग्ध' संगीताच्या साथीबरोबर 'घटम' हे तालवाद्य नेहेमी वापरतात.

Recent Posts

See All

पखवाजावर वाजविले जाणारे वर्ण आणि त्यांची निकास पद्धती -

पखवाज हे वाद्य केव्हा, कोणी, कसे निर्माण केले, याबाबत ठोसपणे माहिती कोणत्याही ग्रंथात आढळून येत नसली तरी या अवनद्ध वाद्याची उत्पत्ती...

पखवाज/पखावज -

भगवान शंकराजवळील डमरू हे सर्वात प्राचीन वाद्य आहे. या आधारावर पखवाजाची उत्पत्ती झाली. पखवाज या वाद्याच्या प्राचीनतेचा पुरावा ऋग्वेदात...

पाश्चात्त्य संगीतातील वाद्यांची थोडक्यात माहिती

पाश्चात्त्य अवनद्ध वाद्यांचा विकास कसा झाला याचे अध्ययन केल्यानंतर असे लक्षात येते, की या वाद्यांच्या निर्मितीमध्ये सुरुवातीला दगड, हाडे,...

Comments


bottom of page