top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

भारतीय संगीतातील तबला या वाद्याचे स्थान, आवश्यकता आणि महत्व


१) तबल्याचे स्थान -


संगीत म्हणजे जीवनाचा प्राण! रोजच्या घाईगर्दीच्या व कामाच्या व्यापात, चिंतेच्या वणव्यात आणि निरस आयुष्यात प्राण फुंकण्याचे काम करते ते केवळ संगीतच.

संगीतामुळेच आपले जीवन सुसह्य झाले आहे. निसर्गातील पक्ष्यांचा किलबिलाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, पापण्यांची उघड-झाप, हृदयाचे ठोके, श्वासांची स्पंदने, बाळाचे खुद्कन हसणे या सर्व बाबींमधून संगीताची अनुभूती येते. कदाचित यातूनच पुढे गायन, वादन व नृत्याची निर्माण झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भारतीय संगीत हे स्वर, ताल व लय या तत्वावर आधारित आहे. कोणत्याही कलेच्या परिपूर्तीसाठी, स्वराबरोबर लयसुद्धा महत्वाची असते. काल-मापनावरच संगीत अवलंबून असते. ताल हा संगीताचा प्राण आहे. अशा या तालासंदर्भात 'भक्तिरत्नाकर' या ग्रंथात एकसुंदर श्लोक लिहून ठेवला आहे.


गीते तालयुक्त तालबिना शुद्धीचय । जैच्छे कर्णधार बिना नौका तैच्छे हैं ।।


ज्याप्रमाणे नावेला नावाड्याची आवश्यकता असते, तो नसेल तर नाव कोठेही भटकत जाते, त्याचप्रमाणे संगीतामध्ये तालाची आवश्यकता असते, तो नसेल तर संगीतही भरकटत जाते.

भारतीय संगीतात, ताल देण्यासाठी 'तबला' या वाद्याला अत्यंत महत्वाचे स्थान आहे.


२) तबल्याची आवश्यकता -


१५ व्या शतकात धृपद-धमार च्या साथीसाठी मृदंग अथवा पखवाज हे वाद्य वापरले जात असे. काळानुरूप, मानवाच्या अभिरुचीत बदल झाला. धृपद-धमार सारख्या धीर-गंभीर गायकीऐवजी मानवाने ख्यालासारख्या मधुर, शांत, मृदू, मुलायम व शृंगाररसपूर्ण गायकीची निर्मिती केली. ख्यालाच्या साथीसाठी पखवाजाची साथ मारक, अपुरी ठरू लागली, त्यामुळे पखवाज वाद्य मागे पडले. पखवाजाची वादनशैली जोरकस होती. त्याचा ध्वनी / नाद धीर-गंभीर होता, त्यामुळे तबल्यासारख्या मधुर वाद्याची आवश्यकता होती. आणि यातूनच तबल्याचा जन्म झाला. तबल्याचे बोल, तबल्याची भाषा मधुर होती, याचबरोबर तबला-डग्ग्याच्या मिलाफातून निघणारे कोमल, सूक्ष्म, मधुर, मुलायम व शांत बोल ख्यालाच्या साथीसाठी पोषक ठरू लागले. डग्ग्यातून निघणारा घुमारा, त्याची मिंड यामुळे ख्यालाच्या साथीसाठी 'तबला' हे वाद्य वरदान ठरले.



३) तबल्याचे महत्व -


पखवाजानंतर भारतीय संगीतात तबल्याचे महत्व वाढू लागले होते, कारण पखवाज संपूर्ण पंजाच्या सहाय्याने वाजविला जातो. त्यामुळे पखवाज वादन द्रुत लयीत होणे शक्य नव्हते. तर तबला बोटांच्या सहाय्याने वाजविला जात असल्यामुळे तबला वादन द्रुत लयीत वाजविणे शक्य झाले. याचबरोबर पखवाज आडवा ठेऊन वाजविला जातो, त्यामुळे पखवाज वाजविण्यास अवघड जात असे.

