top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

घराण्यांचा उगम, निर्मिती, विकास, अर्थ, संकल्पना आणि बाज


१} प्रस्तावना :- भारतीय संगीताचे खास वैशिट्य म्हणजे ते परंपरेने चालत आलेले आहे. प्राचीन काळी जेव्हा मुद्रणकला अस्तित्वात नव्हती तेव्हापासून केवळ कुशाग्र बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मेहनत यांच्या बळावर ही कला जतन करण्यात आली आहे. गुरुमुखातूनच घ्यावी लागत असल्यामुळे संगीतात गुरुशिष्य परंपरेला महत्वाचे स्थान आहे. अनेक ऋषितुल्य गुरुजनांनी आपल्या प्रतिभेने आणि अथक प्रयत्नांनी संगीताचा वृक्ष जपला.


२} घराण्यांचा जन्म :- गायनात ज्याप्रमाणे स्वर लावण्याची पद्धत, राग विस्ताराची रीत, बंदिशींची निवड, आलाप-तानांचे प्रकार इ. गोष्टींवरून वेगवेगळी घराणी निर्माण झाली. त्याचप्रमाणे तबला वादकांनी साथ-संगत करीत असतानाच आपली वादन कला विकसित केली. हात ठेवण्याची पद्धत, बोटांचा वापर, डग्ग्यावरील मिंडकाम, बंद-खुल्या बाजाचा स्वीकार, बोलांचा वापर, बंदिशींचे प्रकार यावरून तबला वादकांनी आपल्या वेगळ्या शैलींवरून तबल्यातील नवीन घराण्यांची निर्मिती केली. तिथे त्यांनी आपला शिष्य-संप्रदाय निर्माण केला. आपली एक वेगळी आणि वैशिष्टयपूर्ण शैली निर्माण केली आणि यातूनच पुढे घराण्यांचा जन्म झाला.


३} घराणे-संकल्पना, अर्थ :- संगीतातील 'घराणे' हा शब्द आपल्या व्यावहारीक भाषेतील 'घराणे' या शब्दाशी साधर्म्य दाखवतो. संगीतातील घराणी म्हणजे विविध प्रकारच्या शैली व रचना पिढ्यान-पिढ्या चालत येणे. 'विशिष्ट विचारप्रणाली अर्थात रचना व त्या विचारांना सौंदर्यपूर्णरित्या व अतिशय प्रभावीपणे प्रकट करू शकणारी निकास पद्धती ( शैली ) यांचा सुरेख मिलाफ म्हणजे 'घराणे' होय. तबल्यातही प्रस्थापित झालेल्या विविध शैलींना 'घराणे' असे संबोधले जाते.


४} घराण्यांची निर्मिती :- एक उस्ताद अथवा गुरु, त्याचा मुलगा व इतर शिष्य, त्या मुलाची अगर शिष्यांची वंशावळ अशा अनुक्रमाने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे ही कला पुढे जात आलेली आहे. अनेक शिष्य या कलेचा शिस्तीने, एकनिष्ठेने, गुरूंच्या कलेवरील, विद्वत्तेवरील आदरभावाने प्रचार व प्रसार करतात. अशा शिष्यांपैकी अथवा गुरूंपैकी एखादाच असा प्रतिभावान व बंडखोर निपजतो की तो पूर्वापार चालत आलेल्या रूढींचा पाश झुगारून देऊन स्वतंत्र असे काहीतरी करून दाखवतो. त्यांच्यापर्यंत चालत आलेल्या पिढीजात वादनशैलीमध्ये, वादनवैशिष्ट्यांमध्ये, अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनाला बगल देऊन सुधारणा घडवून आणतो. इतर घराण्यांमध्ये आढळणारी निवडक, उत्तमोत्तम वादनवैशिष्ट्ये तो उदार मनाने अंगिकारतो आणि त्याचे वादन वैशिष्ट्यपूर्ण व प्रगल्भ होते. असे करताना त्याची इतर घरंदाज शैलीहून निराळी अशी एक खास शैली निर्माण होते. त्याची शिष्यावळ वाढते आणि कालांतराने त्याच्या जन्मगावाचे अथवा त्याचे वास्तव्य असलेल्या गावाचे नाव त्या घराण्याला दिले जाते. त्यांनी निर्माण केलेली नवीन शैली, विचार जर श्रोत्यांना आवडले आणि त्यांच्या मुलांनी, शिष्यांनी अतिशय प्रभावाने ती शैली सादर केली व पुढे जाऊन त्या कलाकाराच्या तिसऱ्या पिढीने अथवा शिष्यांनी हीच शैली श्रोत्यांसमोर सादर करून वाहवा मिळवली तर नवीन घराण्याचा जन्म झाला व ते घराणे चांगल्या रीतीने संगीतात स्थिर झाले असे म्हणतात.


