भारतीय लोकसंगीतातील प्रमुख अवनद्ध वाद्ये
- Team TabBhiBola
- Oct 19, 2020
- 5 min read
Updated: Jan 29, 2021
१) नगारा - प्राचीन साहित्यात नगाऱ्याचा उल्लेख 'दुंदुभी' असा केलेला आढळतो. नगाऱ्यास 'भेरी' असेही म्हणतात. नगाऱ्याचे भांडे अतिशय मोठे, गोल आणि खोलगट असे असते. हे भांडे तोंडाशी रुंद व तळाशी निमुळते असते. तांबे किंवा पितळ या धातूपासून हे भांडे बनवितात. धातूचे कडे आणि चामडी-दोऱ्या, यांची गोलाकार गुंफण करून भांड्याच्या तोंडावर चामडे घट्ट बसवितात. दोन लाकडी काठ्यांनी चामडी पृष्ठ-भागावर जोरकस आघात करून नगारा वाजविला जातो.
छोटी मोठी स्थळे, देवळे, धार्मिक स्थळे, पूजा स्थाने, अशा ठिकाणी तसेच सामूहिक आरत्या, भजने, भक्तिगीते यांच्या बरोबर साथीसाठी म्हणून नगारा वाजविला जातो.
२) ढोल - लाकडी खोडापासून बनवलेला ढोल हा गोलाकार पिंपासारखा आणि दोन तोंडाचा असतो. कधी कधी हे वाद्य धातुच्या पत्र्यापासूनही बनवितात. गोलाकार चामडे बसवलेली दोन कडी लांब दोरीच्या साहाय्याने ढोलाच्या दोन्ही तोंडावर घट्ट बसवितात. यातील एक चामडे जाड व दुसरे जरा पात्तळ असते. जाड चामडीच्या पृष्ठभागावर लाकडी काठीने आणि पातळ चामडीच्या पृष्ठभागावर हाताने आघात केला जातो. सामान्यतः ताशाचे जोडवाद्य म्हणून ढोलाचा उपयोग करतात. ताशा आणि ढोल यांच्या संवादी वादनामधून विविध तऱ्हेच्या लायकारींचे उत्तम प्रदर्शन होऊ शकते. सामूहिक लेझीम वादनाबरोबर एक प्रमुख लयवाद्य म्हणूनही मोठ्या आकाराच्या ढोलाचा वापर करतात. उत्सव, पालखी, मिरवणुका, चित्रपट संगीत इ. मध्ये ढोलाचा वापर मोठ्याप्रमावर केलेला दिसून येतो.
३) चौघडा - नगाऱ्यासारखी परंतु बऱ्याच लहान आकाराची दोन लहान-मोठी वाद्ये म्हणजेच 'चौघडा' होय. ही दोन्ही भांडी पितळ या धातुपासून तयार करतात. दोन्ही भांड्यांच्या तोंडावर, चामडी दोऱ्याच्या सहाय्याने, चामडे घट्ट बसवितात. त्यातील लहान भांड्यातून उंचस्वर निर्माण होतो. दोन लाकडी काठ्यांनी दोन्ही वाद्यांच्या पृष्ठभागावर वा किनारीजवळ, आलटून-पालटून आघात करून, चौघडा वाजविला जातो. चौघड्यामधून ताल-सदृश बोल वाजविले जातात. सामान्यतः सनई बरोबर साथीचे वाद्य म्हणून चौघड्याचा उपयोग केला जातो. सनई-चौघडा हे एक मंगल वाद्य म्हणून समजले जाते. देवळात, लग्न-मुंजी समारंभात, धार्मिक वा शुभकार्याची सुरुवात नेहेमी या वाद्यांनी केली जाते.
४) खोळ - खोळ हे वाद्य मृदंगासारखेच असते. फरक इतकाच असतो की, मृदंगाचे खोड सरळ असते तर खोळ या वाद्याचे खोड मध्यभागात रुंद असते व दोन्ही बाजूंनी चामड्याने मढवलेले असते. या पुड्या वादीने घट्ट ताणून बसविलेल्या असतात. या वाद्याला गठ्ठे नसतात. याचे उजव्या बाजूचे तोंड खूप अरुंद असते. याच्या डग्ग्याकडील डाव्या बाजूचे मुख थोडेसे रुंद असते. हे वाद्य बंगाल प्रांतात जास्त दिसून येते. बंगाली व असामी लोक, नृत्य करीत असताना वादक, हे वाद्य गळ्यात अडकवून, गोल फिरत व उड्या मारत वाजवितात.
५) नाल - हे वाद्य पखवाजाप्रमाणेच असते. लाकडी घोडीवर आडवे ठेऊन याचे वादन करतात. डाव्या पुडीवर हाताच्या पंजाने व उजव्या पुडीवर हाताच्या बोटांनी, आघात करून वादन करतात. खास करून सामूहिक भजनांच्या साथीसाठी या वाद्याचा उपयोग केला जातो.
