भारतीय लोकसंगीतातील तंतू वाद्ये
- Team TabBhiBola
- Oct 19, 2020
- 1 min read
Updated: Jan 29, 2021
१) एकतारी - संत मीरा बाईंच्या हातात असलेले वाद्य म्हणजे 'एकतारी'. हे वाद्य तंबोऱ्याप्रमाणेच परंतु लहान आकाराचे असते. एका छोट्याश्या तुंब्याला साधारण दोन हात लांब बांबूची काठी जोडून हे वाद्य तयार केले जाते. अर्ध्या भागातून तुंबा कापला जातो व त्याच्या मुखावर चामडे मढवले जाते. बांबूच्या काठीमध्ये एक छिद्र पाडून एक खुंटी बसवलेली असते. या खुंटीला एक तार गुंडाळून त्याचे दुसरे टोक तुंब्याच्या खालच्या टोकाला जोडलेले असते. या खुंटीच्या सहाय्याने तारेवरील ताण कमी जास्त केला जातो. या वाद्याला एकच तार असते, म्हणून ह्याला 'एकतारी' असे म्हणतात. तर दोन तारा असणाऱ्या अशाप्रकारच्या वाद्याला 'दोनतारी' असे म्हणतात. प्रामुख्याने साधू-संत, कीर्तनकार यांच्या हातात हे वाद्य आढळून येते. तसेच अभंग, भक्तिगीते, पोवाडे यांच्या साथीसाठीही या वाद्याचा उपयोग करतात. हे वाद्य गळ्यात घालून वा हातात धरून, एका बोटाने तार छेडून वाजविले जाते. या वाद्यावरील नाद हा एक लयबद्ध तालच असतो.
२) तुणतुणे - हे वाद्य एखाद्या उभट डब्याप्रमाणे असते. ह्यलासुद्धा एकच तार असते. लाकडी नळकांड्यापासून हे वाद्य बनवितात. त्या नळकांड्यास दोन फूट लांबीची काठी बसवितात. त्या काठीला एक छिद्र पाडून त्यामध्ये एक खुंटी घट्ट बसवितात. या खुंटीच्या सहाय्याने एक तार नळकांड्याच्या खालील भागास घट्ट बसवितात. नळकांड्याचा वरचा भाग पोकळ असतो व खालील भागाला चामडे घट्ट बसविलेले असते. एका हातात धरून, बोटांनी तार छेडून नादनिर्मिती केली जाते. लोकगीते, पोवाडा, लावणी यांच्या साथीसाठी तुणतुणे वाद्य वाजवितात.
Recent Posts
See Allपखवाज हे वाद्य केव्हा, कोणी, कसे निर्माण केले, याबाबत ठोसपणे माहिती कोणत्याही ग्रंथात आढळून येत नसली तरी या अवनद्ध वाद्याची उत्पत्ती...
भगवान शंकराजवळील डमरू हे सर्वात प्राचीन वाद्य आहे. या आधारावर पखवाजाची उत्पत्ती झाली. पखवाज या वाद्याच्या प्राचीनतेचा पुरावा ऋग्वेदात...
पाश्चात्त्य अवनद्ध वाद्यांचा विकास कसा झाला याचे अध्ययन केल्यानंतर असे लक्षात येते, की या वाद्यांच्या निर्मितीमध्ये सुरुवातीला दगड, हाडे,...
Comments