५} निर्मिती मागचे कारण :- घराण्यांच्या निर्मितीच्या कारणांचा शोध घेणे तसे कठीणच आहे. पण कुठल्याही एखाद्या नवीन गोष्टीचा घराण्यांपर्यंत झालेला प्रवास हा साधारणतः नव-विचार, त्यातून विशिष्ट शैली व त्यामधून घराणे असा होत असावा. कोणताही नव-विचार ज्यावेळी प्रथमतः व्यक्त होतो, त्यावेळी तो चाकोरीबाहेरील असतो. पण तोच विचार विशिष्ट शैलीद्वारे पिढ्यान-पिढ्या व्यक्त होत राहिला तर त्या विशिष्ट शैलीसह प्रकटणारा तो नव-विचार एक घराणे बनत असावा. मानवी वृत्तीतील असमाधानीपणा तसेच इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची वृत्ती या दोन्हींचा विधायक परिणाम म्हणजे नवनिर्मिती असे म्हणता येईल. घराण्यांच्या निर्मितीमागे मानवी मनातील ह्या गोष्टीही कारणीभूत असाव्यात. विशिष्ट प्रदेशाची ऐतिहासिक, भौगोलिक, राजकीय परिस्थितीही विविध घराण्यांच्या निर्मितीमागील कारण असू शकते.


६} घराण्यांचा विकास :- पूर्वी ऐतिहासिक काळापासून शास्रीय गायन-वादनाला राजाश्रय होता. सम्राट अकबर बादशहाच्या काळात त्याच्या दरबारी, मियाँ तानसेनसारखा श्रेष्ठ धृपद गायक असल्याचे उल्लेख आपण इतिहासात नेहमीच वाचतो. राजाश्रय लाभलेले अनेक गायक-वादक बरेच वेळा इतर राजाश्रित गायक-वादकांशी त्यांच्या राज्यात जाऊन त्यांना आव्हान देत असत व त्यांच्याशी स्पर्धा करीत. अशा स्पर्धेत आपल्याला पराभव पत्करावा लागू नये म्हणून व आपले राज गायक-वादक पद अबाधित राहावे ह्या भीतीतून, जाणिवेतून पूर्वीच्या काळी अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ गायक-वादकांनी गायन-वादनात स्वतःची खास वैशिष्ट्ये जोपासली. वादन करण्याच्या विशिष्ट शैली व पद्धती प्रयत्नपूर्वक विकसित केल्या आणि अशा प्रकारे ह्यातूनच पुढे घराण्यांचा विकास होत गेला.


७} घराणी :- स्वतंत्र तबला वादनाच्या विविध घराण्यांचा जन्म १८व्या शतकात झाला असावा असे मानले जाते आणि या सगळ्यातूनच पुढे तबल्यातील एकूण प्रमुख सहा घराण्यांची निर्मिती झाली.


अ) दिल्ली घराणे ब) अजराडा घराणे क) लखनौ घराणे ड) फरुखाबाद घराणे इ) बनारस घराणे ई) पंजाब घराणे


* बाज म्हणजे काय..?


