top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

'बायाँ' च्या वादनात संतुलन राखण्यासाठी रियाजाची पद्धत


तबला हे वाद्य दायाँ (तबला) आणि बायाँ (डग्गा) या दोन वाद्यांचा मेळ साधून निर्माण झालेले वाद्य आहे. तबल्यातून (दायाँ) निघालेले 'तार-स्वर' आणि डग्ग्यातून बायाँ) निघालेले 'खर्ज-स्वर', यांच्या संयोगाने तबला या वाद्यातून संगीत निर्माण होते. तबला (दायाँ) हे वाद्य एकसुरी आहे. परंतु डग्ग्याची (बायाँ) रचना आणि वादन-शैली, यामुळे त्यातून निर्माण होणाऱ्या खर्ज ध्वनीमध्ये बदल आणता येतो. या बदल-क्षमतेमुळे तबला-वादनात नाद-विविधता निर्माण होते आणि तबला 'बोलू' लागतो. याचा अर्थ हाच होतो की, तबला वादन परिणामकारक करायचे असले तर दायाँ आणि बायाँ च्या बोलांमध्ये संतुलन असणे आवश्यक आहे. याच कारणाने बायाँतून अलग-अलग नादांची निर्मिती करणे, त्याच्यावर प्रभुत्व मिळविणे आणि तबल्याच्या बोलांच्या साथीने त्यामध्ये मेळ साधणे, हे तबला वादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.

बायाँ च्या अक्षरांमध्ये संतुलन आणणे त्याचा सरळ अर्थ असा आहे की, बायाँतून निर्माण होणारे नानाविध नाद आणि ते नाद निर्माण करण्याच्या कौशल्यावर/तंत्रावर प्रभुत्व मिळवणे.


बायाँ वादनाचे तंत्र -

बायाँ वादनाचे वेगवगळे तंत्र, त्यातून उमटणाऱ्या नादांची माहिती/समज आणि त्या नादांवर प्रभत्व येण्यासाठी आवश्यक पद्धतीची माहिती खालीलप्रमाणे -


१) बोटांचा सरळ आघात :- हाताचे मनगट डग्ग्याच्या मैदानात, शाईच्या टोकावर ठेवून, मध्यमा व तर्जनी यांनी लवेवर आघात करून मधुर गुंजनासारखा नाद (निर्माण) करणे.


२) दाब तंत्र :- मनगटाने मैदान वा शाईवर दाब देऊन, तर्जनी किंवा मध्यमा ने नाद निर्मिती करणे. मनगटाचा दाब कमी-जास्त करण्याने वादनात नाद-विविधता येते, स्वर-बदलाचा आभास निर्माण होतो.


३) घिस्सा :- तर्जनी किंवा मध्यमा ने, लवेत आघात करतेवेळी मनगट किंवा अंगठा शाईवर घासल्यामुळे एक निराळाच नाद वा ध्वनी निर्माण होतो. ढोलक वादनात या 'घिस्सा कामा'चा जास्त प्रभाव जाणवतो.


४) मींड :- बोटांच्या आघाताने निर्माण होणाऱ्या नादावर मनगटाने दिलेल्या दाबामुळे 'मींड' उत्पन्न होते.


५) गमक :- मींड-वादन लागोपाठ करण्याने जो ध्वनी उत्पन्न होतो त्याला 'गमक' असे म्हणतात.


६) खुला बाज :- हाताच्या पंजाने बायाँच्या मैदानावर आघात करून, मोकळा गुंजन युक्त नाद निर्माण होतो, त्याला 'खुला बाज' असे म्हणतात. हा नाद किंवा खुला बाज वादन याचा वापर किंवा प्रभाव पखावज वादनामध्ये दिसून येतो.


७) बंद आघात :- हाताचा पंजा, बोटे, नखाची मागील बाजू आणि बंद मूठ याद्वारे निर्माण केलेल्या नादाला 'बंद आघात' असे म्हणतात. हा नाद गुंज विरहित असतो.


