top of page
Writer's pictureTeam TabBhiBola

रेला


क] रेला - ज्या रचनेमधील बोल शीघ्र ( द्रुत ) गतीने वाजू शकतात, अंत्यपद सर्वसाधारणपणे व्यंजन असते, जी रचना विस्तारक्षम असून तालाला अनुसरून खाली-भरीयुक्त अशी असते, त्या रचनेस 'रेला' असे म्हणतात. 'रेला' म्हणजे छोट्या बोलसमूहाची केलेली अशी रचना जी चौपटीत वा आठपटीतही अतिशय तयारीने वाजविता येते. आठपटीत रेला वाजविताना 'रव / रौ' निर्माण होते. अतिशय द्रुत लयीत वाजविला जाणारा आणि प्रत्येक बोलाची अखेर आणि प्रारंभ एकमेकांत गुंफले गेल्यामुळे 'रव' निर्माण करणारा, तबलावादनातील एक आकर्षक प्रकार म्हणजे 'रेला' होय.

स्वतंत्र तबला वादनातील अत्यंत आकर्षक व सर्वप्रकारच्या प्रेक्षकांना आवडणारा वादनप्रकार म्हणजे 'रेला'. रेल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची 'गतिमानता'. त्यामुळे रेल्याच्या रचनेतील शब्दबंधांची रचना ही गतिमानतेस अनुकूल अशी असते.


रेल्याचा विस्तार - 'रव' म्हणजे नादांचा एकसंधपणा किंवा नादांची अतूट गुंज किंवा आस. रेल्याची रचनाच अशा प्रकारे केलेली असते, की अतिद्रुत लयीत वाजविल्यावरसुद्धा त्यातील प्रत्येक बोलातील शेवटचे अक्षर त्यानंतर येणाऱ्या दुसऱ्या बोलाच्या पहिल्या अक्षराला जोडले गेलेले असते. म्हणजेच पहिल्या बोलातील शेवटच्या अक्षराच्या नादाच्या आसदार लहरी कानावर आदळत असताना त्या लहरीत दुसऱ्या बोलाच्या पहिल्या नादाचा संपूर्ण मिलाफ होऊन गेलेला असतो. रेल्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी बायाँचा वापर केला जातो, त्या त्या ठिकाणी बायाँतून निर्माण होणारा 'घुमारा' अथवा 'गुंज' यांना महत्व दिले जाते. तसेच तबल्याच्या चाटेवरील, लवेवरील आणि शाईवरील होणाऱ्या आघातांमुळे निर्माण होणारी आसही तितकीच महत्वाची असते.


रेल्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्याचा विविध प्रकारांनी होणारा विस्तार.

रेला वाजविताना कल्पनाशक्ती आणि प्रतिभाशक्ती यांना भरपूर वाव मिळतो.

रेल्यासाठी, त्याच्या रचनेसाठी वापरण्यात येणारी अक्षरे ही नेहेमीच द्रुत लयीत वाजविण्यास सुलभ अशी निवडलेली असतात. विशेष म्हणजे सर्वच बोलांचे पहिले अक्षर 'स्वर' असते किंवा नाद 'तारध्वनी' असतो. तसेच शेवटचे अक्षर 'व्यंजन' असते किंवा 'खर्जध्वनी' असतो.


रेल्याची विस्तारक्रिया - गतिमानतेस प्राधान्य असल्यामुळे रेल्याच्या विस्तारक्रियेत अडथळे निर्माण होतात, व कायद्याच्या तुलनेत त्याचा विस्तार कमी होतो. कमी विस्ताराचे अजून एक कारण म्हणजे, याच्यातील शब्दबंध एकाचप्रकारचे असतात व त्यामुळे जास्त विस्तार केल्यास त्यामध्ये नावीन्य जाणवत नाही. रेल्याच्या विस्तारात जरी असे अडथळे असले तरी दमसास, तयारी, नादांची उत्तम समज आणि सौंदर्यवादी दृष्टिकोन यांच्या माध्यमातून प्रतिभावान कलाकार रेल्याचा उत्तम विस्तार करतात.


i) तयारी व दमसास - गतिमानता हा तर रेल्याचा आत्मा आहे. रेल्याचा वेग जेवढा जास्त तेवढा त्याचा प्रभाव श्रोत्यांवर जास्त पडतो. अर्थात हे करताना त्यातील नादांशी तडजोड केली जात नाही (करून चालत नाही). नादांची सुस्पष्टता या गतिमानतेतही शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी दमसास अतिशय आवश्यक असतो.


ii) नादांची उत्तम समज - तबला-डग्ग्यातून निर्माण होणाऱ्या नादांची समज उत्तम असेल तर या नादांच्या वैशिष्ट्यपूर्ण वादनातून रेला वादनातील तोचतोचपणा कमी होतो. किनार, लव, शाईवरील आघात, डग्ग्याचा घुमारा, आस यांच्या योग्य वापराने ही नादनिर्मिती होत असते. रेला वादन करताना कधी कधी अतिशय मुलायमपणे तर कधी अत्यंत कठोरपणे सादरीकरण करून वादन प्रभावी होते.


iii) सौंदर्यवादी दृष्टिकोन - सौंदर्यवादी दृष्टिकोन असलेले कलाकार, रेल्याची गतिमानता, 'विराम' घेऊन किंवा मध्येच एखादा वेगळा 'तुकडा' वाजवून अनपेक्षितपणे भंग करतात आणि गतिमानतेत वादन करतात.


काही रेले एकपट-दुप्पट करून वाजविले जातात तर काही चलन-रव करून वाजविले जातात.


समाप्ती -


अशाप्रकारे रेल्याचा विस्तार करताना कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि त्याचे वेगाने वाजणारे बोल लयबंधाच्या विविध रचनांमध्ये गुंफता येतात. रेल्याचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे हे प्रकार 'बेदम' असतात. म्हणजेच कुठल्याही दोन प्रकारांमध्ये दम घेणे किंवा थांबणे इष्ट नसते आणि थांबावयाचे असल्यास एका मात्रेपेक्षा अधिक वेळ थांबायचे नसते. विशेष म्हणजे अशावेळी बायाँची गुंज अथवा दायाँवरची आस-लहरी संपण्याच्या आत दुसरा प्रकार सुरू करतात. म्हणजे रेल्याची 'रव' अखंड निनादत राहते. रेल्यामध्येच गुंफलेली एखादी 'रव-तिहाई' घेऊन, रेला संपविला जातो. शक्यतो एकच प्रकार पुन्हा पुन्हा वाजवत न राहता विविध प्रकार वाजवून विस्तार करावा.


एकमेकांत गुंफलेले स्पष्ट नाद, दायाँची आस, बायाँची गुंज अथवा मिंड, घुमारा, वेग, तयारी, रियाज, गुरूंचे योग्य मार्गदर्शन आणि कल्पनाशक्ती, कल्पनाविस्तार आणि या सर्व गोष्टी-गुणांमुळे 'रेला' उठावदार वाजण्यास मदत होते.

Recent Posts

See All

गत

ड] गत - समेपूर्वी संपल्यामुळे पुनरावृत्ती करताना येणारी व त्यामुळे निसर्गातील विविध चालींचा ( movements ) प्रत्यय देणारी बंदिश म्हणजे...

कायदा

ब ] कायदा - जी रचना तालाच्या खाली-भरीला अनुसरून असते, ज्याचे अंत्यपद स्वरमय असते, अशा विस्तारक्षम रचनेस 'कायदा' असे म्हणतात. विस्तार...

Comentarios


bottom of page