याउलट तबला उभ्या स्थितीत ठेवल्यामुळे सहज वाजविता येऊ लागला. याचबरोबर तबला आपण सहज कुठेही नेऊ शकतो. वजनास पखवाजापेक्षा हलका असतो, आकाराने लहान असतो, वाजण्यास मधुर, आकर्षक व पखवाजाच्या तुलनेत तबला वाजवायलाही सोपा असतो आणि कोणत्याही संगीत प्रकाराबरोबर तबल्याची साथ-संगत करता येऊ शकते.


i) गायनाच्या साथीमध्ये तबल्याचे महत्व -

आज गायनातील सर्वच शैलींच्या साथीसाठी तबल्याचा उपयोग केला जात आहे. ख्याल गायन, ठुमरी, गझल, टप्पा, दादरा, भावगीत, नाट्यगीत, चित्रपटगीत, भक्तिगीत इ. गीतप्रकारांच्या साथीसाठी इतर अवनद्ध वाद्यांपेक्षा 'तबला' ह्या वाद्यालाच प्राधान्य दिले जाते. किंबहुना धृपद-धमाराच्या साथीसाठी पखवाज उपलब्ध झाला नाही तर तबला हे वाद्य घेऊन साथ केली जाते.


ii) तंतुवाद्य व नृत्यात तबल्याचे महत्व -

वाद्य संगीताच्या साथीसाठी सुरुवातीला तबला वादकांना केवळ ठेका धरून बसावे लागत होते. त्यानंतर कालांतराने तंतुवाद्याच्या साथीसाठी तबला वादकांनी यात परिवर्तन करून जोरकस व रचनेच्या अंगाने केलेली साथसंगतच उठाव आणू शकते हे सिद्ध केले. आज तंतुवादनाच्या साथीसाठी तबला या वाद्याला अतिशय महत्वाचे स्थान आहे. कत्थक सारख्या नृत्याच्या साथीसाठी तबला हेच वाद्य निवडले जाते. नृत्याला उठाव व पूरकता येण्यासाठी तबला या वाद्याची खूप मदत होते. नृत्यातील लयकारी व नृत्य-तबल्याच्या, जुगलबंदीमुळे तबला या वाद्याचे महत्व वाढले आहे. केवळ ठेका धरून बसणाऱ्या तबला वादकाला, वाद्याची व नृत्याची साथ वरदान ठरली आहे. साथीमुळे तबला वादकाला आपले कौशल्य, तयारी, प्रतिभा आणि कला दाखविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.


iii) स्वतंत्र तबला वादन व तबल्याचे महत्व -

तबला या वाद्याची निर्मितीच मुळात साथीसाठी झाली होती. परंतु काही गुणी तबलावादकांनी साथ संगत करीत असताना तबला वादनाची स्वतंत्र वादन-शैली विकसित केली. पेशकार, कायदे, रेले, तुकडे, मुखडे, चक्रदार व तिहाया असे अनेक वादनप्रकार निर्माण करून, तबला-वादनाचे साहित्य समृद्ध केले. आज अनेक मैफिलीत स्वतंत्र तबला-वादनाचे कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे केवळ साथीसाठी असलेल्या या वाद्याला स्वतंत्र वाद्याचाही दर्जा मिळाला आहे.


iv) आधुनिक संगीतात तबल्याचे महत्व -

गायन, वादन, नृत्य व स्वतंत्र तबलावादनाबरोबरच आज संगीत विश्व पूर्णपणे तबल्याने व्यापून टाकले आहे. चित्रपट व नाटकातील विविध प्रसंगात रसनिष्पपत्तीसाठी तबला हे वाद्य वापरले जाते. शास्त्रीय संगीतात तर तबल्याला महत्व आहेच, परंतु लोकसंगीतातसुद्धा अनेकवेळा तबला हे वाद्य वाजविले जाते. एवढेच नव्हे तर आधुनिक युगात भारतीय संगीत व पाश्चात्त्य संगीत यांचा मिलाप केला जात आहे आणि यातही तबला हे वाद्य प्रामुख्याने वापरले जात आहे. त्याचप्रमाणे फ्यूजन, रिमिक्स अशा संगीतप्रकारात तबल्याचा कौशल्याने वापर केला जात आहे.


भजन-कीर्तनापासून ख्याल गायनापर्यंत, लोकनृत्यापासून शास्त्रीय नृत्यापर्यंत, गावापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत, स्नेहसंमेलनाच्या छोट्याश्या कार्यक्रमापासून ते आंतरराष्ट्रीय कार्यक्रमापर्यंत 'तबला' या वाद्याला महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

Recent Posts

See All

सांगता

अशाप्रकारे सध्याच्या काळात 'तबला' या वाद्याला अतिशय प्रसिद्धी मिळाली आहे. आजच्या आधुनिक युगात शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, नाट्य...

तबल्याचे आधुनिक परिवर्तन

१) पूर्वी तबल्यासाठी एकाच जाड चामड्याचा वापर केला जात होता. परंतु पुढे एका जाड चामड्याऐवजी दोन पातळ चामड्याचा वापर करण्यात येऊ लागला....

Comments


bottom of page