६) डमरू - काचेच्या जुन्या कालमापक यंत्राप्रमाणे अथवा फोडलेल्या नारळाच्या दोन करवंट्या विरुद्ध दिशेने एकमेकांस जोडले असता, तयार होणाऱ्या आकाराप्रमाणे डमरू या लाकडी वाद्याचा आकार तयार होतो. याची लांबी साधारणपणे २२ से.मी. असते. दोरीच्या सहाय्याने गुंफण करून, दोन गोलाकार चामड्या दोन्ही तोंडावर ताण देऊन, घट्ट बसविल्या जातात. लाकडी भांड्यांच्या निमुळत्या मध्यभागी दोरीचे चार पदर बांधतात. या पदारांच्या टोकाला गाठी तयार करतात. हातात डमरू धरून हलवल्यानंतर, या चार दोऱ्यांच्या गाठी, चामड्याच्या दोन्ही पृष्ठभागांवर आघात करतात. आलटून-पालटून होणाऱ्या या आघातांमुळे डमरुमधून एक प्रकारचा 'कडकड' असा आवाज येतो. हा सलग किंवा तुटक असतो. डमरू एका हातात धरुन दुसऱ्या हाताच्या बोटांनी, चामडी पृष्ठभागावर आघात करूनही हे वाद्य वाजविले जाते. गारुडी, डोंबारी वा जादूगार अशा लोकांकडून या वाद्याचा उपयोग केला जातो. तसेच सध्याच्या काळात लोकसंगीत, चित्रपटसंगीत वा फ्युजन संगीतातही डमरूचे वादन केले जाते.
७) घुमट - हे वाद्य भाजलेल्या मातीपासून बनवितात. याचा आकार लांबट घुमटाकृती असून त्याला दोन तोंडे असतात. उजवे तोंड रुंद असून ते चामड्याने मढवितात. डावे तोंड अरुंद असून ते मोकळे ठेवतात. उजव्या तोंडाच्या चामडीवर हाताने वा बोटांनी आघात करून वाजवितात, तर अरुंद तोंड हाताच्या तळव्याने बंद ठेवतात. उजव्या तोंडावर, वादन चालू असताना, डाव्या अरुंद तोंडावर तळव्याची उघड-झाप करून वाद्याच्या आतील हवेचा दाब कमी-जास्त करून, बोलांमध्ये विविधता व वैचित्र्य आणले जाते. देवीच्या उत्सवात या वाद्याचे वादन केले जाते.
८) खंजिरी ( दिमडी, डफ, हलगी ) - लाकडी गोलाकार कड्याच्या एका तोंडावर चामडे घट्ट बसवून ही वाद्ये तयार केली जातात. अशा प्रकारच्या वाद्यात दिमडी हे सर्वात लहान वाद्य, त्यापेक्षा मोठी खंजिरी आणि खंजिरीहून मोठा डफ व हलगी अशी ही वाद्ये असतात. एका हातात कडे धरून दुसऱ्या हाताने किंवा हाताच्या बोटांनी, चामड्याच्या पृष्ठभागावर आघात करून, ही वाद्ये वाजविली जातात. हलगी वाजविताना हाताबरोबरच जोडीला छोट्या काठीचा वापर करतात.
लोकनृत्ये, भजन, अभंग, शाहिरी पोवाडे, लेझीम, नृत्य, चित्रपटगीते अशा सर्व संगीत प्रकारात दिमडी, खंजिरी, डफ व हलगी या वाद्यांचा वापर केला जातात.
९) ताशा - तांबे किंवा पितळ या धातूपासून ताशाचे भांडे तयार करतात. या भांड्याचा आकार गोल, खोलगट आणि जुन्या काळातील घंगाळ्याप्रमाणे असतो. या भांड्याच्या गोल तोंडावर लोखंडी कडे किंवा चाव्या यांच्या सहाय्याने, बकऱ्याचे कातडे ताण देऊन घट्ट बसवितात. ताशा वाजविण्यापूर्वी पुडीला शेकोटीचा शेक दिला जातो. दोन्ही हातातील, वेताच्या दोन लांब पातळ काठ्यांनी, ताशाच्या पृष्ठभागावर वादन केले जाते. हे आघात ताशाच्या मध्यभागी अथवा काठांजवळ करून, नादांमध्ये विविधता आणली जाते. ढोलाचे जोड वाद्य म्हणून ताशाचे वादन केले जाते. विविध सण आणि उत्सव, ढोल व ताशे एकत्रित वाजवून साजरे केले जातात. निरनिराळे उत्सव, मिरवणुका, पालख्या, लग्नाच्या वराती, गणेशोत्सव, याचबरोबर आत्ताच्या काळात चित्रपट संगीतातही साथीचे वाद्य म्हणून ढोल व ताशांचे वादन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहे.