वर सांगितलेले तंत्र तसेच त्या तंत्र-प्रयोगामुळे निर्माण होणाऱ्या नानाविध नादांवर प्रभुत्व मिळविण्यासाठी ज्या शब्द-बंधांचा वा बोलांचा जास्त करून उपयोग केला जातो, ते बोल पुढील प्रमाणे -


१) सरळ आघात :- १) धाधा तिट धाधा तींना । ताता तिट धाधा धिंना ।


२) धाती धाती धाधा तींना । ताती धाती धाधा धिंना ।


अथवा

तीनतालाचा ठेका खालील प्रमाणे वाजविणे;

धागेगेगे धिंगेगेगे धिंगेगेगे धागेगेगे ।


धागेगेगे धिंगेगेगे धिंगेगेगे धागेगेगे ।


धागेगेगे तींकेकेके तींकेकेके ताकेकेके ।

ताकेकेके धिंगेगेगे धिंगेगेगे धागेगेगे ।


वरील रचनेत तर्जनी आणि मध्यमा या बोटांनी एक-आड-एक वाजविण्याचा सराव होतो आणि 'सरळ आघाता'चाही रियाझ होतो.


२) दाब तंत्र :- या तंत्राचा सराव करण्यासाठी सर्वाधिक उपयुक्त असणारे बोल;


धागे धीनागेना धागे धीनागेना धीनागेना ।

धागे धीनागेना धागे घिना धागे तीनाकेना । आणि खाली....


वरील रचनेमध्ये असणाऱ्या 'धागे' या शब्द-बंधाला/बोलाला 'बायाँ'वर दाबून नाद निर्माण केला जातो.


३) घिस्सा, मींड आणि गमक :- या तीन तंत्रांवर प्रभुत्व मिळविण्यासाठी, 'अजराडा' घराण्याच्या खालील कायद्यांचा रियाझ अत्यंत उपयुक्त ठरतो;


अ] धागेना धात्रक धिकीट धागेना धात्रक धीनाग धीनधीनागेना ।

घिनाग धीनधीनागेना धागेना धात्रक धीनाग तीनतीनाकेना । ......


ब] धाs घीन धाsधाs तकघीन धाsनधातिट घीनधीनागेना ।

तकघीन धाsधातकघीन धाsनधातिट घीनतीनाकेना । .....


क] घिना धागेना धात्रक धागेना धात्रक धातीधा घीनधीनागेना ।

धात्रक धातीधा घिनाधातीघिना धात्रक धातीधा घीनतीनाकेना । ....


४) खुला बाज :- हे वादन पखावज-प्रेरित असल्यामुळे, खाली दिलेले पखवाजाचे रेले, या बाजावर प्रभुत्व मिळविण्यासाठी उपयुक्त ठरतात;


अ} धा तिरकीट धा तिटकत गदिगन

ब} तक धुमकिट तक धुमकिट धुमकिट ।

तकतक धुमकिट तकतक धुमकिट ।


५) बंद आघात :- वर दिलेल्या सर्व कायद्यांचे 'काल अंग' (खाली), तिरकीट, धिरधिर, दीनतक युक्त रेले तसेच, ह्या सर्व शब्दबंधांच्या रियाजाने, 'बंद आघातावर' प्रभुत्व मिळविले जाऊ शकते.


आपण, 'बायाँ'तून उत्पन्न होणारे विविध नाद, ते नाद निर्माण करण्यासाठी आवश्यक तंत्र आणि त्या तंत्रावर प्रभुत्व मिळविण्यासाठी आणि 'डग्ग्याच्या' बोलांमध्ये संतुलन आणण्यासाठी उपयुक्त बोलांची माहिती जाणून घेतली. परंतु या तंत्राचा अभ्यास आणि त्या नादांचे संस्कार, हे समर्थ गुरूंकडूनच मिळू शकतात, मिळतात. त्याचबरोबर निष्णात तबला-वादकांचे वादन नियमितपणे ऐकणे अत्यंत आवश्यक आहे.


Recent Posts

See All

पेशकार, कायदा तसेच रेला यांचे एकल तबला वादनातील स्थान आणि महत्व

तबला हे तालवाद्य, सर्व तालवाद्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असण्याचे कारण म्हणजे, तबला हे तालवाद्य सर्वाधिक विकसित व उपयोगी आहे. या...

पढंतची आवश्यकता -

स्वतंत्र तबलावादनाच्या सादरीकरणामध्ये 'पढंत'चे स्थान महत्वपूर्ण आहे. या सादरीकरणामध्ये प्रथम वाचेद्वारे वाचून नंतर त्याचं सादरीकरण (पेश...

रियाजाची उद्दिष्टे -

१) तंत्र विकसित करणे (बोटांच्या स्वतंत्र व संयुक्त हालचाली सहज करता येणे, डग्ग्यावरील विविध क्रिया समजून घेणे, हात व बोटांच्या...

Комментарии


bottom of page