काही तबला वादकांनी आपल्या कल्पनाशक्तीने व प्रतिभाशक्तीने वेगवगेळ्या घराण्यांची निर्मिती केली. त्यामुळे त्यांच्या वादनशैलीमध्ये इतके अंतर पडले की प्रत्येक घराणे आपल्या एका खास शैलीने ओळखले जाऊ लागले. तबल्याच्या वादनपद्धतींचा मागोवा घेत गेल्यास तबल्याचे प्रमुख दोन बाज आढळतात. 'बाज' हा शब्द हिंदी भाषेतील 'बजाना' म्हणजे 'वाजविणे’ ह्या क्रियापदापासून निर्माण झालेला आहे. तबला वादनाच्या विविध शैली / पद्धती म्हणजे 'बाज' होय. 'बाजा'चे दोन मुख्य प्रकार आहेत, 'बंद बाज' व 'खुला बाज'. तबल्याच्या वैशिष्टयपूर्ण बनावटीमुळे तबल्यावर विविध प्रकारे वादन होऊ शकले आणि त्यातून ह्या दोन बाजांची निर्मिती तबल्यामध्ये झाली. तबल्याच्या साहित्याचा मूलाधार पखवाज असला तरी तबल्याच्या अनोख्या बनावटीमुळे तबल्यामध्ये विविध दृष्टिकोन (बाज) निर्माण होत गेले.


१) बंद बाज :- ह्या बाजात दायाँ-बायाँ मधून निर्माण होणाऱ्या नादांची आस मर्यादित असते. म्हणजेच या बाजामध्ये बंद बोलांचा वापर जास्त केला जातो. प्रत्येक बोटाला महत्व दिले असल्याने तसेच आस मर्यादित असल्याने या बाजात वेग आढळून येतो. दायाँ-बायाँ मधून निर्माण होणाऱ्या शुद्ध नादास जास्त महत्व असते. विस्तारक्षम रचनांची म्हणजेच कायदे, रेले यांची विपुलता व पूर्वसंकल्पित (अविस्तारक्षम) रचनांचा अभाव हे या बाजाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.


२) खुला बाज :- पखवाजाची पूर्ण छाप ह्या बाजावर पडलेली आढळते. या बाजात आस निर्मितीवर बंधन नसल्यामुळे खुल्या बोलांचा वापर जास्त केला जातो. संपूर्ण पंजांनी खुले वादन केले जाते. वेगावर मर्यादा पडते. त्यामुळे ह्या बाजात परण, गत-परण, तुकडे, चक्रदार अशा अविस्तारक्षम रचना जास्त आढळून येतात.


बाजांची निर्मिती,वापर सर्वप्रथम दिल्ली व लखनौ या घराण्यांनी केली असे मानले जाते. दिल्लीने बंद तर लखनौ ने खुल्या बाजाचा स्वीकार केला आणि ह्यातूनच पुढे बाकीची घराणी उदयास आली असे मानले जाते.

Recent Posts

See All

पंजाब घराणे

६) पंजाब घराणे - भारतातील सहा प्रमुख घराण्यांपैकी 'पंजाब' घराणे हे तबलावादनातील वैशिष्टयपूर्ण घराणे ठरले ते त्याच्या तबला वादनातील...

बनारस घराणे

५) बनारस घराणे :- या घराण्याचे संस्थापक पंडित रामसहाय हे होत. हे लखनौ घराण्याचे खलिफा उस्ताद मोदू खॉं यांचे शिष्य. पं.रामसहाय यांनी...

फरुखाबाद घराणे

४) फरुखाबाद घराणे :- खुल्या बाजातील लखनौ या आद्य घराण्याचे हे शागीर्द घराणे होय. लखनौ घराण्याचे उस्ताद बक्षू खॉं यांचे जावई उस्ताद हाजी...

Comments


bottom of page