१०) संबळ / समेळ - संबळ हे महाराष्ट्रातील एक प्राचीन व अत्यंत महत्वाचे असे लोकप्रिय अवनद्ध वाद्य आहे. दोन लोखंडी कुंड्या जोडून हे वाद्य तयार करतात. ह्या कुंड्या लोखंडी सळईने तयार केलेल्या गोल स्टॅन्ड वर बसविलेले असतात. ह्या बसविण्यासाठी तिरक्या आकाराच्या लाकडी गठ्ठयांचा वापर केलेला असतो. ही दोन लाकडी वाद्यांची जोडी असून ह्यातील एक वाद्य लहान आणि दुसरे वाद्य त्याहून थोडे मोठे असते. यातील लहान वाद्याला 'मादी', तर मोठ्या वाद्याला 'नर' असे म्हणतात. ह्या दोन्ही वाद्यांचा आकार, वर रुंद व खाली निमुळता असा असतो. गोल कड्यांभोवती, चामडे ताणून बसवून ही दोन कडी लाकडी भांड्याच्या तोंडावर दोरीच्या सहाय्याने घट्ट बसवितात. याच्या उजव्या बाजूची पुडी ही ढोलकाप्रमाणे कडक वाजते, तर डाव्या बाजूची पुडी डग्ग्याप्रमाणे मुलायम वाजते. दोन्ही भांड्यांपैकी 'नर' संबळावर शाईचा लेप असतो. वादनासाठी दोन्ही वाद्ये एकत्र बांधून कापडी पट्ट्याच्या सहाय्याने गळ्यात अडकवितात किंवा कंबरेला बांधतात. गोलाकार शेवट असलेल्या वेताच्या दोन छोट्या काठ्यांनी, दोन्ही वाद्यांच्या चामडी पृष्ठभागावर आलटून-पालटून आघात करून, ही वाद्ये वाजविली जातात. या वाद्यांमधून ताल सदृश बोल वाजतात. गोंधळी हे वाद्य दोन्ही पायात धरून वाजवितात. डाव्या पायाच्या कमी अधिकदाबाने साथीसाठी या वाद्यामधून मिंडकाम केले जाते. देवीची मूर्ती दारोदार फिरवून, जोगवा मागणारे देवीचे भक्तगण, तसेच देवीची आरती, भक्तिगीते, लोकगीते, कोळीगीते, भारूड, जोगवा, तसेच हल्ली चित्रपट गीतातही हे वाद्य फार मोठ्या प्रमाणावर वाजविले जाते.
११) ढोलकी - महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले व लोकसंगीतातील अतिशय महत्वाचे असलेले हे एक अवनद्ध वाद्य आहे. जाडीला कमी असलेल्या लाकडी खोडापासून हे वाद्य तयार करतात. याचे खोड आतून कोरलेले असते. उजव्या बाजूला हे खोड निमुळते केलेले असते. उजव्या बाजूला मुखावर पुडी बसविलेली असते. या पुडीवर पात्तळ शाई लावलेली असते आणि यावर चाट नसते. डाव्या बाजूला जी पुडी बसवलेली असते तिला 'धुमा' असे म्हणतात. या पुडीला वरून शाई नसते पण आतून 'मेनी' ( मसाला ) लावलेला असतो. ह्या दोन्ही पुड्या पूर्वी सुताच्या दोऱ्यांनी ताणून बसविल्या जात असत. या जोडीला ताण धरून ठेवण्यासाठी गठ्ठयांऐवजी लाकडाच्या लहान काड्या लावल्या जात असत. या काड्यांच्या दोरीला पीळ देऊन ढोलकी स्वरात मिळवली जायची. आत्ताच्या काळात ह्या दोरीऐवजी पुडी लावण्यासाठी नट-बोल्ट लावलेले दिसून येतात. पान्याच्या सहाय्याने याचे बोल्ट फिरवून ढोलकी स्वरात लावली जाते. ढोलकी ही तार सप्तकाच्या स्वरात लावली जाते. शृंगार रसाची निर्मिती करण्यासाठी या वाद्याचा उपयोग लावणीच्या साथीसाठी फार पूर्वीपासून केला जात आहे. लोकगीत, पोवाडा, भारूड,इ. लोकगीतांच्या साथीसाठी ढोलकी या वाद्याचा उपयोग होतो. तसेच वाद्यवृंद, जुगलबंदी, एकलवादन, चित्रपट गीते, सुगम संगीत गीते, इ.साठी ढोलकी या वाद्याचा वापर फार मोठ्या प्रमाणावर केला जातो.
Recent Posts
See Allपखवाज हे वाद्य केव्हा, कोणी, कसे निर्माण केले, याबाबत ठोसपणे माहिती कोणत्याही ग्रंथात आढळून येत नसली तरी या अवनद्ध वाद्याची उत्पत्ती...
भगवान शंकराजवळील डमरू हे सर्वात प्राचीन वाद्य आहे. या आधारावर पखवाजाची उत्पत्ती झाली. पखवाज या वाद्याच्या प्राचीनतेचा पुरावा ऋग्वेदात...
पाश्चात्त्य अवनद्ध वाद्यांचा विकास कसा झाला याचे अध्ययन केल्यानंतर असे लक्षात येते, की या वाद्यांच्या निर्मितीमध्ये सुरुवातीला दगड, हाडे,...
Comments