दिल्ली घराणे
- Team TabBhiBola
- Dec 13, 2020
- 2 min read
Updated: Jan 29, 2021
१} दिल्ली घराणे :- सर्व घराण्यांचे आद्य घराणे म्हणजे दिल्ली घराणे. दिल्ली घराण्याचे प्रवर्तक उस्ताद सिद्धार खॉं ढाढी हे होत. हे सर्वात जुने घराणे मानले जाते. उस्ताद सिद्धार खॉं ढाढी यांनी त्या काळी होणाऱ्या संगीतातील बदलांचा सखोल अभ्यास करून पखवाजाच्या बोलांना तबल्यावर वाजवण्यायोग्य परावर्तित केले, चाटी प्रधान बोलांची निर्मिती केली आणि ख्याल गायकी व शृंगार प्रधान गायकीस पोषक अशी नवीन वादनशैली निर्माण केली. कालांतराने त्यांची मुले व शिष्य परिवार यांनी या शैलीचा प्रचार व प्रसार केला. आणि यातूनच पुढे दिल्ली घराण्याचा उगम झाला.
* दिल्ली वादन वैशिष्ट्ये :- ख्यालाला अनुकूल ठरणाऱ्या तबला वादन पद्धतीचा प्रभाव दिल्ली घराण्यावर पडला. या घराण्याने बंद बाजाचा स्वीकार केला. चाटीचा वापर जास्त होत असल्याने चाटीचा बाज असेही संबोधले जाते, तसेच तर्जनी-मध्यमा या दोन बोटांचा वापर जास्त होत असल्याने ह्या घराण्याला दोन बोटांचा बाज असेही संबोधले जाते. बंद बाज असल्याने दायाँ-बायाँ मधून मर्यादित आस निर्माण होते. मर्यादित आस निर्माण होण्याचे आणखी एक कारण म्हणजे दिल्ली बाजामध्ये तबल्यातील बोलांचा स्वतंत्र आघात व डग्गाही हात न उचलता वाजविण्याची पद्धत. या सर्व कारणास्तव कोमलता व गोडवा दिल्ली बाजात दिसून येतो. यामधे मिंडकाम, घिसकाम, घुमारा या गोष्टी कटाक्षाने टाळल्याचे दिसून येते. हा बाज नाजूक असला तरीही तबल्याच्या शुद्ध नादांकडे दिल्ली बाजाने अधिक लक्ष दिले आहे, तसेच हे करीत असताना पखावज, ढोलक इ. तालवाद्यांचा प्रभाव वादनावर पडणार नाही ह्याकडेही लक्ष दिले.
तबला या वाद्यातून उत्पन्न होणाऱ्या विविध बंद आणि खुल्या नादांच्या माध्यमातून या घराण्याने प्रथमतः तबल्याची भाषा तयार केली आणि तीनतालाची ताल रचना लक्षात घेऊन बंद व खुल्या नादांच्या माध्यमातून खाली भरी तत्वाची निर्मिती केली व विस्तारक्षम रचनांचा आणि स्वतंत्र तबला वादनाचा पाया घातला. यामुळेच या बाजात विस्तारक्षम रचना म्हणजेच पेशकार, कायदा, रेला यांची विपुलता आढळते. या बाजातील रचना चतुस्त्र जातीत असतात, कायद्याच्या विस्ताराची विशिष्ट पद्धत असते. जोरदार परण-रचना या बाजात आढळत नाहीत. या बाजात तिट, तिरकिट, धागेना-ताकेना, धिंनागिंना-तींनाकिंना, ( दोन बोटांचे ) धिर-धिर अशा बोलांचा वापर जास्त केला जातो. स्वतंत्र तबला वादनाच्या दृष्टीने हा एक श्रेष्ठ बाज मानला जातो.
* उस्ताद सिद्धार खॉं ढाढी यांच्या वंशातील, शिष्य-परिवारातील प्रमुख कलाकारांची नावे :
दिल्ली घराणे - मूळ पुरुष - उस्ताद सिद्धार खॉं ढाढी.
उ. बुगर खॉं, उ. घसीट खॉं (पुत्र), उ. सीताब खॉं (नातू), उ. बोली बक्श (नातू), उ. नत्थू खॉं, उ. गामे खॉं, उ. इनाम अली खॉं, उ. लतीफ अहमद खॉं, पं. मारुतीराव कीर, पं. सुधीर माईणकर इ.
Recent Posts
See All६) पंजाब घराणे - भारतातील सहा प्रमुख घराण्यांपैकी 'पंजाब' घराणे हे तबलावादनातील वैशिष्टयपूर्ण घराणे ठरले ते त्याच्या तबला वादनातील...
५) बनारस घराणे :- या घराण्याचे संस्थापक पंडित रामसहाय हे होत. हे लखनौ घराण्याचे खलिफा उस्ताद मोदू खॉं यांचे शिष्य. पं.रामसहाय यांनी...
४) फरुखाबाद घराणे :- खुल्या बाजातील लखनौ या आद्य घराण्याचे हे शागीर्द घराणे होय. लखनौ घराण्याचे उस्ताद बक्षू खॉं यांचे जावई उस्ताद हाजी...
Comments